CoronaVirus : आणखी दोघांचा मृत्यू; ३० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:19 AM2020-07-19T10:19:39+5:302020-07-19T10:19:47+5:30

‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये दिवसभरात आठ जण तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २२ असे एकूण ३० जण पॉझिटिव्ह आढळून आले.

CoronaVirus: Two more die; 30 positive | CoronaVirus : आणखी दोघांचा मृत्यू; ३० पॉझिटिव्ह

CoronaVirus : आणखी दोघांचा मृत्यू; ३० पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, १८ जुलै रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून प्राप्त ‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये दिवसभरात आठ जण तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २२ असे एकूण ३० जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०२ झाला, तर एकूण बाधितांची संख्या २,०८७ झाली आहे. दरम्यान, आणखी १५ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारीदिवसभरात २२९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२१ निगेटिव्ह, तर आठ पॉझिटिव्ह आढळून आले. सकाळी पॉझिटिव्ह आढळून आलेले चौघेही पुरुष असून, यामध्ये बोरगाव मंजू येथील तीन, तर अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील एकाचा समावेश आहे.
सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या चार अहवालांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. हे चारही रुग्ण मूर्तिजापूर येथील असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.


अकोट येथील दोघांचा मृत्यू
कोरोनामुळे शनिवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही अकोट येथील असून, त्यापैकी एक जण ७६ वर्षीय, तर दुसरा ५४ वर्षीय आहे. या दोन्ही रुग्णांना १० जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.


१५ जणांना डिस्चार्ज
शनिवारी दुपारनंतर कोविड केअर सेंटरमधून १०, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन व हॉटेल रिजेन्सीमधून दोन अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.


मृतकाची नोंदच नाही!
मूर्तिजापूर तालुक्यातील जितापूर खेडकर येथील ७५ वर्षीय वृद्धाचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद नसल्यामुळे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या अहवालात एकूण मृतांचा आकडा १०१ दर्शविला आहे.


३०३ रुग्णांवर उपचार सुरू
आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २,०८७ असून, यापैकी १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १,६८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३०३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट: ५८० चाचण्यांमध्ये २२ पॉझिटिव्ह
दिवसभरातील ५८० रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. दिवसभरात अकोला मनपा हद्दीत २५ चाचण्या झाल्या. त्यात पाच जण पॉझिटिव्ह आले. अकोट येथे ५८ चाचण्या होऊन त्यात नऊ जण पॉझिटिव्ह आले. तेल्हारा येथे ७८ जणांच्या चाचण्यांपैकी दोघे पॉझिटिव्ह आले. बाळापूर येथे १९७ चाचण्यांपैकी चार जण पॉझिटिव्ह आले. बार्शीटाकळी येथे २७ चाचण्यांमध्ये दोघे पॉझिटिव्ह आले. मूर्तिजापूर येथे ७५ जणांची चाचणी केली. आतापर्यंत जिल्ह्यात १,९९२ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १२० जण पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: CoronaVirus: Two more die; 30 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.