मोजक्याच बस रस्त्यावर; व्यावसायिकांच्या संसाराची गाडी रुळावर येईना!

By Atul.jaiswal | Published: January 18, 2022 11:30 AM2022-01-18T11:30:27+5:302022-01-18T11:34:11+5:30

ST Strike in Akola : प्रवाशांची गर्दी नसल्याने बसस्थानकावरील किरकोळ व्यावसायिकांच्या संसाराची गाडी मात्र अजूनही रुळावर येत नसल्याची परिस्थिती आहे.

Few buses on the road; The car of the business world did not come on track! | मोजक्याच बस रस्त्यावर; व्यावसायिकांच्या संसाराची गाडी रुळावर येईना!

मोजक्याच बस रस्त्यावर; व्यावसायिकांच्या संसाराची गाडी रुळावर येईना!

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यवर्ती बसस्थानकावर शुकशुकाटच व्यावसायिकांची रोजी-रोटी बुडाली

- अतुल जयस्वाल

अकोला : गत दोन महिन्यांपेक्षाही अधिक कालावधीपासून संपावर असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी रुजू झाल्याने अकोला मध्यवर्ती बसस्थानकावरून काही बस रस्त्यावर धावत असल्या तरी, प्रवाशांची गर्दी नसल्याने बसस्थानकावरील किरकोळ व्यावसायिकांच्या संसाराची गाडी मात्र अजूनही रुळावर येत नसल्याची परिस्थिती आहे.

एसटी कर्मचारी शासकीय सेवेत विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम असल्याने अकोला विभागातील बहुतांश बसगाड्या अजूनही आगारातच आहेत. संपावर तोडगा निघत नसल्याने काही कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने अकोला येथील मध्यवर्ती बसस्थानकावरून गत काही दिवसांपासून १४ ते १५ बसच्या २० ते २५ फेऱ्या होत आहेत. यामुळे बसस्थानकाच्या उत्पन्नात भर पडत आहे. तथापी, पूर्वीप्रमाणे प्रवाशांची गर्दी होत नसल्याने बसस्थानकावरील किरकोळ व्यावसायिकांची परिस्थिती मात्र पूर्वपदावर आलेली नाही. संपापूर्वी बसस्थानकावर बिस्किट, चॉकलेट, पॉपकॉर्न, मोबाईल ॲसेसरीज, पुस्तके विकणाऱ्यांची चांगली कमाई होत असे. दिवसाला ३०० ते ४०० रुपयांची होणारी कमाई आता १०० ते १५० रुपयांवर आल्याचे किरकोळ व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

कोणत्या आगारातून किती बस रस्त्यावर?

आगार - बस - फेऱ्या - कामावर रुजू कर्मचारी

अकोला क्र. २ - ७ - २२ - ३०

अकोट - ५ - १० - ४५

मूर्तिजापूर - ३ - ०८ - १९

बसस्थानकाबाहेरील दुकानांवरही झाला परिणाम

अकोला मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर असलेल्या दुकानांच्या विक्रीवरही संपाचा परिणाम झाला आहे. बसस्थानकालगत पुस्तके, जनरल स्टोअर्स, केशकर्तनालय व इतर दुकाने आहेत. संपापूर्वी बसस्थानकांवरील प्रवासी या दुकानांवर जाऊन खरेदी करायचे. आता मात्र प्रवासीच नसल्याने या दुकानांचा व्यवसाय मंदावल्याचे चित्र आहे.

 

आता पोटापुरतीही कमाई होत नाही

संपापूर्वी बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असायची, त्यामुळे आमचा किरकोळ व्यवसाय छान चालायचा. दिवसाकाठी ३०० रुपयांपर्यंत कमाई होत असे. आता १०० ते १५० रुपये कमाई होते.

- इकबाल शाह, किरकोळ व्यावसायिक

मोबाईल ॲक्सेसरीज, मास्क विकून दिवसभरात ३०० रुपयांपर्यंत कमाई व्हायची. आता मात्र दिवसभरात १०० रुपये मिळणेही मुश्किल झाले आहे.

- श्याम खेडकर, किरकोळ व्यावसायिक

दिवसभर मर मर करून ३०० रुपयांपर्यंत कमाई होत असे. यामध्ये पाच जणांच्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह होत असे. आता बसस्थानकावर प्रवासीच नसल्याने पोटापुरतीही कमाई होत नाही. बसस्थानक पुन्हा एकदा बहरले, तरच आमचे भले होईल.

- राजू कथलकर, किरकोळ व्यावसायिक

परिस्थिती पूर्वपदावर येतेय

काही कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने अकोला बसस्थानकावरून प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. उपलब्ध मनुष्यबळानुसार फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Few buses on the road; The car of the business world did not come on track!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.