प्रत्येक तालुक्यात अतिरिक्त ५० खाटांची सुविधा निर्माण करा! -  बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 10:14 AM2020-09-22T10:14:16+5:302020-09-22T10:14:31+5:30

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० खाटांची तसेच महानगरपालिका क्षेत्रात १०० खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

Create additional 50 beds in each taluka! - Bacchu Kadu | प्रत्येक तालुक्यात अतिरिक्त ५० खाटांची सुविधा निर्माण करा! -  बच्चू कडू

प्रत्येक तालुक्यात अतिरिक्त ५० खाटांची सुविधा निर्माण करा! -  बच्चू कडू

Next

अकोला : जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० खाटांची तसेच महानगरपालिका क्षेत्रात १०० खाटांची अतिरिक्त सुविधा निर्माण करा, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार बच्चू कडू हे सध्या स्वत: कोरोनाबाधित असून, ते गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. सोमवारी त्यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व व प्रमुख अधिकाऱ्यांची मोबाइल कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना. कडू यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करणे अत्यावश्यक असून, त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या यंत्रणेमार्फत जादा ५० बेडची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. अकोला महानगरपालिका क्षेत्रात अकोला महानगरपालिकेतर्फे १०० बेडची जादा सुविधा उपलब्ध करण्यात यावी. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथील अतिदक्षता विभागातील बेडची संख्याही वाढविण्यात यावी, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

आरोग्य सुविधा कमी पडता कामा नये!
जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत उपचार सुविधांमध्ये कमतरता भासू न देण्याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. जिल्ह्यात मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे तसेच अन्य प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असेही निर्देश ना. कडू यांनी दिले.

 

Web Title: Create additional 50 beds in each taluka! - Bacchu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.