ना ऑक्सिजन पॉईंट, ना मनुष्यबळ; सुपर स्पेशालिटी कसे सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 11:17 AM2021-05-09T11:17:19+5:302021-05-09T11:18:10+5:30

Super Specialty Hospital in Akola : पदनिर्मिती आणि पदभरतीच्या प्रतीक्षेत अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे.

No oxygen point, no manpower; How will the super specialty start? | ना ऑक्सिजन पॉईंट, ना मनुष्यबळ; सुपर स्पेशालिटी कसे सुरू होणार?

ना ऑक्सिजन पॉईंट, ना मनुष्यबळ; सुपर स्पेशालिटी कसे सुरू होणार?

Next
ठळक मुद्दे२५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिले.२२ दिवसांत आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

- प्रवीण खेते

अकोला : कोविडच्या संभाव्य गंभीर परिस्थितीची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात सुपर स्पेशालिटीच्या इमारतीत २५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिले होते, मात्र वस्तुस्थिती पाहता येथे ३० मेपर्यंत कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. लोकमतने प्रत्यक्ष पाहणी केल्यावर इमारतीमध्ये अद्याप ऑक्सिजन पाॅईंटच्या कामाला सुरुवात झाली नसून इतर अत्यावश्यक कामेही प्रलंबित असल्याचे चित्र दिसून आले. पदनिर्मिती आणि पदभरतीच्या प्रतीक्षेत अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, शासकीय आरोग्य यंत्रणेवर कोविडच्या गंभीर रुग्णांचा ताण वाढला असून आगामी काळात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून ३० मेपर्यंत सुपर स्पेशालिटी रुग्णालयात २५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश शुक्रवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. या पार्श्वभूमीवर शनिवारी ‘लोकमत’ने सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली. बाहेरून इमारतीचे काम पूर्ण झाल्याचे दिसत असले, तरी इमारतीच्या आतील काही काम अद्याप सुरू आहे. शिवाय, इलेक्ट्रिसिटीचे काही काम अद्यापही बाकी आहे. विशेष म्हणजे कोविड रुग्णालयासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन पॉईंटची गरज भासणार आहे, मात्र येथे ऑक्सिजन पॉईंट नाही, तसेच अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचेही इन्स्टॉलेशन झालेले नाही. त्यामुळे येत्या २२ दिवसांत आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

 

वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन रखडले

वैद्यकीय उपकरणे येऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला.

अद्यापही त्यांचे इन्स्टॉलेशन नाही.

प्रामुख्याने सीटी स्कॅन, एक्स-रे मशीन इन्स्टॉलेशनची गरज.

तंत्रज्ञ आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी इन्स्टॉलेशन रखडले.

 

२२ दिवसांतील मोठे आव्हाने

इमारतीच्या तिन्ही मजल्यावर ऑक्सिजन पॉईंटची निर्मिती करणे.

उर्वरित इलेक्ट्रिक जोडणीचे काम पूर्ण करणे.

स्वच्छता तसेच खाटांचे व्यवस्थापन करणे.

खासगी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करणे.

इतर वैद्यकीय पदभरती प्रक्रिया राबविणे.

ऑक्सिजनची करावी लागणार अतिरिक्त व्यवस्था

सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयाला तंतोतंत पुरेल एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो, तर खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची नेहमीच टंचाई भासत आहे. ही परिस्थिती पाहता प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालयात २५० खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी अतिरिक्त ऑक्सिजनची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी अतिरिक्त ऑक्सिजनची व्यवस्था कशी करायची, हेदेखील मोठे आव्हान जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासमोर आहे.

 

वेतनावर होणार सुमारे १० ते १२ कोटींचा खर्च

कोविड रुग्णालय चालविण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर वैद्यकीय कर्मचारी, तंत्रज्ञ आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. या पदांच्या वेतनासाठी सहा महिन्यांकरिता सुमारे १० ते १२ कोटींचा खर्च येण्याची शक्यता असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

असे लागणार मनुष्यबळ

वैद्यकीय अधिकारी - ६० ते ७०

स्टाफ नर्स - १६०

वॉर्ड बॉय - १६०

फार्मासिस्ट

लॅब टेक्निशियन

एक्स-रे टेक्निशियन

कोविड रुग्णालयाची क्षमता

ऑक्सिजन खाटा - २००

आयसीयू खाटा -५०

Web Title: No oxygen point, no manpower; How will the super specialty start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.