Provide quality and uninterrupted service to customers! - Sanjay Dhotre | ग्राहकांना दर्जेदार अखंडीत सेवा पुरवा! - केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे निर्देश
ग्राहकांना दर्जेदार अखंडीत सेवा पुरवा! - केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे निर्देश

अकोला : इंटरनेट ही आधुनिक काळातील अत्यावश्यक गरज झाली आहे. ही सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांनी स्वत:चा फायदा नंतर आधी प्रत्येक ग्राहकाला दर्जेदार तसेच अखंडीत सेवा पुरविण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास, दुरसंचार व माहिती तंत्रज्ञान केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांनी दिले. स्थानिक बीएसएनल कार्यालयात आयोजीत बीएसएनएल आणि खाजगी टेलीकॉम आॅपरेटर्सच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते.
केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांनी भारत संचार निगम लिमीटेड कार्यालयात संबंधित विभाग आणि खाजगी टेलीकॉम कंपनीच्यावतीने जिल्ह्यात उपलब्ध केल्या जाणाºया सुविधेचा आढावा घेतला. यादरम्यान, एअरटेल, रिलायन्स जीओ, आयडीया आदी कंपन्यांचे अनेक भागात नेटवर्कमध्ये वारंवार अडथळा निर्माण होत असल्याचे लक्षात आले. नागरीकांना इंटरनेट आणि मोबाईल डाटाची गरज लक्षात घेता, ग्राहकांना नेटवर्क देण्यासाठी संबंधित कंपन्यांनी कोणत्या प्रकारचे नियोजन केले, याबाबत ना.धोत्रे यांनी माहीती घेतली. दरम्यान खाजगी टेलीकॉम आॅपरेटर्सनी नेटवर्कची समस्या निकाली काढण्यासाठी आढावा अवधी मागितला. या अवधीत समस्या निकाली काढण्याचे ना.संजय धोत्रे यांनी दिले. पुरेशा नेटवर्कसाठी मोबाईल टॉवर्स उभारण्याचा पर्याय असला तरी शहरात जागेची समस्या असल्याचे सांगण्यात आले. यावर ना.धोत्रे यांनी अल्पशा भाड्यात नागरीक कोट्यवधी रुपयांच्या जागा तुम्हाला वापरायला देणार नाहीत. त्यामुळे नागरीकांना जागेचा वापर करता येईल आणि तुमचे टॉवर देखील बांधता येईल, असे पर्याय शोधण्याची सूचना त्यांनी केली. कंपन्यांनी स्वत:च्या फायद्याचा विचार न करता, ग्राहकांना दजेर्दार सुविधा देण्यावरही लक्ष केंद्रीत करण्याची सूचना ना.धोत्रे यांनी केली. या बैठकीला बीएसएनएलचे महाव्यवस्थापक पवन बारापत्रे, दुरसंचार विभाग नागपुरचे राजेंद्र मेश्राम, अशोक मोहबे, अजय मेहत्रे, बीएसएनएल अकोलाचे अन्सारखान, एस.के.चैताणी, सी.आर.ढोले, प्रशांत पोफळे, व्ही.डी.मिश्रा आदींसह खासगी कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

केबलचे जाळे टाकताना नियोजन करा!
सद्या देशभरात रस्त्यांचे जाळे विणल्या जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजुला केबल टाकण्यापूर्वी पुढील दहा वर्षांची परिस्थिती लक्षात घ्यावी. सद्या रस्ता रुंदीकरणाची कामे सुरु असल्याने अनेक ठिकाणी केबल तुटतात. त्यामुळे सेवा खंडीत होते आणि ग्राहकांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे केबल टाकताना कंपन्यांनी नियोजन करुन काम करण्याचे निर्देश ना.धोत्रे यांनी दिले.शासकीय जागांना प्राधान्य द्या!
खाजगी दुरसंचार कंपन्यांना मोबाईल टॉवर उभारण्यासाठी आवश्यक जमीन देण्यास नागरिक पुढे येत नाहीत. त्यांना पाहीजे तेवढा मोबदला मिळत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे खाजगी दुरसंचार कंपन्यांनी शासकीय जागांना प्राधान्य द्यावे, अशी सुचना केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांनी केली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ तसेच मनपा आयुक्तांसोबत संयुक्त बैठक घेण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.


Web Title: Provide quality and uninterrupted service to customers! - Sanjay Dhotre
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.