पाणीटंचाई निवारणाची केवळ ४७ कामे पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 10:31 AM2020-06-13T10:31:02+5:302020-06-13T10:31:10+5:30

पावसाळा सुरू झाला असून, उर्वरित ४७९ कामे अद्याप प्रलंबित आहेत.

Only 47 water scarcity works completed! | पाणीटंचाई निवारणाची केवळ ४७ कामे पूर्ण!

पाणीटंचाई निवारणाची केवळ ४७ कामे पूर्ण!

googlenewsNext

- संतोष येलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ५ जूनपर्यंत पाणीटंचाई निवारणाची केवळ ४७ कामे पूर्ण करण्यात आली असून, ६० कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाळा सुरू झाला असून, उर्वरित ४७९ कामे अद्याप प्रलंबित आहेत.
यावर्षीच्या गत उन्हाळ्यात जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील ४९१ गावांमध्ये विविध ५८६ उपाययोजनांची कामे कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांनुसार १३६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ११० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या कामांपैकी ५ जूनपर्यंत जिल्ह्यातील केवळ ४५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४७ कामे पूर्ण करण्यात आली असून, ६० उपाययोजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. उन्हाळा संपला असून, पावसाळा सुरू झाल्याने, ३० जूनपर्यंतच पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात प्रस्तावित जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची उर्वरित प्रलंबित असलेली ४७९ कामे ३० जूनपर्यंत पूर्ण कशी होणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


पूर्ण केलेल्या कामांचा निधीही प्रलंबित!

जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी ४५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४७ कामे पूर्ण करण्यात आली; मात्र पूर्ण करण्यात आलेल्या या कामांचा ६२ लाख १६ हजार रुपयांचा निधीही अद्याप शासनामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त होणे प्रलंबित आहे. तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा निधीदेखील प्रलंबित आहे.


प्रगतिपथावर अशी आहेत कामे!
जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाची ६० कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये ७ तात्पुरत्या पूरक नळयोजना, १८ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, १५ नवीन विंधन विहिरी व २० हातपंपांची दुरुस्ती इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश असून, सुरू असलेली ही कामे ३० जूनपर्यंत पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होती. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कमीत-कमी कामे करण्यात आली. ‘कोरोना’संकटाच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी निधीदेखिल उपलब्ध नाही.
- किशोर ढवळे
कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.

 

Web Title: Only 47 water scarcity works completed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.