‘बंडोबां’ना रोखण्यासाठी ‘भारिप’ ची त्रिसदस्यीय समिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 10:19 AM2019-12-28T10:19:54+5:302019-12-28T10:19:59+5:30

अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या ‘बंडोबां’ना रोखण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २७ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.

Bharip's three-member committee to stop 'rebellion'! | ‘बंडोबां’ना रोखण्यासाठी ‘भारिप’ ची त्रिसदस्यीय समिती!

‘बंडोबां’ना रोखण्यासाठी ‘भारिप’ ची त्रिसदस्यीय समिती!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे काही गट आणि पंचायत समित्यांच्या काही गणांमध्ये कार्यक्षेत्राबाहेरील (पार्सल) उमेदवारांना भारिप बहुजन महासंघाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या ‘बंडोबां’ना रोखण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २७ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्ह्यात बैठका घेऊन, बंडखोर उमेदवारांना पक्षाची भूमिका पटवून सांगण्याच्या सूचना भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी त्रिसदस्यीय समितीला पत्राद्वारे दिल्या आहेत.
जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १३ पेक्षा जास्त गटांमध्ये आणि संबंधित गटांच्या पंचायत समित्यांच्या गणांमध्ये गट व गणाच्या कार्यक्षेत्राबाहेरील (पार्सल) उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत, पार्सल उमेदवारांविरुद्ध जिल्हा परिषदेच्या संबंधित गटांमध्ये व पंचायत समितीच्या गणांमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. भारिप-बमसंच्या नाराज अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत ‘पॅनल’ देखील तयार केले आहेत.
या पृष्ठभूमीवर भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी २७ डिसेंबर रोजी पत्राद्वारे दिलेल्या सूचनांनुसार, अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या बंडखोर उमेदवारांना रोखण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यात बैठका घेऊन पक्षाचे कार्यकर्ते व अपक्ष उमेदवारांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहे. तसेच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी बंडखोर अपक्ष उमेदवारांना रोखण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्रिसदस्यीय समितीला पत्राद्वारे दिल्या आहेत.

अशी आहे त्रिसदस्यीय समिती!

बंडखोर अपक्ष उमेदवारांना शांत करण्यासाठी भारिप-बमसंच्यावतीने त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रदीप वानखडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व दामोदर जगताप यांचा समावेश आहे. या समितीसोबतच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे. वानखडे, जिल्हा महासचिव डॉ.एम.आर. इंगळे यांनीसुद्धा पक्षाच्या नाराज अपक्ष उमेदवारांना शांत करण्यासाठी प्रयत्न करून, त्यासंदर्भात सूचना देण्याचेही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संबंधितांना सांगीतले आहे.

 

Web Title: Bharip's three-member committee to stop 'rebellion'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.