कोरोना डेथ ऑडिट: ५६ टक्के रुग्णांना आधीपासूनच आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 10:43 AM2021-06-21T10:43:10+5:302021-06-21T10:45:20+5:30

Corona Death Audit: मृतकांमधील बहुतांश रुग्णांना मधुमेह आणि उच्चरक्तदाबाची समस्या असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.

Corona Death Audit: 56% of patients already have the disease | कोरोना डेथ ऑडिट: ५६ टक्के रुग्णांना आधीपासूनच आजार

कोरोना डेथ ऑडिट: ५६ टक्के रुग्णांना आधीपासूनच आजार

Next
ठळक मुद्देमधुमेह, उच्चरक्तदाबाचे रुग्ण जास्त महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त

अकोला : कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण जास्त होते. शरीरात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने, अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी सुमारे ५६ टक्के रुग्णांना कोविड व्यतिरिक्तही इतर आजार असल्याचे डेथ ऑडिटच्या माध्यमातून समोर आले. मृतकांमधील बहुतांश रुग्णांना मधुमेह आणि उच्चरक्तदाबाची समस्या असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.

साधारणत: फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्यूचे सत्रही सुरू झाले. दररोज सरासरी दहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ लागला होता. आता ही दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र, या लाटेत रुग्णांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याचे कारण काय, याचा शोध घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे कोरोना डेथ ऑडिट केले जाते. त्यानुसार, सुमारे ५६ टक्के रुग्णांना आधीपासूनच आजार असल्याचे निष्पन्न झाले. यातील बहुतांश रुग्ण हे मधुमेह, तसेच उच्चरक्तदाबाचे शिकार होते, अशी माहितीही कोरोना डेथ ऑडिटच्या माध्यमातून समोर आली, शिवाय काही रुग्णांना रुग्णालयात उशिरा दाखल करण्यात आल्याने, त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेही त्यांचा मृत्यू झाल्याचे या माध्यमातून समोर आले आहे. मृतकांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.

 

२१६ रुग्णांचा २४ तासांत मृत्यू

अनेक जण कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत घरीच उपचार घेतात. मात्र, प्रकृती खालावल्यानंतर ते रुग्णालयात दाखल होण्याचा पर्याय निवडतात. तोपर्यंत कोविडचा संसर्ग वाढलेला असतो. परिणामी, असे रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नाहीत. अशा २१६ रुग्णांचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत झाल्याचेही समोर आले आहे.

सर्वाधिक रुग्ण मधुमेहाचे

उपचारादरम्यान मृत्यू पावणाऱ्या कोविड रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण मधुमेहाचे असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांमध्ये कोरोनाचा संसर्ग प्रभावी ठरला असून, त्यांच्या शरीराने उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याचेही दिसून आले.

मधुमेहासोबतच उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. या रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती आधीच कमी असताना, कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही.

५८ जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू

मृतकांच्या एकूण आकड्यांमध्ये ५८ जणांचा मृत्यू हा उपचारापूर्वीच झाल्याचेही निदर्शनास आले आहे. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी या रुग्णांना मृत घोषित केले आहे.

 

वयोगटनिहाय महिला आणि पुरुषांचे मृत्यू

महिला वयोगट पुरुष

१० - ३० पर्यंत - २६

४० - ३१ ते ४० - ५२

६२ - ४१ ते ५० - १०८

१०२ - ५१ ते ६० - १५०

१२२ - ६१ ते ७० - २४४

११९ - ७१ वरील - २२३

Web Title: Corona Death Audit: 56% of patients already have the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.