Unlock 01 : अटी-शर्तींसह ‘कटिंग’ सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:24 AM2020-06-29T10:24:18+5:302020-06-29T10:24:34+5:30

दाढी करण्याला परवानगी नसल्याने या अर्धवट निर्णयाबद्दल ‘लोकमत’ शी बोलताना नाभिक समाजाने नाराजी व्यक्त केली आहे.

Unlock 01: 'Cutting' begins with terms and conditions! | Unlock 01 : अटी-शर्तींसह ‘कटिंग’ सुरू!

Unlock 01 : अटी-शर्तींसह ‘कटिंग’ सुरू!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊनदरम्यान तब्बल तीन महिने बंद असलेला केशकर्तन व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळाली असून, रविवार, २८ जूनपासून जिल्ह्यातील सलून अटी-शर्तींसह ग्राहकांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन करीत उघडण्यात आलेल्या सलून दुकानांमध्ये पहिल्याच दिवशी ग्राहकांनी गर्दी के ल्याचे चित्र होते. दरम्यान, केवळ कटिंगची मुभा देण्यात आली असून, दाढी करण्याला परवानगी नसल्याने या अर्धवट निर्णयाबद्दल ‘लोकमत’ शी बोलतांना नाभिक समाजाने नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी २४ मार्चपासून लागू करण्यात आलेला देशव्यापी लॉकडाऊन ३ जूनपासून शिथिल करण्यात आला असून, अनेक व्यवसायांना मुभा देण्यात आली. तथापि, ग्राहकांसोबत अत्यंत जवळचा संपर्क येणाऱ्या सलून, ब्युटी पार्लर, स्पा यासारख्या व्यवसायांवरील बंधने कायमच होती. उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्या गेल्याने राज्यभरातील नाभिक समाजाने सलून व्यवसाय सुरू करण्याची मागणी रेटून धरली होती. या मागणीची दखल घेत प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागांमधील सलून, ब्युटीपार्लर अटी व शर्तींसह सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांसह, स्वच्छता, ग्राहकांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करण्याच्या अटीवर रविवारपासून केशकर्तनालये सुरू झाली.
अकोला जिल्ह्यात ४ हजारावर तर अकोला शहरात जवळपास ८०० दुकाने आहेत.
शहरातील सर्वच दुकाने सुरू झाली नसली, तरी बहुतांश दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सलून संचालकांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. केशकर्तनाचे साहित्य सॅनिटाइझ करणे, ‘युझ अ‍ॅन्ड थ्रो’ सारख्या साहित्यांचा वापर आदी खबरदारी घेण्याकडे बहुतांश सलून संचालकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांमध्येही जागरूकता निर्माण झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन होत असल्याचे चित्र अनेक सलून दुकानांमध्ये पाहावयास मिळाले.


कटिंगचे दर वाढले
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सलून संचालकांकडून काळजी घेतल्या जात आहे. प्रत्येक ग्राहकासाठी स्वतंत्र अ‍ॅप्रन, स्वतंत्र साहित्य, सॅनिटायझर, टिश्यू पेपर आदी साहित्यांचा वापर करावा लागत असल्याने सलून व्यावसायिकांनी कटिंग, दाढी, फेशियल, मसाज यासारख्या सेवांचे दर वाढविले आहेत. दाढी करण्याला परवानगी नसल्याने कटिंगसाठी प्रती ग्राहक १०० रुपये आकारले जात आहेत.

हातात ग्लोव्हज, अंगात अ‍ॅप्रन
कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी केशकर्तनालयात कारागिरांकडून विशेष काळजी घेतल्या जात आहे. हातात रबरी किंवा प्लास्टिकचे ग्लोव्हज, तोंडावर मास्क, अंगात अ‍ॅप्रन असा वेश केलेले कारागीर ग्राहक सेवा देताना दिसून आले. ग्राहकांना सॅनिटायझर, टिश्यू पेपर, स्वतंत्र अ‍ॅप्रनची व्यवस्थाही काही सलून संचालकांनी केली आहे.


नाभिकांना हवे अनुदान
गत तीन महिन्यांपासून सलून बंद असल्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात दुकानाचे भाडे, वीज बिल सुरूच होते. हा खर्च भरून काढण्यासाठी शासनाने नाभिकांना १० हजार रुपये महिन्याप्रमाणे तीन महिन्यांचे ३० हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी नाभिक समाज दुकानदार संघटनेने केली आहे.

केवळ केस कापण्याची मुभा देऊन, दाढीला परवानगी नाकारणे योग्य नाही. यामुळे नाभिकांना आर्थिक फटका बसणार आहे. लॉकडाऊन काळात नाभिक समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्या गेले होते. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामधून सावरण्यासाठी शासनाने सलून व्यावसायिक व कारागिरांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत करावी.
- गजानन वाघमारे, अध्यक्ष नाभिक समाज दुकानदार संघटना, अकोला.


कोरोना संकटकाळात ग्राहकांची विशेष काळजी घेण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता सलून व्यावसायिकांना सेवादर वाढवावे लागले आहेत. ग्राहकांनी सलून व्यावसायिकांची अडचण समजून सहकार्य करावे.
- प्रदीप अठराळे, अध्यक्ष,
नाभिक युवा सेना, अकोला.


शासनाने सलून दुकाने सुरू करण्यास परवाणगी दिल्याने नाभिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला आहे. सलून संचालक कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेऊन व्यवसाय करतील.
- अनंता कौलकार, सलून संचालक

 

Web Title: Unlock 01: 'Cutting' begins with terms and conditions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.