अकोला तालुक्यात परिवर्तनाचे वारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:21 AM2021-01-19T04:21:41+5:302021-01-19T04:21:41+5:30

अकोला: अकोला तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या ३३५ जागांचे निवडणूक निकाल सोमवारी जाहीर झाले. त्यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये कोणत्याही एका पॅनलला ...

Winds of change in Akola taluka! | अकोला तालुक्यात परिवर्तनाचे वारे!

अकोला तालुक्यात परिवर्तनाचे वारे!

Next

अकोला: अकोला तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या ३३५ जागांचे निवडणूक निकाल सोमवारी जाहीर झाले. त्यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये कोणत्याही एका पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, प्रस्थापितांना धक्का देत परिवर्तनाचे वारे वाहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

अकोला तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एकूण ३५८ जागांपैकी २० जागांवर उमेदवारांची अविरोध निवड झाली असून, तीन जागांवर उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने, १२८ प्रभागातील ३३५ जागांसाठी मतदान घेण्यात आले. सोमवार, १८ जानेवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय धान्य गोदामात झालेल्या मतमोजणीत ३३५ जागांचे निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. त्यामध्ये तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये कोणत्याही एका पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. पळसो बढे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे सुशांत बोर्डे यांच्या पॅनलला ५, भाजप पुरस्कृत पॅनलला ३ व अन्य एका गटाला ५ जागांवर समाधान मानावे लागले. उगवा ग्रामपंचायतमध्ये जिल्हा समाजकल्याण सभापतींच्या पॅनलला केवळ तीन जागांवर विजय प्राप्त झाला. तसेच बोरगावमंजू येथे विद्यमान जिल्हा परिषद सदस्याच्या पॅनलला एकही जागेवर विजय मिळाला नसल्याने पराभवाचा सामना करावा लागला. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये कोणत्याही एका पॅनलला ग्रामपंचायतमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्याएवढे बहुमत मिळाले नसल्याने, प्रस्थापितांना धक्का देत ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात ग्रामस्थांनी नवख्यांना संधी दिल्याचे चित्र स्पष्ट झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी!

अकोला तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय धान्य गोदामात करण्यात आली. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी गावागावांतील उमेदवारांच्या समर्थकांची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली मतमोजणीची पाहणी!

अकोला तालुक्यातील मतमोजणीच्या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी भेट देऊन मतमोजणी प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून अकोटचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे उपस्थित होते.

ईश्वरचिठ्ठीने महिला

उमेदवाराचा विजय!

आपोती बु. ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र. ३ मधील वंदना शिवानंद तराळे व शीलाबाई शेषराव रामागढे या दोन्ही महिला उमेदवारांना प्रत्येकी ७१ मते मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये ईश्वरचिठ्ठीने वंदना शिवानंद तराळे यांना विजयी घोषित करण्यात आले.

Web Title: Winds of change in Akola taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.