Supply of Calcium, Disinfectant Than Drugs! | औषधांपेक्षा कॅल्शिअम, डिसइन्फेक्टंटचाच पुरवठा जास्त!
औषधांपेक्षा कॅल्शिअम, डिसइन्फेक्टंटचाच पुरवठा जास्त!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये महत्त्वाच्या औषधांपेक्षा कॅल्शिअम, व्हिटॅमिन अन् डिसइफेक्ंटटचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला आहे; परंतु दुसरीकडे शासकीय रुग्णालयात औषधसाठा मर्यादित आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना उपचार स्वस्तात पडत असला, तरी औषधोपचार महागडा ठरत आहे.
सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांवर अत्यल्प दरात उपचार होतो. त्यामुळेच येथे उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी असते; मात्र गत एक-दीड वर्षात हाफकीनकडून शासकीय रुग्णालयांना पर्याप्त औषधसाठा पुरविण्यात आला नाही. परिणामी, जिल्ह्यातील शासकीय रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. शासकीय रुग्णालयात अल्पदरात उपचार तर होतो; परंतु महत्त्वाची औषधीच उपलब्ध नसल्याने डॉक्टर या ठिकाणी पर्याप्त औषधसाठा उपलब्ध नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. हाफकीनकडून नियमित औषध पुरवठा झाला नसला, तरी कॅल्शिअम, व्हिटॅमिनच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला असून, तो गरजेपेक्षा जास्त असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, शासकीय रुग्णालयात बहुतांश औषधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे डॉक्टरांना नाइलाजाने रुग्णांना औषधी बाहेरून आणण्याचा सल्ला द्यावा लागत आहे. त्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात माहिती फलकाद्वारे औषधी उपलब्ध नसून, सहकार्य करण्याबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे.

केंद्रीय योजनेतून कॅल्शिअमचा पुरवठा
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कॅल्शिअम, व्हिटामीन्स आणि डिसइन्फेक्टंटचा पुरवठा हाफकीनकडून करण्यात आल्याची माहिती हाफकीनचे औषध खरेदी विभागाचे क्वॉलिटी कंट्रोल अधिकारी परमेश्वर कोगनुरे यांनी दिली.


‘डिसइन्फेक्टंट’ मुबलक, तरी अस्वच्छता कायम
शासकीय रुग्णालयातील वार्डाच्या स्वच्छतेसाठी डिसइन्फेक्टंटचा वापर केला जातो. गत काही दिवसात हाफकीनकडून डिसइन्फेक्टंटचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला, तरी रुग्णालयातील अस्वच्छता कायम आहे.

 

Web Title: Supply of Calcium, Disinfectant Than Drugs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.