महान धरणाचे पाणलोट क्षेत्र पडले उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:06 PM2019-07-29T14:06:51+5:302019-07-29T14:07:21+5:30

महान : काटेपूर्णा धरणाच्या क्षेत्रात दीड महिना लोटूनही पाऊस न झाल्याने धरणात केवळ ३ टक्के जलसाठा असून, १४ वर्षांनंतर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडले आहे.

katepurna dam dried up; no water in catchment area | महान धरणाचे पाणलोट क्षेत्र पडले उघडे

महान धरणाचे पाणलोट क्षेत्र पडले उघडे

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
महान : काटेपूर्णा धरणाच्या क्षेत्रात दीड महिना लोटूनही पाऊस न झाल्याने धरणात केवळ ३ टक्के जलसाठा असून, १४ वर्षांनंतर धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडे पडले आहे. धरणाचा चौथा व्हॉल्व्हही उघडा पडण्याच्या मार्गावर येऊन पोहोचला आहे.
महान धरणाचा एकूण बुडीत क्षेत्र १२४३ हेक्टर असून, यामधून शेकडो हेक्टर बुडीत क्षेत्र आज रोजी उघड्यावर पडलेले दिसत आहे. महान धरणाच्या काठावर असलेले जांभरूण, कोथळी, वरखेड-देवदरी, धानोरा व फेट्रा या गावांतील पाणलोट क्षेत्र पूर्णपणे उघड्यावर पडलेले आहे. तसेच धरणामधील पुनर्वसन झालेले जुने गाव कोपळी, साथळी व वाघा या गावांची जागा उघड्यावर येऊन दीपमाया मंदिरदेखील संपूर्णपणे कोरडेठण्ण झाले आहे.
श्रीक्षेत्र महादेव संस्थान वाघाकडील धरणाचे बुडीत क्षेत्र उघड्यावर पडले असून, गंगामातेच्या मंदिरापासून पाणी शेकडो फूट दूर गेल्याने धरणामधील टेकड्यासुद्धा उघड्या पडल्या आहेत. काटेपूर्णा अभयारण्य असून, वन्यजीव विभागामार्फत धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे उभारण्यात आले आहेत. मालेगाव परिसरातून येणारी काटाकोंडाळा नदीचे पात्र कोरडे असल्याने आज रोजी गुरेढोरे चरताना दिसत आहेत. महान धरणाची अशी परिस्थिती याअगोदर २००५ मध्ये झाली होती. तब्बल १४ वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी तीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. ज्या ठिकाणी नेहमी धरणाचे पाणी दिसायचे, त्या ठिकाणी आज रोजी हिरवेगार गवत दिसत आहे.मालेगाव परिसरात दमदार मुसळधार पावसाची महान धरणाला आज रोजी अत्यंत आवश्यकता आहे. मालेगाव पाणलोट क्षेत्र ते महान धरण यादरम्यान असलेले १० लघू तलाव १०० टक्के भरल्याशिवाय त्या भागातील पाणी काटाकोंडाळा नदीने महान धरणात येऊ शकणार नाही. सर्वप्रथम हे १० लघू तलाव १०० टक्के भरणे खूप गरजेचे आहे. त्यानंतरच या भागातील पाणी काटाकोंडळा नदीपात्रातून वाहून पाणी सरळ महान धरणात येऊन मिसळणार, हे विशेष. सध्या सुरू असलेले पावसाचे पाणी असेच कासव गतीने पडल्यास महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ न होता उपलब्ध असलेला जिवंत जलसाठ्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊन शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.  


अकोला शहरावर पाणीटंंचाईचे संकट कायमच!
महान धरणाच्या जलसाठ्याची झपाट्याने घट होत असल्याने अकोला शहरावर त्याचे सावट निर्माण झाले आहे. गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी धरणाच्या बुडीत क्षेत्रातून पाणी दिल्या जाते; परंतु यावर्षी पावसाला दोन महिने होत असूनही, धरणाच्या पाणी पातळीत तीळमात्रही वाढ न होऊ शकल्यामुळे शेतकरी वर्गसुद्धा मोठ्या संकटात सापडला आहे.

Web Title: katepurna dam dried up; no water in catchment area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.