अकोल्यात ‘लॉकडाऊन रिटर्न्स’; व्यापार क्षेत्रात संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 10:18 AM2020-07-13T10:18:45+5:302020-07-13T10:18:58+5:30

लॉकडाऊन रिटर्न्स कसा राहणार, या बाबत शहरातील उद्योग, व्यापर क्षेत्रात संभ्रमाची स्थिती आहे.

‘Lockdown Returns’ in Akola; Confusion in the business world! | अकोल्यात ‘लॉकडाऊन रिटर्न्स’; व्यापार क्षेत्रात संभ्रम!

अकोल्यात ‘लॉकडाऊन रिटर्न्स’; व्यापार क्षेत्रात संभ्रम!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्यातील कोरोनाबधितांची संख्या आता २ हजारांच्या उंबरठ्यावर तर मृत्यूची संख्या शतकाच्या जवळ आली असून, विदर्भातील हॉटस्पॉट म्हणून अकोल्याची ओळख झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यभरातील मोठ्या शहरांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची सुरुवात केल्यानंतर शनिवारी पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यातही येत्या १८ ते २० जुलैदरम्यानच्या तीन दिवसात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वी १ ते ६ जूनपर्यंत ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय जाहीर झाल्यानंतरही हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. या पृष्ठभूमीवर लॉकडाऊन रिटर्न्स कसा राहणार, या बाबत शहरातील उद्योग, व्यापर क्षेत्रात संभ्रमाची स्थिती आहे.
अकोल्यात गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत गेलेली कोविड-१९ रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरू झालेल्या ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत नागरिकांना दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची सूट देण्यात आली. काही बंधने पाळून आणि दिशानिर्देशाचे पालन करून नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार करण्याची मुभा दिली. जर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये, असेही राज्य शासनाने म्हटले होते; मात्र राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर महानगरपालिकेने दिलेल्या दिशानिर्देशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे सातत्याने दिसून आले. त्यामुळेच अकोल्यासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरले आहेत. या पृष्ठभूमीवर अकोल्यात तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.


सावरणाऱ्या उद्योग क्षेत्राला ब्रेक
अकोला एमआयडीसी ही पश्चिम वºहाडातील सर्वात मोठे उद्योगक्षेत्र आहे. लॉकडाऊन काळातही परवानगी देण्यात आलेले काही उद्योग सुरू होते. आता अ‍ॅनलॉकनंतर मजुरांची चणचण जावत आहे. त्यामुळे दाल मिल, आॅइल मिल यासह लहान-मोठे ६0 टक्के उद्योग सुरू झाले आहेत. पुन्हा मोठे लॉकडाऊन झाल्यास उद्योगक्षेत्राला फटका बसण्याची चिन्हे आहेत.


रविवारचा बंद अन् सम-विषमचा फटका
४१८ ते २० दरम्यान जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये रविवारचा दिवस येतो. रविवारी तसेही अकोल्यातील अर्धेधिक व्यवसाय बंद असतात. त्यातच आता सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याचे बंधन असल्याने या तीन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे काही व्यावसायिकांची दुकाने चार ते पाच दिवस बंद राहू शकतात.


विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली!
अनेक जण विनाकारण शहरात फिरत आहे. दुचाकींवर दोन व्यक्ती तर चार चाकी वाहनांत पाच-पाच व्यक्ती फिरत आहे. परिणामी आता कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे पोलीस, मनपाच्या यंत्रणेने केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होते. शुक्रवार, शनिवार या दोन दिवसात ७६० जणांवर गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ३ लाख ६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


तीन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटेल का?
रुग्णवाढीचा वेग हा अकोला शहरासह ग्रामीण भागातही झपाट्याने होत आहे. शहर व ग्रामीण भागात लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढले. त्यामुळे तीन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे खरेच कोरोनाची साखळी तुटेल का, याबाबतही संभ्रम व्यक्त केला जात आहे. खरे तर लॉकडाउन हा एक मार्ग आहे; मात्र तो एकमेव मार्ग नाही. आताच्या गंभीर परिस्थितीवर मृत्यूदर कमी करणे व रुग्णांना सुविधा देणे यावर भर हवा, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


डॉक्टर म्हणतात...
आताच्या स्थितीत तीन दिवसांच्या लॉकडाऊनचा फारसा फरक पडणार नाही, लॉकडाऊन ही प्राथमिक स्तरावरची उपायोजना होती. आता टेस्ट वाढविणे व जीएमसीवर रुग्णांचा विश्वास बसेल, अशा सुविधा पुरविण्याची गरज आहे. बैदपुºयामध्ये प्रत्यक्ष काम केल्यावर मी या निष्कर्षाप्रत पोहचलो आहे.
- डॉ. जिशान हुसेन,
फिजिशियन

खूप असा फरक पडणार नाही; पण थोडा दिलासा मिळू शकतो. खरे तर नागरिकांची जबाबदारी आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल, तर नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा आणि नियमित हात धुवावे.
- डॉ. समीर लोटे,
फुप्फुस विकार तज्ज्ञ, अकोला

अनलॉकनंतर आता हळूहळू व्यापार सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. या घोषणेबाबत सध्या चेंबरच्या सदस्यांसोबत चर्चा सुरू आहे. लॉकडाऊन कसा असला पाहिजे, याबाबत सदस्यांकडून सूचना मागितल्या आहेत. येत्या दोन दिवसात या सूचनांनुसार प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेऊ. चेंबरने नेहमीच प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतली आहे.
- राजकुमार बिलाला,
अध्यक्ष विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स

विदर्भातून कोरोनाचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण अकोला जिल्ह्यासह शहरात आढळून येत आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य नसल्यामुळे की काय, अवघ्या तीन दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ची हास्यास्पद घोषणा करण्यात आली. कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्यासह किमान १० ते १२ दिवसांचा कडकडीत बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. परिस्थिती लक्षात घेता ‘लॉकडाऊन’च्या निर्णयावर शंका उपस्थित होत आहेत. याचा विपरीत परिणाम व्यवसायावर होत आहे.
- रमेश कोठारी अध्यक्ष, होलसेल अ‍ॅण्ड रिटेल रेडिमेड होजियरी

 

 

 

 

 

Web Title: ‘Lockdown Returns’ in Akola; Confusion in the business world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.