लग्न समारंभ, साेहळ्यात गर्दी; काेचिंग क्लासमध्येच काेराेना हाेताे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:05 PM2021-01-12T12:05:58+5:302021-01-12T12:06:11+5:30

CoronaVirus जिल्हा प्रशासन व शासनाने सकारात्मकदृष्ट्या पाहणे गरजेचे असल्याचे मत काेचिंग क्लास संचालकांनी साेमवारी ‘लाेकमत’कडे व्यक्त केले.

Parents ask whether corona infection only in Coaching Classes | लग्न समारंभ, साेहळ्यात गर्दी; काेचिंग क्लासमध्येच काेराेना हाेताे का?

लग्न समारंभ, साेहळ्यात गर्दी; काेचिंग क्लासमध्येच काेराेना हाेताे का?

Next

अकाेला : जिल्हा प्रशासनाने ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न समारंभ व इतर साेहळ्यांना दिलेल्या परवानगीचे नागरिकांनी तीनतेरा वाजविले आहेत. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये माेठ्या व्यक्तींसह लहान मुलांची गर्दी हाेत असताना केवळ काेचिंग क्लासमध्येच मुलांना काेराेनाची लागण हाेते का, असा संतप्त सवाल पालक वर्गातून उपस्थित हाेऊ लागला आहे. माेबाइलमुळे ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना व पर्यायाने पालकांना सहन करावे लागत आहेत. या विषयाकडे जिल्हा प्रशासन व शासनाने सकारात्मकदृष्ट्या पाहणे गरजेचे असल्याचे मत काेचिंग क्लास संचालकांनी साेमवारी ‘लाेकमत’कडे व्यक्त केले.

काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी मागील दहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांना माेबाइलद्वारे ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र व राज्य शासनाने घेतलेला निर्णय याेग्य असला तरी शासनाने टाळेबंदी शिथिल करीत सर्वच उद्याेग, व्यवसाय सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत आर्थिक संकटात सापडलेल्या उद्याेगांना ‘बुस्टर डाेस’ देण्याचे धाेरण अवलंबिले जात आहे. साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची अट नमूद करीत ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न, धार्मिक साेहळे, समारंभ साजरे करण्याला परवानगी देण्यात आली आहे. संबंधित कार्यक्रमांमध्ये काेराेनाच्या नियमावलीला पायदळी तुडवीत नागरिक माेठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. लग्नाच्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर ठेका धरला जात आहे. अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी मुलांना काेराेनाची लागण न हाेता ती केवळ शिकवणी वर्गातच हाेते का, असा संतप्त सवाल पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे.

 

ऑनलाइन शिक्षणामुळे सर्वाधिक नुकसान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाेत आहे. माेबाइलवर शिकवणीदरम्यान विद्यार्थी विचलित हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ऑफलाइनमध्ये विद्यार्थी शिक्षकांसाेबत सहजतेने संवाद साधू शकतात.

-भालचंद्र सुर्वे संचालक, सिद्धांत काेचिंग क्लासेस

 

ऑनलाइन शिक्षणामुळे यंदा १० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नसल्याचे विद्यार्थी सांगतात, तसेच ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने त्यांचे आराेग्य धाेक्यात आले असून, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शहरात इतर कार्यक्रम माेठ्या धडाक्यात सुरू असताना ऑफलाइन शिक्षणावरील निर्बंध अनाकलनीय ठरत आहेत.

-वसीम चाैधरी संचालक, चाैधरी काेचिंग क्लासेस

 

 

विद्यार्थी घरी मन लावून अभ्यास करीत नाहीत, ऑनलाइन क्लासच्या नावाखाली माेबाइलचा दुरुपयाेग वाढल्याची चिंता पालकांमधून व्यक्त केली जात आहे. शासनाने इयत्ता ९ वी, १० वी व १२ वीचे वर्ग सुरू केले. अशा स्थितीत ऑफलाइन शिकवणीला आडकाठी अपेक्षित नाही. शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी पालक आग्रही आहेत.

-विवेक शास्त्रकार संचालक, उत्कर्ष एज्युकेशन

 

यंदा काेराेनामुळे शासनाने १० वीचा अभ्यासक्रम कमी केला. ८० टक्के विद्यार्थी जेइइ, नीट आदी परीक्षेच्या माध्यमातून भविष्याची पेरणी करीत असतात. अशा परीक्षेसाठी मेहनत व परिश्रमाची गरज असताना ऑनलाइन प्रणालीमुळे यावर पाणी फेरले गेले असून अभ्यासाचा पाया कमजाेर झाला आहे. विद्यार्थ्यांमध्येही गाेंधळाची स्थिती असून ती आपल्याला समजून घ्यावी लागेल. त्यासाठी ऑफलाइन क्लास हाच पर्याय आहे.

- हरणित सिंग संचालक, ब्राइट करिअर एज्युकेशन

 

 

Web Title: Parents ask whether corona infection only in Coaching Classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.