कोरोना विषाणूचा प्रभाव शिवजयंती उत्सवावर; मिरवणूक व सत्कार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 03:13 PM2020-03-13T15:13:07+5:302020-03-13T15:13:30+5:30

जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव-२०२० यंदा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

Effect of corona virus on Shiv Jayanti festival; Procession canceled | कोरोना विषाणूचा प्रभाव शिवजयंती उत्सवावर; मिरवणूक व सत्कार रद्द

कोरोना विषाणूचा प्रभाव शिवजयंती उत्सवावर; मिरवणूक व सत्कार रद्द

Next

- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: कोरोना विषाणूचा प्रभाव यंदाच्या तिथीनुसार साजऱ्या होणाºया शिवजयंती उत्सवावरदेखील पाहायला मिळाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती गुरुवार, १२ मार्च रोजी साजरी करण्यात आली; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याने सार्वजनिक सण-उत्सव आयोजनाची परवानगी प्रशासनाने नाकारली. कोरोना विषाणूमुळे जुने शहरातील रेणुका नगर येथे जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव-२०२० यंदा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
‘प्रतापगड’ किल्लाची प्रतिकृती शिवजयंतीनिमित्त रेणुका नगरात उभारण्यात आली. गुरुवारी सायंकाळी ‘प्रतापगड’वर मान्यवरांच्या हस्ते अत्यंत साध्या पद्धतीने शिवपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला महापौर अर्चना मसने, भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, डॉ. विनोद बोर्डे, जयंत मसने, वैशाली शेळके, सतीश ढगे, सागर शेगोकार, विलास शेळके, साधना येवले, नंदा पाटील, नीलेश निनोरे, सुनील क्षीरसागर, रंजना विंचणकर, अनिल गरड, संजय जिरापुरे, अमोल गोगे, राजेंद्र गिरी, वसंत मानकर, मंगला म्हसैने, हेमंत शर्मा, संजय बडोणे, रमण पाटील, साधना ठाकरे, चंदा शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, हा शिवजयंती साजरी करण्यामागील उद्देश असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रामध्ये सदैव कार्य करण्याचा संकल्प याप्रसंगी विजय अग्रवाल यांनी केला.


मिरवणूक व सत्कार रद्द
समितीच्यावतीने दरवर्षी डाबकी रोड परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात येते; परंतु सार्वजनिक ठिकाणी व लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाभळेश्वर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणाºया प्रशिक्षकांचा सत्कार तसेच अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले.

‘प्रतापगड’वर शिवप्रेमींची गर्दी
रेणुका नगरात उभारलेल्या भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती बघण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. प्रतापगडावर सेल्फी काढण्याचा मोह शिवप्रेमींना आवरता आला नाही.

डाबकी मार्ग शिवमय
शिवजयंतीनिमित्त बुधवारपासूनच डाबकी मार्ग भगवे ध्वज आणि तोरणांनी सजला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा, मूर्तीची प्रतिस्थापना ठिकठिकाणी करण्यात आली होती. पोवाडे आणि देशभक्तीपर गीताने वातावरण शिवमय झाले होते.

 

Web Title: Effect of corona virus on Shiv Jayanti festival; Procession canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.