महिनाभराच्या उशिराने शिक्षकांच्या खात्यात जमा होते पगाराची रक्कम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:57+5:302021-05-14T04:18:57+5:30

अकोला : शालार्थ ऑनलाईन प्रणालीप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार दरमहा ५ तारखेपर्यंत होणे अपेक्षित असताना, गत वर्षभरापासून जिल्ह्यात जिल्हा ...

The salary amount is credited to the teacher's account late in the month! | महिनाभराच्या उशिराने शिक्षकांच्या खात्यात जमा होते पगाराची रक्कम!

महिनाभराच्या उशिराने शिक्षकांच्या खात्यात जमा होते पगाराची रक्कम!

Next

अकोला : शालार्थ ऑनलाईन प्रणालीप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार दरमहा ५ तारखेपर्यंत होणे अपेक्षित असताना, गत वर्षभरापासून जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या खात्यात महिनाभराच्या उशिराने दरमहा पगाराची रक्कम जमा होत आहे. त्यामुळे कोरोना काळात जिल्हा परिषद शिक्षकांना पगाराच्या रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे.

शासनाच्या शालार्थ ऑनलाईन प्रणालीप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शिक्षकांचे पगार दरमहा १ ते ५ तारखेपर्यंत होणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या वर्षभराच्या कालावधीत जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांच्या बँक खात्यात दरमहा एक महिन्याच्या कालावधीनंतर पगाराची रक्कम जमा होत आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या पगाराची रक्कम जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. त्यानंतर पंचायत समिती स्तरावरील शिक्षण विभागामार्फत शिक्षकांच्या पगाराची देयके संबंधित बँकांमध्ये सादर केल्यानंतर बँकांमार्फत संबंधित शिक्षकांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा करण्यात येते. या प्रक्रियेत विलंब होत असल्याने जिल्हा परिषद शिक्षकांना दरमहा एक महिन्याच्या उशिराने पगार मिळत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या ९१४ शाळा असून, या शाळांमध्ये ३ हजार ३५३ शिक्षक कार्यरत आहेत. गत मार्च महिन्याच्या पगाराची रक्कम १० मे पर्यंत शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, एप्रिल महिन्याच्या पगाराची रक्कम अद्यापही जिल्हा परिषद शिक्षकांच्या खात्यात जमा झाली नाही. गत वर्षभरापासून पगाराची रक्कम महिनाभराच्या उशिराने खात्यात जमा होत असल्याने वैयक्तिक कामांसह घरबांधणी व इतर कारणांसाठी काढलेल्या कर्ज रकमेचा वेळेवर भरणा करणे शक्य होत नसल्याने कर्जाच्या रकमेवरील व्याजाच्या वाढीव रकमेचा भुर्दंड शिक्षकांना सहन करावा लागत आहे. त्यानुषंगाने कोरोना काळात जिल्हा परिषद शिक्षकांना दरमहा पगाराची प्रतीक्षा करावी लागत आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा

९१४

एकूण शिक्षक

३३५३

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार दरमहा वेळेवर झाले पाहिजे. यासंदर्भात जिल्ह्यातील पंचायत समित्यांना निर्देश देण्यात येणार आहेत.

सौरभ कटियार

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

कर्जाच्या रकमेची वेळेवर परतफेड कशी करणार?

शालार्थ ऑनलाईन प्रणालीप्रमाणे दरमहा १ ते ५ तारखेपर्यंत पगाराची रक्कम शिक्षकांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात दरमहा महिनाभराच्या उशिराने पगाराची रक्कम खात्यात जमा होत आहे. मार्च महिन्याच्या पगाराची रक्कम १० मे रोजी खात्यात जमा झाली. दरमहा पगाराची रक्कम उशिराने खात्यात जमा होत असल्याने वैयक्तिक कामांसह घरबांधणी व इतर कामांसाठी काढलेल्या कर्जाच्या रकमेचा भरणा वेळेवर करणे शक्य होत नसल्याने वाढीव व्याजाच्या रकमेचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

अजय पाटील

शिक्षक, जि. प. शाळा शिवणी.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार दरमहा महिनाभराच्या विलंबाने होत आहेत. पगाराची रक्कम खात्यात विलंबाने जमा होत असल्याने, वैयक्तिक कामांसह गृह कर्जाच्या रकमेचा हप्ता भरणे शक्य होत नाही. त्यामुळे अतिरिक्त व्याजाच्या रकमेचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे पगाराची रक्कम दरमहा पाच तारखेपर्यंत शिक्षकांच्या खात्यात जमा झाली पाहिजे.

राजकन्या सावळे

पदवीधर शिक्षक, जि. प. शाळा शिवणी.

जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन दरमहा महिनाभराच्या विलंबाने होत आहे. पगाराची रक्कम खात्यात जमा होण्यास विलंब होत असल्याने कर्जाची परतफेड करण्यास उशीर होत असल्याने, व्याजाच्या रकमेचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे दरमहा पाच तारखेपर्यंत शिक्षकांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.

मोहसीन खान अयुब खान

शिक्षक, जि. प. उर्दू शाळा, पंचगव्हाण.

Web Title: The salary amount is credited to the teacher's account late in the month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.