३६ कोटींच्या शिलकीसह ६०७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:19 AM2021-05-12T04:19:27+5:302021-05-12T04:19:27+5:30

अकोला: महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सूचना व दुरुस्तीचा अंतर्भाव करून स्थायी समितीने सुधारित अंदाजपत्रक महापौर अर्चना मसने यांच्याकडे ...

A budget of Rs 607 crore with a balance of Rs 36 crore has been sanctioned | ३६ कोटींच्या शिलकीसह ६०७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

३६ कोटींच्या शिलकीसह ६०७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

Next

अकोला: महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सूचना व दुरुस्तीचा अंतर्भाव करून स्थायी समितीने सुधारित अंदाजपत्रक महापौर अर्चना मसने यांच्याकडे सादर केले असता मंगळवारी सभागृहात ऑनलाईन सभेच्या माध्यमातून भाजप नगरसेवकांनी ३६ कोटीच्या शिलकीसह ६०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. अर्थसंकल्पात नमूद केलेले उत्पन्नाचे आकडे फसवे असल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष काँग्रेस व शिवसेनेने अर्थसंकल्पावर आक्षेप नोंदवला.

महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना अखेर मे महिन्यात अर्थसंकल्प सादर केला. यावेळी प्रशासनाच्यावतीने सन २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात जमा व खर्चामध्ये बदल करून चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या सुधारित अंदाजपत्रकात ३६ कोटी ६ लक्ष रुपयांच्या शिल्लकीचा समावेश केला. महापालिकेला प्राप्त होणारे उत्पन्न व खर्च यांचा ताळेबंद जुळवित ६०७.२३ कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे नमूद करीत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. ऑनलाईन सभेला सुरुवात झाल्यानंतर स्थायी समिती सभापती संजय बडोणे यांनी महापौर अर्चना मसने, मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. यांमध्ये मनपा प्रशासनाने अंतर्भाव केलेल्या बाबींचे वाचन केले. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, शहरातील दफन भूमीची दुरूस्ती, शाळा इमारती, दवाखाना इमारत दुरुस्ती, रस्ते, नाली बांधकाम तसेच पेव्हर्स व नाल्यांवर धापे बसविण्याचा समावेश आहे.

वाहन दुरुस्तीला प्राधान्य

यंदाच्या अर्थसंकल्पात मनपा प्रशासनाने वाहनांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने पदाधिकाऱ्यांची वाहने व त्यांच्या इंधनावर होणारा खर्च तसेच नादुरुस्त वाहनांची दुरुस्ती करणे, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्याची दुरुस्ती करणे, सफाई कर्मचाऱ्यांसाठी लोट गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देणे आदी बाबींचा समावेश आहे.

यावर होणार मनपाचा खर्च

दुर्धर आजारी असलेल्या व्यक्तींना अर्थसाहाय्य करणे,महापौर चषक, महिला व बालकल्याण योजना, दिव्यांग योजना, कोंडवाडा बांधणे व दुरुस्ती, गणेश घाट देखभाल दुरुस्ती, सुवर्ण जयंती नगरोत्थानमध्ये आर्थिक हिस्सा जमा करणे, मोर्णा नदी संवर्धनासाठी निधीची तरतूद करण्यात आली.

महापालिकेला प्राप्त होणारे एकूण उत्पन्न व त्यातून खर्च करताना आम्ही विकास कामांना प्राधान्य दिले आहे.

-अर्चना मसने, महापौर

सत्ताधारी भाजप व प्रशासनाने उत्पन्नाची कोणतीही स्पष्ट आकडेवारी दिली नाही. प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न केवळ जनता भाजी बाजाराच्या जागेवर वाणिज्य संकुल उभारण्याचा असून तो आम्ही पूर्ण होऊ देणार नाही.

- साजिद खान पठान विरोधी पक्षनेता मनपा

अर्थसंकल्पात मनपावर किती दायित्व आहे याची आकडेमोड केली नाही. मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व दुकानापासून किती उत्पन्न प्राप्त होईल याचा कुठेही ताळमेळ नाही. प्रशासनाने व भाजपने केलेल्या तरतुदी पाहता अर्थसंकल्पात अनेक तांत्रिक त्रुटी असल्याचे दिसून येते.

- राजेश मिश्रा गटनेता शिवसेना

Web Title: A budget of Rs 607 crore with a balance of Rs 36 crore has been sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.