Government schemes benefit farmers along with common people - Amol Mitkari | सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना योजनांचा लाभ पोहोचवणार - अमोल मिटकरी

सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना योजनांचा लाभ पोहोचवणार - अमोल मिटकरी

- प्रशांत विखे
 तेल्हारा : पदाचा सदुपयोग करून शैक्षणिक, आरोग्य, कृषीविषयक याविषयी विकासात्मक धोरण राबवणे तसेच शासनाच्या योजना सर्वसामान्य व शेतकºयांपर्यंत पोहोचविणे हे उद्दिष्ट राहणार अल्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल मिटकरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पश्चिम विदर्भामध्ये पक्ष मजबूत करून जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


प्रश्न : ज्येष्ठ नेत्यांची मोठी मांदियाळी आपल्या पक्षात आहे. आपण त्यांच्याशी कसे जुळवून घ्याल?
आमचा पक्ष हा काही भारतीय जनता पार्टी नाही. या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची काय दशा झाली आहे, हे सर्वश्रुत आहे. राहिला विषय माझा व माझ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा, तर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांपासून तर मग अजित पवार, सुप्रियाताई, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळपर्यंत या सर्वांचे मी जरी नवखा असलो तरी मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आले आहे. माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवून मला जुळवून घेतले असल्याने मला हे पद मिळाले. या पक्षाशी जुळायचे असल्यानेच मी पक्षाकडे गेलो, म्हणून आम्ही आधीच एकमेकांशी जुळलो आहे.


प्रश्न : जिल्ह्यातील पक्षाची स्थिती आपणास माहिती आहेच. आपली आमदारकी याला कितपत बळ देणारी ठरेल?
पाहिजे त्या प्रमाणात पक्ष जिल्ह्यात वाढला नाही, ही वस्तुस्थिती आहे. कदाचित यालाच बळ देण्यासाठी पक्षाने जबाबदारी दिली. मी स्वत: पक्षाकडे या जिल्ह्याचे पक्षाचे पालकत्व मागितले आहे. त्यादृष्टीने पक्ष बांधणी करून भविष्यात होणाºया लोकसभा व पाच विधानसभा मतदारसंघ आमचे लक्ष्य असून, त्यादृष्टीने पक्ष वाढीच्या कामाला गती देऊन पक्ष वाढविला जाईल.


प्रश्न : विधान परिषदेनंतर लक्ष्य विधानसभा असेल का, कोणता मतदारसंघ निवडाल?
पक्ष जी जबाबदारी देईल ती निष्ठेने पार पाडेल. मग त्यामध्ये पक्षाने जर भविष्यात विधानसभा निवडणूक लढविण्याचा आदेश दिला तर ते देखील करू. पक्षाने या बाबतीत विचारणा केली तर निश्चितच प्राधान्य माझा होम ग्राउंड असलेला अकोला पूर्व मतदारसंघाला राहील आणि तुमची इच्छा असेल तर अकोटसुद्धा.


प्रश्न : आपण वक्तृत्वाचे धनी आहात. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी काही प्लॅन तयार आहे का?
वक्तृत्व ही एक कला आहे. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करावे लागते. हा या दोघांमधील फरक आहे. वक्तृत्वामुळेच मी आता कर्तृत्वापर्यंत पोहोचलो आहे. आता प्राधान्य कर्तृत्वालाच असेल. त्यादृष्टीने नियोजन करणे सुरू आहे. आमदार झाल्यापासून कामाला लागलो असून, मूर्तिजापूर, अकोट येथे भेट देऊन आवश्यक ते दिशानिर्देश दिले आहेत.


प्रश्न : अकोला शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू याला जबाबदार कोण?
याला जबाबदार येथील आरोग्य विभाग व पोलीस विभागच आहे. आरोग्य विभागाचा गलथान कारभार पाहता प्रशासनामध्ये समन्वय नाही. सिव्हिल सर्जन राजकुमार चव्हाण यांच्याशी अनेक वेळा संवाद साधला असता त्यांचा फोन कायमस्वरूपी बंद येत होता. पोलीस विभागाकडून लॉकडाउनची शिस्त पाळल्या गेली नाही. त्यामुळे कोरोनामध्ये हा जिल्हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत अपयशी ठरल्याने लवकरच जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन शासनाला अवगत करून पुढील कार्यवाही केली जाईल.


प्रश्न : राजकारणात यशस्वी होण्यासाठी युवकांना काय संदेश देणार?
युवकांनी राजकारण करीत असताना सामाजिक अंधश्रद्धेसोबत राजकीय अंधश्रद्धा बाजूला ठेवावी. राजकारणात यशस्वी होण्यासाठी घराणेशाहीची गरज नसते किंवा कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षे केवळ नेत्यांच्या चपला, जोडे उचलायची गरज नसते. फक्त आपले कर्तव्य प्रामाणिक असले पाहिजे, हे मी माझ्या उदाहरणावरून सांगतो आहे.

 

Web Title: Government schemes benefit farmers along with common people - Amol Mitkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.