Five-year sentence for tanker driver causing accident | अपघातास कारणीभूत टँकर चालकाला पाच वर्षांची शिक्षा
अपघातास कारणीभूत टँकर चालकाला पाच वर्षांची शिक्षा

अकोला : शेगाव टी पॉइंटकडून गायगावकडे जात असलेल्या एका दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्यानंतर या अपघातात दाम्पत्य ठार झाले होते. जुने शहर पोलिसांनी ट्रकचालकाची वैद्यकीय तपासणी केली असता मद्यधुंद अवस्थेत त्याने अपघात केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.जी. शुक्ला यांच्या न्यायालयाने ट्रकचालकास गुरुवारी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. यासोबतच दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे.
प्रकाश महादेव बेलोकार व त्यांची पत्नी रेखा प्रकाश बेलोकार हे १५ आॅगस्ट २००८ रोजी संध्याकाळी अंदाजे साडेसहा वाजताच्या सुमारास एम.एच.३० यु ६२७७ क्रमांकाच्या दुचाकीने अकोल्यावरून गायगावकडे जात होते. रेल्वे गेटसमोरील संगम ढाब्याच्या समोर एका भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी टँकरचालक अब्दुल शारीक अब्दुल रशीद याला ताब्यात घेतल्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले होते. यावेळी त्याच्यासोबत उमेश बाबूराव मिसाळ हासुद्धा होता. जुने शहर पोलिसांनी टँकरचालक अब्दुल शारीक अब्दुल रशीद याच्यासह उमेश मिसाळ या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४(भाग २) व मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश एन.जी. शुक्ला यांच्या न्यायालयात झाली. याप्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने सात साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपी अब्दुल शारिक अब्दुल रशीद याला दोषी ठरवले तर त्याचा सोबती उमेश मिसाळ याला दोषमुक्त केले.
न्यायालयाने टँकरचालक शारिक रशिद याला भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास तसेच दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या दोन्ही शिक्षा आरोपीला सोबत भोगावयाच्या आहेत.

Web Title: Five-year sentence for tanker driver causing accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.