टेरका येथील जनरेटर, कार्यालय ‘सील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 02:06 PM2019-09-02T14:06:58+5:302019-09-02T14:07:25+5:30

मानोरा तहसिलच्या पथकाने तहसिलदारांच्या नेतृत्वात टेरका येथील जनरेटर तसेच कार्यालयाला सील लावले.

Generator, office 'seal' at Terka in Washim | टेरका येथील जनरेटर, कार्यालय ‘सील’

टेरका येथील जनरेटर, कार्यालय ‘सील’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम/मानोरा : मानोरा तालुक्यातील टेरका (ऊ) येथे विनापरवाना गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आल्यानंतर, प्रशासकीय यंत्रणेने जलदगतीने तपासाची चक्रे फिरवित शनिवारी घटनास्थळाचा पंचनामा केला. रविवार हा सुटीचा दिवस असतानाही, मानोरा तहसिलच्या पथकाने तहसिलदारांच्या नेतृत्वात टेरका येथील जनरेटर तसेच कार्यालयाला सील लावले.
जिल्हा खनिकर्म विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना मिळालेला नसताना, मानोरा तालुक्यातील टेरका (ऊ) येथे ३० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन झाले आहे. शेतजमीन अकृषक नसताना तसेच खनिकर्म विभागाकडून परवाना मिळण्यापूर्वीच टेरका येथे मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू करण्यात आले. यासंदर्भात मानोरा तालुक्यातील हट्टी येथील पृथ्वीराज उल्हास राठोड यांनी मानोरा तहसिलदार तसेच जिल्हा खनिकर्म विभागाकडे तक्रार केली होती. परंतू, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यासंदर्भात ‘लोकमत’ने ३१ आॅगस्टच्या अंकात सचित्र वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. याची तडकाफडकी दखल घेत जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी योग्य ती चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश मानोरा तहसिलदारांना दिले. त्यानुसार ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळपर्यंत टेरका येथील घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान, टेरका येथील घटनास्थळावरून गिट्टी व अन्य गौण खनिजाची रातोरात विल्हेवाट लावली जात असल्याच्या विश्वसनीय माहितीनुसार, रविवारी तपासाची चक्रे अधिक जलदगतीने फिरली. सुटीचा दिवस असतानाही तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने टेरका येथे भेट देऊन तेथील जनरेटर तसेच कार्यालय सील केले. आतापर्यंत किती ब्रास गौण खनिज उत्खनन झाले याची निश्चित माहिती काढण्यासाठी भूमि अभिलेख तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजणी करण्यात येणार आहे. याप्रकरणी मोठ्या दंडाची कारवाई होणार असल्याचे संकेत तहसिलदार डॉ. चव्हाण यांनी दिले.
(प्रतिनिधी)

Web Title: Generator, office 'seal' at Terka in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.