This year's Janmashtami combines three yoga | जन्माष्टमीत तीन योगांचा संयोग; २०० वर्षांनी सौभाग्य सुंदरी योग
जन्माष्टमीत तीन योगांचा संयोग; २०० वर्षांनी सौभाग्य सुंदरी योग

- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: रोहिणी नक्षत्रात जन्माष्टमीनिमित्त राजराजेश्वर नगरी कृष्णमय झाली आहे. एकीकडे कावड यात्रेची तयारी सुरू असताना कृष्णाष्टमीनिमित्त शहरातील कृष्ण मंदिर सजली आहे. यावर्षी दोन दिवस कृष्णाष्टमीचे व्रत असून, तीन योगांचा संयोग १४ वर्षांनी जुळून आल्याने कृष्ण भक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन योगांपैकी सौभाग्य सुंदरी योग हा तब्बल २०० वर्षांनतर आला असल्याने यंदाची जन्माष्टमी विशेष ठरली आहे.
जन्माष्टमी उत्सव भगवान कृष्णाचा जन्मोत्सव रू पाने साजरा करण्यात येतो. सृष्टीचे पालनहार भगवान विष्णू यांनी या दिवशी आपल्या आठव्या अवतारात श्रीकृष्ण रू पाने पृथ्वीवर जन्म घेतला होता, अशी मान्यता आहे. देशात विविध भागात हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो; परंतु मथुरा आणि वृंदावन या ठिकाणी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी हिंदू धर्मीय व्रत करतात. घरांमध्ये कृष्णाचा पाळणा सजविण्यात येतो.
कृष्णाष्टमी तिथीवर यंदा छत्र योग, सौभाग्य सुंदरी योग आणि श्रीवत्स योग जुळून आले आहे. पूजन आणि व्रत करणाऱ्यांसाठी ही तिथी फलदायी सिद्ध होणार आहे. १४ वर्षांनी तीन संयोग एकाच वेळी आले, हे येथे उल्लेखनीय आहे. यानिमित्त शहरातील मुरलीधर मंदिर, हरिहर मंदिर, सालासार बालाजी मंदिर, विश्वमानव मंदिर, गोवर्धन हवेली आदी ठिकाणी जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन केले आहे. अखंड हरिनाम कीर्तन, बालगोपाल पूजा, दहीहंडी आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यावर्षी दोन दिवस जन्माष्टमीचे आल्याने नेमके कोणत्या दिवशी पूजन करायचे, असा संभ्रम निर्माण झाला आहे. २३ आॅगस्टला सकाळी ८ वाजून ९ मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू होणार आहे. ही तिथी २४ आॅगस्टला सकाळी ८ वाजून ३२ मिनिटांनी समाप्त होणार आहे. रोहिणी नक्षत्र २४ आॅगस्टला सकाळी ३ वाजून ४८ मिनिटांनी प्रारंभ होणार आहे. यामुळे धर्मशास्त्राच्या नियमानुसार सप्तमी व्यापिनी अष्टमी तिथीमध्ये सामान्य गृहस्थांनी व्रत केले पाहिजे, जे २३ आॅगस्टला आहे. वैष्णव आणि साधू-संतांकरिता २४ तारीख व्रतासाठी उत्तम आहे. गृहस्थांनी २४ आॅगस्टला ८ वाजून ३२ मिनिटांनंतर व्रत सोडणे उचित ठरेल. उत्तर प्रदेशात जन्माष्टमी दोन दिवस साजरी होणार असून, महाराष्ट्रामध्ये शुक्रवार, २३ आॅगस्टला जन्माष्टमी साजरी होणार आहे.


कृष्णाष्टमीला यंदा दोन योगांसोबतच सौभाग्य सुंदरी योग आला आहे. हा योग तब्बल २०० वर्षांपूर्वी आला आहे. स्त्रियांच्या सौभाग्य वृद्धीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची माहिती पंडित संतोष कुळकर्णी यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.

 


Web Title: This year's Janmashtami combines three yoga
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.