चहा कॅन्टीनवर काम करणारी ‘सपना’ झाली ‘नायिका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 03:38 PM2020-01-27T15:38:51+5:302020-01-27T15:39:45+5:30

सपनाने वडिलांच्या चहा कॅन्टीनवर काम करीत, अभिनय, परिश्रमाच्या बळावर चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले आणि सपनाने यशस्वी अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार केले.

Girl working on tea canteen become Actress | चहा कॅन्टीनवर काम करणारी ‘सपना’ झाली ‘नायिका’

चहा कॅन्टीनवर काम करणारी ‘सपना’ झाली ‘नायिका’

Next

- संजय उमक 
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : घरची परिस्थिती जेमतेम. वडील घरोघरी फिरून चहाची कॅन्टिन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. तीनही मुलींना त्यांनी शिक्षण देऊन मोठे केले. त्यापैकी एक सपना. सपनानेसुद्धा वडिलांच्या चहा कॅन्टीनवर काम करीत, अभिनय, परिश्रमाच्या बळावर चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले आणि सपनाने यशस्वी अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार केले.
परिस्थिती कशीही असली तरी, जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावर यश मिळविता येते. हेच सपना दीपक देवळकर हिने सिद्ध केले. सपनाने येथील जयनारायण बूब हिंदी हायस्कूल येथे प्राथमिक शिक्षण घेतले. बारावीचे शिक्षण घेत असतानाच, तिची पाऊले चित्रपटसृष्टीकडे वळली. अभिनयाच्या जोरावर तिने मराठी-हिंदी चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका करून १६ मालिकांमध्ये सहायक अभिनेत्री म्हणून काम केले. सध्या एक महानायक डॉ. बी.आर. आंबेडकर या मालिकेमध्ये सपना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘सपना’ कथ्थक नृत्यातही निपुण आहे. यासाठी तिला सरांनी सहकार्य केले. चित्रपटसृष्टीत जाण्याचे तिचे बालपणापासूनचे स्वप्न हाते. वडिलांची परिस्थिती बदलविण्यासाठी तिने चित्रपटसृष्टीचे स्वप्न पाहिले होते. प्रामाणिक आणि परिश्रमाने तिने चित्रपटसृष्टीत यश प्राप्त केले. लोक काय म्हणतील, याची तमा न बाळगता कामावर लक्ष केंद्रित केले. त्याचेच यश मिळाले. मूर्तिजापूरसारख्या छोट्या तालुक्यात राहणारी व घरची आर्थिक परिस्थितीदेखील जेमतेम असताना मुंबईत सिनेसृष्टीत आपले स्थान मिळविणे तिच्यासाठी निश्चितच सोपे नव्हते. तिने मोठ्या बहिणीसोबत दिल्ली गाठली. तेथे गेल्यावर ५ हजार रुपयांची नोकरी करीत, तिने नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये शिक्षण घेतले. मित्र, मैत्रिणींच्या सहकार्याने तिने तीन वर्ष नाटकात काम केले. दिल्लीत असतानाच, तिने ‘वेड’ मराठी चित्रपटासाठी आॅडिशन दिली. तिची निवडही झाली; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे चित्रपट प्रदर्शित झाला नाही. २०१६ मध्ये तिने मालिका व जाहिरात आॅडिशनसाठी थेट मुंबई गाठली. तिला टीव्ही मालिकेत एक छोटीशी भूमिका मिळाली. त्यानंतर तिने मात्र मागे कधी वळून बघितलेच नाही. पुढे तिला अभिनय क्षमतेच्या बळावर हिंदी, मराठी चित्रपट, मालिकांमध्ये भूमिका मिळत गेल्या. गत सहा वर्षांमध्ये सपनाने ‘ऐ जिंदगी, बीग मैजिक, इंडिया मोस्ट वॉन्टेड, कुमकुम भाग्य, परम अवतार श्रीकृष्ण, लाल ईश्क, दिवाने अंजाने यासारख्या १६ मालिका व हिंदी, मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. ‘दिवाने अंजाने’मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली. इच्छाशक्तीच्या जोरावर तिने कौटुंबिक परिस्थिती सावरून वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.


यशाचे श्रेय प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र, अनुपम खेर यांना!
 चित्रपट, मालिकांमध्ये काम करीत असताना, प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र, अनुपम खेर यांची मोलाची मदत झाली. त्यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शनामुळे अभिनय खुलत गेला आणि यश मिळत गेले. आई-वडिलांनी, बहिणींना पाठबळ दिले. त्यामुळेच या क्षेत्रात यशस्वी होऊ. शकले, अशी प्रतिक्रिया सपना देवळकर हिने लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Girl working on tea canteen become Actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.