Goodfriday Day celebrations in Akola | अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा

अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी खिश्चन धर्मियांचा पवित्र सण गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहरातील दहा प्रार्थनास्थळांमध्ये (चर्च) यावेळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त रविवारी खिश्चन धर्मीय ईस्टर संडे हा सण साजरा करणार आहेत.
प्रभू येशू खिस्तांनी अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात गुड फ्रायडे (उत्तम शुक्रवार) हा सण साजरा केला जातो. अकोल्यातही शुक्रवारी हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ३० चर्चेसमधून प्रार्थनासभांचे सकाळी आणि दुपारी आयोजन करण्यात आले. खदान खिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये शुक्रवारी दुपारी १२ ते ३ या वेळात आयोजित प्रार्थनासभेमध्ये, प्रभू येशू खिस्तांनी क्रूसखांबावर लटकविण्यात आले असता उच्चारलेल्या सात वाक्यांवर बायबलच्या अभ्यासकांनी प्रकाश टाकला. यामध्ये प्रियंका वाळके, शीला खंडारे, मागार्रेट माघाडे, डॉ. शीतल ठाकूर, प्रिमला भिसे, मीनाक्षी वर्मा आणि रेव्हरंड निलेश अघमकर यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी संडेस्कूल, महिला संघ, तरुण संघाच्या सदस्यांनी गुडफ्रायडेवर आधारित गीते सादर केली. संचालन वैशाली डोंगरदिवे यांनी केले.
गेल्या चाळीस दिवसांपासून खिश्चन धर्मियांचा पवित्र लेन्थ महिना सुरु होता. या चाळीस दिवसांच्या काळात खिश्चन बंधू-भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात. घरोघरी कॉटेज प्रेअर्सचे आयोजन केले जाते. गुरुवारी मौंदी गुरुवारनिमित्त प्रार्थनासभा होते.

प्रात:समयीची प्रार्थना
दरम्यान, रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त जगभरात ईस्टर संडे हा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चच्या प्रांगणात शनिवारी रात्रीच एक मोठे रिंगण तयार करण्यात येते. रविवारी पहाटे सहा वाजता अकोल्यातील सर्वच चर्चचे सदस्य तेथे उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी होतात. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या अकोल्यातील एकमेव खिश्चन कॉलनीमधून दिंडी काढण्यात येऊन ईस्टर संडेनिमित्त विविध गीते गायली जातात. रविवारी जस्टीन मेश्रामकर, राजेश ठाकूर, अजय वर्मा, अमित ठाकूर, चंद्रकांत ढिलपे, सरला मेश्रामकर, अरविंद बिरपॉल, यांच्या नेतृत्वात ही दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 


Web Title: Goodfriday Day celebrations in Akola
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.