आपले सरकार केंद्रात सात-बाराचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:53 AM2019-12-20T10:53:14+5:302019-12-20T10:53:20+5:30

आपले सरकार सेवा केंद्र चालक गैरवापर करीत असल्याची तक्रार महसूल व वन विभागानेच माहिती तंत्रज्ञान विभागाकडे केली.

Saat-Bara extract given illigaly in CVC center | आपले सरकार केंद्रात सात-बाराचा गोरखधंदा

आपले सरकार केंद्रात सात-बाराचा गोरखधंदा

Next

- सदानंद सिरसाट  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नागरिकांना विनाशुल्क फक्त पाहण्यासाठी भूलेख, महाभूमी संकेतस्थळावर उपलब्ध सात-बारा, आठ-अ च्या प्रती काढून संबंधितांकडून रक्कम उकळण्यासाठी त्या प्रमाणित करण्याचा गोरखधंदा आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी सुरू केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच यापुढे केंद्र चालकांनी सात-बारा सही शिक्क्यानिशी प्रमाणित करून दिल्याचे आढळल्यास केंद्र चालकांवर गंभीर कारवाई करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी दिले आहेत.
आपले सरकार सेवा केंद्रामार्फत भूलेख संकेतस्थळावर नागरिकांना पाहण्यासाठी सात-बारा व आठ-अ उपलब्ध करण्यात आला. त्या सुविधेचा आपले सरकार सेवा केंद्र चालक गैरवापर करीत असल्याची तक्रार महसूल व वन विभागानेच माहिती तंत्रज्ञान विभागाकडे केली. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिले आहेत.
भूलेख, महाभूमी संकेतस्थळावर सात-बारा, आठ-अ उपलब्ध आहेत. आपले सरकार सेवा केंद्र चालक त्याच्या प्रती काढतात. त्यावर ‘फॉर व्ह्यू ओनली’ असे छापूनही येते. ज्या प्रतीवर असा वॉटरमार्क असेल ती फक्त माहितीसाठी आहे. त्याचा कोणत्याही प्रशासकीय, कायदेशीर कामासाठी वापर करता येत नाही. तरीही आपले सरकार सेवा केंद्र चालक या प्रतींवर सत्यतेची पडताळणी केल्याबाबत सही व शिक्का मारतात. हा प्रकार गंभीर आहे. या नकलांचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे केंद्र चालकांनी फक्त माहितीसाठी असलेल्या सात-बारा, ‘आठ-अ’वर सही व शिक्का मारून नागरिकांना देऊ नये, हा प्रकार आढळून आल्यास संबंधित तहसीलदार यांनी चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकाºयांनी दोषीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान विभागाच्या शासन निर्णयानुसार केंद्र चालकांवर कारवाई करावी, असेही बजावण्यात आले. याबाबतच्या तक्रारींवर जिल्हाधिकाºयांनी दर तीन महिन्यांनी आढावा घेत कारवाईचे अनुपालनही मागविण्यात आले आहे.

Web Title: Saat-Bara extract given illigaly in CVC center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.