Forget to take action on teachers who failing to teach! | शिकवण्यात नापास शिक्षकांवर कारवाईचा विसर!
शिकवण्यात नापास शिक्षकांवर कारवाईचा विसर!

अकोला : विद्यार्थ्यांना पाठ शिकवण्यातही नापास झालेल्या ११ शिक्षकांवरील कारवाईची फाइल गेल्या दोन महिन्यांपासून रखडली आहे. त्या शिक्षकांना आता कारणे दाखवा नोटीस देण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. शिक्षकांच्या स्पष्टीकरणानंतर कोणती कारवाई होईल, याबाबत कुठलीही स्पष्टता प्रशासकीय स्तरावर आतापर्यंतही दिसून आलेली नाही.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे धडे देणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील १४ पैकी ११ शिक्षक शिकवण्याच्या गुणवत्तेत ५० टक्केही गुणवंत नाहीत, तर सहा शिक्षकांना काठावर पास होण्याइतकेही गुण मिळाले नाहीत. हा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रत्यक्ष घेतलेल्या शिकवण्याच्या पाठातून पुढे आला. जिल्ह्यातील शिक्षक अध्यापन कार्यात किती सक्षम आहेत, याची पडताळणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या कार्यशाळेत करण्यात आली. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी समिती गठित केली. पाच सदस्यीय समितीमध्ये संस्थेचे प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता विस्तार अधिकारी परोपटे, विस्तार अधिकारी अरविंद जाधव, गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे यांचा समावेश होता. समितीसमोर १४ शिक्षकांनी पाठाचे सादरीकरण केले. त्यामध्ये १० शिक्षकांना ५० पैकी २५ गुणही मिळाले नाहीत. तर सहा शिक्षक १७ गुणांचा टप्पा पार करू शकले नाहीत. या शिक्षकांवर कोणती कारवाई करावी, यावर शिक्षण समितीकडून ठराव घेतला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी २४ जून रोजी सांगितले होते. त्यानंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे प्रभार आला. शिक्षण विभागाकडून कारवाईचा प्रस्ताव अद्यापही तयार झालेला नाही. त्यामुळे संबंधित शिक्षकांना अभय देण्याचे काम सुरू असल्याचे चित्र आहे.

या शिक्षकांना मिळणार नोटीस...
मोºहळ येथील नलिनी तायडे, मोझरी येथील साहेबराव लोणाग्रे, पुनोती- अरुण गंगाराम राठोड, धोतरखेड-गोपाल लोखंडे, राजंदा- बिरसिंग डाबेराव, साईनगर- तुळशिदास मोरताळे, उद्धवराव देशमुख, वाकी- मोहन टेकाडे, सांगळूद- शारदा भरणे, खडका- विजय तायडे, गावंडगाव- के.डी. चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस दिल्या जाणार आहेत.
 

मुख्याध्यापकांचे काय झाले..
रेकॉर्डमध्ये घोळ असलेल्या पिंजर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हबीबोद्दीन मोइनोद्दीन, पिंप्री शाळेचे उमेश चोपडे, वडाळी सटवाई शाळेच्या अनिता देशमुख, कंझरा शाळेचे मेश्राम, सिरसो शाळेच्या लता मालवे, खैरखेडचे सुरेंद्र दिवनाले यांचीही तपासणी झाली. त्यानंतर पुढे काय झाले, याचा अहवाल अद्यापही स्पष्ट झालेला नाही.

 


Web Title: Forget to take action on teachers who failing to teach!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.