अकोल्यात कडक निर्बंधांचे पालन: दुकाने बंद; रस्त्यांवरील गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 12:31 PM2021-04-11T12:31:55+5:302021-04-11T12:32:07+5:30

Lockdown in Akola : अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने व्यापाऱ्यांकडून बंद ठेवण्यात आली.

Strict restrictions in Akola: shops closed; The crowds on the streets subsided | अकोल्यात कडक निर्बंधांचे पालन: दुकाने बंद; रस्त्यांवरील गर्दी ओसरली

अकोल्यात कडक निर्बंधांचे पालन: दुकाने बंद; रस्त्यांवरील गर्दी ओसरली

googlenewsNext

अकोला: कोरोना विषाणूचा वाढता कहर नियंत्रित करण्यासाठी शासन आणि प्रशासनामार्फत लागू केलेल्या कडक निर्बंधांचे पालन करीत, जिल्ह्यात पहिल्या दिवशी (शनिवारी) ‘लॉकडाऊन’ पाळण्यात आले. अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने व्यापाऱ्यांकडून बंद ठेवण्यात आली. त्यामुळे रस्त्यांवरील गर्दीही ओसरल्याचे वास्तव चित्र होते.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता कहर नियंत्रित करण्यासाठी शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५ ते ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आणि शनिवार व रविवार असे दोन दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीत पहिल्या दिवशी शनिवार, १० एप्रिल रोजी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. व्यापाऱ्यांनी निर्बंधांचे पालन करून दुकाने बंद ठेवल्याने अकोला शहरासह जिल्ह्यातील शहरी भागात बाजार परिसर आणि रस्त्यांवर होणारी नागरिकांची गर्दी कमी झाल्याचे दिसत होते.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, अत्यावश्यक सेवा होती सुरू!

अकोला शहरातील विविध भागांत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद होती. रुग्णालये, रोगनिदान केंद्र, औषधीची दुकाने, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्र, भाजीपाला दुकाने, बेकरी, मिठाईची दुकाने, फळांची विक्री, पेट्रोलपंप, रेल्वे, आटोरिक्षा, सार्वजनिक बससेवा, शिवभोजन केंद्र आदी जीवनाश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा सुरू होती. इतर दुकाने बंद ठेवण्यात आल्याने अकोला शहरातील जनता बाजार परिसरासह गांधी रोड, टिळक रोड, चांदेकर चौक ते फतेह चौक, टाॅवर चौक, रेल्वेस्टेशन चौक, गोरक्षण रोड आदी विविध भागात रस्त्यांवर होणारी नागरिकांची गर्दी कमी झाली होती. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. जिल्ह्यातील विविध भागातही असेच चित्र होते.

 

पोलिसांची गस्त होती सुरू !

कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी अकोला शहरातील विविध भागांत शनिवारी पोलीस पथकांची गस्त सुरू होती. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून पाहणी करण्यात येत होती.

Web Title: Strict restrictions in Akola: shops closed; The crowds on the streets subsided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.