गावात स्मशानभूमी नाही; चक्क पुलावर करावे लागले अंत्यसंस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:06 AM2020-07-17T10:06:28+5:302020-07-17T10:35:39+5:30

कुटुंबीयांनी अत्यंत जड अंत:करणाने गावातील नदीच्या पुलावर महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

The village has no cemetery; Funeral done on a bridge! | गावात स्मशानभूमी नाही; चक्क पुलावर करावे लागले अंत्यसंस्कार!

गावात स्मशानभूमी नाही; चक्क पुलावर करावे लागले अंत्यसंस्कार!

googlenewsNext
ठळक मुद्देसंगीता अनिल पाटेकर हिला घरामध्ये सर्पदंश झाला.गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी, मोक्षधाम नाही.नदीच्या पुलावर महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

- प्रशांत विखे  
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव डवला येथे स्मशानभूमीच नसल्यामुळे गावातील मृतकांवर अंत्यसंस्कार करावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील एका विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू झाला; परंतु गावात स्मशानभूमीच नसल्याने तिच्या कुटुंबीयांवर विवाहितेच्या पार्थिवावर चक्क गावातील पुलावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. त्यामुळे गावात लोकप्रतिनिधींविषयी रोष व्यक्त होत आहे.
तळेगाव येथील २७ वर्षीय विवाहिता संगीता अनिल पाटेकर हिला घरामध्ये सर्पदंश झाला. महिलेला शेगाव येथे रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच, गुरुवारी तिचा वाटेतच मृत्यू झाला. पाऊस, पाण्याचे दिवस. शेतांमध्ये पिकांची लागवड केलेली. चिखल साचलेला. गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी, मोक्षधाम नाही. अशा परिस्थितीत महिलेवर अंत्यसंस्कार करावेत तरी कुठे, असा प्रश्न महिलेचे कुटुंबीय, नातेवाइकांना पडला. अखेर गावालगतच्या पुलावरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. १६ जुलै रोजी सायंकाळी संतप्त नातेवाईक, कुटुंबीयांनी अत्यंत जड अंत:करणाने गावातील नदीच्या पुलावर महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. हे अंत्यसंस्काराचे विदारक चित्र पाहून, रस्त्यावरील वाहनचालकसुद्धा अचंबित झाले होते. मरतानासुद्धा मरणे सोपे नाही. मरणानंतरही माणसाला यातना सहन कराव्या लागतात. याचेच उदाहरण गुरुवारी तळेगाव येथे पाहायला मिळाले. ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मृतकाला स्मशानभूमीसुद्धा नशीब होत नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?


दखल घेणार का?
तळेगाव डवला गावात स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामस्थांना उघड्यावर, रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधींनी जागे व्हावे आणि स्मशानभूमी, टिनशेडसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे. मृतक महिलेचा पती शेतमजूर असून, मृतक महिलेला दोन मुले आहेत. त्यांची गरिबीची परिस्थिती लक्षात घेऊन महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी होत आहे.

 

Web Title: The village has no cemetery; Funeral done on a bridge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.