श्वास गुदमरण्याआधीच हवा ‘ऑक्सिजन’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 10:19 AM2020-09-09T10:19:20+5:302020-09-09T10:19:27+5:30

आठवड्याला चार टँकर रसायन मिळाले तरच मागणी-पुरवठ्याचा समतोल साधला जाणार असल्याची चिन्हे आहेत.

CoronaVirus : Air ‘oxygen’ before suffocation! | श्वास गुदमरण्याआधीच हवा ‘ऑक्सिजन’ !

श्वास गुदमरण्याआधीच हवा ‘ऑक्सिजन’ !

googlenewsNext

- राजेश शेगोकार
अकोला : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. एकीकडे रुग्णांची संख्या व उपलब्ध खाटा यांचा ताळमेळ जुळविताना दमछाक होत असलेल्या आरोग्य यंत्रणेसमोर आता ऑक्सिजनच्या टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. सध्या जिल्ह्यात आॅक्सिजनची मागणी तिपटीने वाढली असून, त्यामध्ये आणखी वाढ होण्याचीच चिन्हे आहेत. अशा स्थितीमध्ये रुग्णांचा श्वास गुदमरण्याआधीच आॅक्सिजन उपलब्धता करावी लागणार असून, त्यासाठी आठवड्याला चार टँकर रसायन मिळाले तरच मागणी-पुरवठ्याचा समतोल साधला जाणार असल्याची चिन्हे आहेत.
अकोल्यात आॅक्सिजन निर्मितीचे दोन प्लांट असून, त्यामार्फत सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांना आॅक्सिजन गॅसचा पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे लगतच्या वाशिम व बुलडाण्यातही अकोल्यातूनच पुरवठा केला जात असल्याने सध्या आॅक्सिजनचा तुटवडा भासत आहे.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या वाढली असून, आॅक्सिजनची मागणीदेखील वाढली आहे. सोमवारी एका खासगी रुग्णालयात आॅक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली होती. त्यावेळी सर्वोपचार रुग्णालयातून काही सिलिंडरचा पुरवठा करावा लागला होता.
 
कुठे तयार होते लिक्वीड
आॅक्सिजनची निर्मिती करण्यासाठी लागणारे लिक्वीड हे नागपूर येथून बोलविण्यात येते. या लिक्वीड चा एक टँकर हा ८ किलो लीटर क्षमतेचा असतो. हे लिक्वीड कॉम्प्रेस करून आॅक्सिजन तयार केले जाते. एका टँकरमधून तयार केलेल्या आॅक्सिजनमध्ये साधारणपणे ९०० ते ९५० सिलिंडर भरले जातात. सद्यस्थितीत लिक्वीडचा पुरवठा करण्याऱ्या प्लांटवरही ताण वाढला असल्याने मागणीची पूर्तता होण्यात अडचणी येत आहेत. नागपूरनंतर लिक्वीड तयार करणारे असे प्लांट पुणे, ठाणे येथेच आहेत.
 

एक ऐवजी हवेत चार टँकर
शासकीय रुग्णांलयांसाठी होणारा आॅक्सिजनच्या पुरवठा तसेच खासगी रुग्णालयांची गरज लक्षात घेता अकोला जिल्ह्यासाठी आठवड्यातून किमान चार टँकर लिक्वीड मिळणे अत्यावश्यक आहे. येणाºया काळात कोरोनाचे संक्रमण अशाच वेगाने वाढत राहिले तर चार टँकरशिवाय पर्याय राहणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

एअर आॅक्सिजन निर्मितीचा हवा आणखी एक प्लांट
सध्या अकोल्यात एअर आॅक्सिजन निर्मितीचा एक प्लांट औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू आहे. या प्लांटमधून अकोल्यासह व बुलडाणा व वाशिममधील शासकीय वैद्यकीय दवाखान्यांना आॅक्सिजनचा पुरवठा केला जातो. तसेच कंत्राट या प्लांटला देण्यात आले आहे.
आॅक्सिजन निर्मितीसाठी लागणाºया लिक्वीडचा तुटवडा लक्षात घेता एअर आॅक्सिजन निर्मितीचा आणखी एक प्लांट अकोल्यात कार्यान्वित झाल्यास अकोल्याच्या मागणीची तूट भरण्यास मदत होऊ शकते.
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आॅक्सिजन निर्मितीच्या एका प्लांटचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तो मंजूर होऊन तातडीने कार्यान्वित झाल्यास भविष्यातील आॅक्सिजनची आणीबाणी संपुष्टात येऊ शकेल.
 
तीन दिवसांची सोय झाली
रविवार संध्याकाळपासूनच आॅक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणल्याने रुग्णालये तसेच जिल्हा प्रशासनाने सूत्रे हलविल्यामुळे सध्या तीन दिवसांचा कोटा उपलब्ध झाला आहे. खासगी रुग्णालयांसाठी नागपूर, जालना आणि भुसावळ येथून काही सिलिंडर मागविण्यात आले.
 
केवळ सिलिंडर आणण्यासाठी होतो वेळेचा अपव्यय
जगण्यासाठी आॅक्सिजनच लागतो, त्यामुळे आॅक्सिजनसाठी विलंब शक्यच नाही. जालना, औरंगाबाद, भुसावळ आदी शहरांमधून आॅक्सिजनचे थेट सिलिंडरच आणले तरी अकोल्यापासून या शहरांचे अंतर, रस्त्याची स्थिती, सिलिंडर भरण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेतला तर ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याचे दिसून येईल. त्यामुळे आॅक्सिजन निर्मितीसाठीच अकोल्यात प्रयत्न होणे गरजेचे आहे.
 
कोरोना संकटामुळे आॅक्सिजनची मागणी एकदम तिप्पट झाली आहे. त्यामुळे साहजिकच पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सूत्रे हलविले. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे; मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आठवड्याला चार टँकर मिळणे आवश्यक आहे.
-डॉ. स्वप्निल ठाकरे
आॅक्सिजन पुरवठादार
 

Web Title: CoronaVirus : Air ‘oxygen’ before suffocation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.