अकोला जिल्हय़ातील वैभवसंपन्न काटेपूर्णा अभयारण्याची त्रिदशकपूर्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:24 AM2018-02-08T02:24:13+5:302018-02-08T02:25:58+5:30

अकोला : अकोला आणि वाशिम जिल्हय़ाच्या सीमेवर ७३.६९ वर्ग कि.मी. क्षेत्रात विस्तीर्ण पसरलेले वैभवसंपन्न काटेपूर्णा अभयारण्य गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी तिसरी दशकपूर्ती साजरी करीत आहे. ३१ व्या वर्षात पदार्पण करणार्‍या या अभयारण्यास राज्य शासनाने ८ फेब्रुवारी १९८८ रोजी राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले. समृद्ध वन्य जीवांचा अधिवास असलेल्या या अभयारण्यामुळे अकोला जिल्हय़ांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

Khetapurna Wildlife Sanctuary in Akola district 30th Anniversary! | अकोला जिल्हय़ातील वैभवसंपन्न काटेपूर्णा अभयारण्याची त्रिदशकपूर्ती!

अकोला जिल्हय़ातील वैभवसंपन्न काटेपूर्णा अभयारण्याची त्रिदशकपूर्ती!

Next
ठळक मुद्देगुरुवार, ८ फेब्रुवारी - स्थापना दिवस

राम देशपांडे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला आणि वाशिम जिल्हय़ाच्या सीमेवर ७३.६९ वर्ग कि.मी. क्षेत्रात विस्तीर्ण पसरलेले वैभवसंपन्न काटेपूर्णा अभयारण्य गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी तिसरी दशकपूर्ती साजरी करीत आहे. ३१ व्या वर्षात पदार्पण करणार्‍या या अभयारण्यास राज्य शासनाने ८ फेब्रुवारी १९८८ रोजी राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले. समृद्ध वन्य जीवांचा अधिवास असलेल्या या अभयारण्यामुळे अकोला जिल्हय़ांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

अभयारण्यातील वन्य जीवांचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करता यावे, या कारणास्तव १९९६ मध्ये हे अभयारण्य प्रादेशिक वन विभागाकडून नवनिर्मित अकोला वन्य जीव विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. तेव्हापासून या अभयारण्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही अकोला वन्य जीव विभागाकडे आणि त्यावर संपूर्ण नियंत्रण मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावीचे मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक यांच्याकडे आहे. काटेपूर्णा अभयारण्य हे एक वन वर्तुळ असून, त्यात पाच नियतक्षेत्रे आहेत. परिसर सुजलाम-सुफलाम करणारी काटेपूर्णा याच अभयारण्यातून वाहते, तर अकोला शहराची तहान भागविणारे विस्तीर्ण जलाशय याच अभयारण्यालगत आहे. ७३.६९ वर्ग कि.मी. क्षेत्रात साग वृक्षाचे प्राबल्य असल्याने पानगळीचे वन आहे. आकाराने लहान व चहुबाजूंनी मानववस्तीने वेढलेले असले, तरी या अभयारण्यात बिबट, तरस, कोल्हे असे मांसभक्षी प्राण्यांसह नीलगाय, चितळ, भेकर, काळवीट आदी वन्य प्राणीदेखील आहेत. या वन्य प्राण्यांमुळे काटेपूर्णाला समृद्ध जीवन प्राप्त झाले असून, गेल्या तीन दशकांपासून त्यांच्या संरक्षणाची व संवर्धनाची जबाबदारी अभयारण्य प्रशासन निर्भीडपणे पार पाडत आहे. 
२0१३-१४ ते २0२२-२३ या कालावधीसाठी अभयारण्य व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यास शासनाची मंजुरीही मिळाली आहे. त्यात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना राबविली जाणार आहे. वन पर्यटनाच्या माध्यमातून सर्वंकष विकास व रोजगार उपलब्धी हा उद्देशसुद्धा वन्य प्रशासनाला यामुळे साध्य होणार आहे. वन्य प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व अधिवास यासाठी जल व मृदसंधारणाची अनेक कामे या आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. विकासात्मक दृष्टिकोनातून अभयारण्यात पर्यटकांसाठी सशुल्क जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे. जंगलाची माहिती दर्शविणारी उद्बोधक फलके, सेल्फी पॉइंट, पर्यटकांना राहण्याची व्यवस्था अशा अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यापुढे पर्यटकांना दर पौर्णिमेला अभयारण्यातील मचानांवर बसून वन्य प्राणी न्याहाळता येणार आहेत. 

Web Title: Khetapurna Wildlife Sanctuary in Akola district 30th Anniversary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.