माती परीक्षण अहवालानुसारच खतांचा वापर करावा - डॉ. विनोद खडसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 11:45 AM2020-12-06T11:45:42+5:302020-12-06T11:46:52+5:30

Agriculture News सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपिकतेचा खरा आधार असल्याने तो वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.

Fertilizers should be used as per soil test report - Dr. Vinod Khadse | माती परीक्षण अहवालानुसारच खतांचा वापर करावा - डॉ. विनोद खडसे 

माती परीक्षण अहवालानुसारच खतांचा वापर करावा - डॉ. विनोद खडसे 

Next

अकोला: सेंद्रिय कर्ब हा शेतीचा आधार असून, त्याच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी माती परीक्षण अहवालाप्रमाणेच आवश्यक असेल तेच अन्नद्रव्य घटक खताच्या रूपाने पिकांना द्यावे. त्यामुळे खतांवरचा खर्च कमी करून जमिनीच्या उत्पादकतेची शास्वतता टिकविता येईल, असे आवाहन कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे जागतिक माती दिवसानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपिकतेचा खरा आधार असल्याने तो वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सेंद्रिय कर्बाचे मात्र कमी म्हणजे ०.२० ते ०.३० टक्क्यांपर्यंत आहे. शाश्वत शेती उत्पादनासाठी सर्व अन्नद्रव्यांसोबत सेंद्रिय कर्बाचा समतोल राखला गेला तरच आवश्‍यक अन्नद्रव्ये झाडास उपलब्ध होत असतात. जेव्हा कार्बन वायू हवेत असतो तेव्हा पर्यावरण दूषित होते आणि हाच कार्बन वायू सेंद्रिय कर्बाचे रूपात जमिनीत मिसळला गेला तर जमिनीची सुपिकता वाढविण्यास सर्वात महत्त्वाची भूमिका निभावतो.

सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त तितका जमिनीचा पोत चांगला असतो. त्याकरिता पिकांचे अवशेष न जाळता त्यापासून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत निर्माण केले तर जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवता येते. सेंद्रिय कर्ब आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे. उपलब्धतेप्रमाणेच खतांचा वापर करणे आवश्यक आहे. पीक निघाल्यावर शेतातील मातीचे परीक्षण करून घेण्यासाठी जमिनीचा रंग, उतार आणि उत्पादकतेनुसार विभाग करून प्रत्येक भागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी जमा करा. पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल व्ही आकाराचा खड्डा करून त्यातील खडे विरहीत माती गोळा करावी, अशा पाच ते दहा ठिकाणची माती एकत्र करून त्याचे चार भाग करून विरुद्ध भागाची माती जमा करत शेवटी अर्धा किलो माती कापडी पिशवीत भरावी. त्यावर शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, जमिनीचा सर्व्हे क्रमांक इत्यादी माहितीची आत चिठ्ठी टाकावी व पिशवीवर लावावी. हा नमुना जवळच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाच्या मृदा परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यावा.

Web Title: Fertilizers should be used as per soil test report - Dr. Vinod Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.