अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यभर छापे; दीड कोटी रुपयांचे बनावट सॅनिटायजर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:14 AM2020-04-04T10:14:13+5:302020-04-04T10:17:02+5:30

तब्बल एक कोटी ५३ लाख रुपयांचे अप्रमाणित सॅनिटायजर्स जप्त करण्यात आले आहे.

State-wide raids of the Food and Drug Administration Department; One and a half crore fake sanitizer seized | अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यभर छापे; दीड कोटी रुपयांचे बनावट सॅनिटायजर जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यभर छापे; दीड कोटी रुपयांचे बनावट सॅनिटायजर जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देगत आठवड्यात आतापर्यंत साधारणपणे चार हजार ५०० दुकानांची तपासणी केली आहे. ५० जणांविरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.

- सचिन राऊत

अकोला : राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्यानंतर मोठ्या संकटातून राज्याची वाटचाल यशस्वीरीत्या सुरु असली तरी काही समाजकंटकांनी अशा संकटाच्या काळातही सॅनिटायजर आणि मास्कचा काळाबाजार आणि गौरखधंदा सुरु करताच अन्न व औषध प्रशासन विभागाने गत आठवड्यात राज्यभर धाडसत्र राबवित साडेचार हजार औषध दुकानांची तपासणी केली. यामध्ये तब्बल एक कोटी ५३ लाख रुपयांचे अप्रमाणित सॅनिटायजर्स जप्त करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने गत आठवड्यात आतापर्यंत साधारणपणे चार हजार ५०० दुकानांची तपासणी केली आहे. या तपासणीमध्ये मिळालेल्या माहितीवरून राज्यातील ३२ ठिकाणी धाडी टाकून ५० जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. मास्कची चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी आणि अप्रमाणित सॅनिटायजरचा काळाबाजार केल्यामुळे या ५० जणांविरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. या कारवायांमध्ये १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची अप्रमाणित सॅनिटायजर्स जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच मुदतबाह्य औषधांची विक्री सुरू असल्याचेही या तपासणीत समोर आले असून, अवैधरीत्या मास्कची विक्री करणाऱ्यांवरही या तपासणीमध्ये कारवाई करण्यात आली आहे. काळाबाजार आणि बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर पोलीस कारवाईसाठी तक्रारी करण्यात आल्या आहेत.
 
जप्त केलेले सॅनिटायजर अप्रमाणित
राज्यभर केलेल्या कारवायांमधून तब्बल दीड कोटी रुपयांचे सॅनिटायजर्स जप्त केले आहे. त्यानंतर या सॅनिटायजर्सचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, यामधील बहुतांश सॅनिटायजर्सचा फार्म्युला योग्य नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
----------------------
मुदत संपलेल्या सॅनिटायजर्स व औषधांची विक्री!
छापेमारीत सॅनिटायजर्ससह काही औषधांची मुदत संपलेली असतानाही त्यांची विक्री बिनबोभाट सुरू असल्याचे उघडकीस आले. अशा दुकानदारांचीही यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्यावरही कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.
 
अवैधरीत्या मास्क विक्री करणाºया सहा जणांवर कारवाई
राज्यातील सहा दुकानदार अवैधरीत्या मास्क विक्री करीत असल्याचे आढळले. या सहा औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच काही जण प्रमाणित नसलेल्या कापडाचे एक तसेच दोन थरांचे मास्क बनवून विकत असल्याचेही या तपासणीत समोर आले.
 
या शहरांमध्ये धाडसत्र
मास्क आणि सॅनिटायजर्सचा मोठ्या शहरांमध्ये अधिक प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे झाल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार राज्यातील मुंबई, ठाणे, भिवंडी, नाशिक औरंगाबाद आणि नागपूर या शहरांमधील औषध दुकाने व काही अड्ड्यांवर अशा एकूण ३२ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.

 

Web Title: State-wide raids of the Food and Drug Administration Department; One and a half crore fake sanitizer seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.