सावधान, कोरोना आणखी वाढणार; जीएमसीकडून पर्यायी व्यवस्थेचा शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 10:19 AM2020-08-08T10:19:47+5:302020-08-08T10:19:59+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा प्रशासनाचे पर्यायी व्यवस्थेवर विचार मंंथन सुरू असल्याची माहिती आहे.

Beware, Corona will grow even more; Discover an alternative system from GMC! | सावधान, कोरोना आणखी वाढणार; जीएमसीकडून पर्यायी व्यवस्थेचा शोध!

सावधान, कोरोना आणखी वाढणार; जीएमसीकडून पर्यायी व्यवस्थेचा शोध!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचा सर्वाधिक ताण सर्वोपचार रुग्णालयावर पडत आहे. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात कोविडसाठी ४५० खाटा राखीव आहेत; परंतु येणाऱ्या काळात रुग्णसंख्या आणखी वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा प्रशासनाचे पर्यायी व्यवस्थेवर विचार मंंथन सुरू असल्याची माहिती आहे.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयाव्यतिरिक्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, दोन खासगी रुग्णालय आणि तीन हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, मूर्तिजापूर ग्रामीण रुग्णालयातही, तशी व्यवस्था केली आहे; मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने उपलब्ध खाटांची कमी भासू लागली आहे. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयातील १४ वार्डांमध्ये कोविडच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या महिनाभरात जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणखी वाढणार असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन खाटांची संख्या वाढविण्याच्या तयारीत आहेत.


जीएमसीला हवे पर्यायी रुग्णालय
अकोला जिल्ह्याच्या आरोग्याचा भार एकमेव सर्वोपचार रुग्णालयावर आहे; मात्र इतर जिल्ह्यांचा विचार केल्यास, त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालय यांसह उप-जिल्हा व ग्रामीण रुग्णालये कोविडसाठी अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत; परंतु अकोल्यातील स्थिती गंभीर आहे. अकोल्यात जिल्हा रुग्णालयच नाही, तर महापालिकेच्या रुग्णालयात केवळ रुग्ण तपासणी केली जात आहे. याशिवाय ग्रामीण रुग्णालयेदेखील इतर जिल्ह्यातील रुग्णालयांप्रमाणे अ‍ॅक्टिव्ह नाहीत. सर्वोपचार रुग्णालयावरील रुग्णसंख्येचा वाढता ताण कमी करण्यासाठी प्रशासनाकडे पर्याप्त व्यवस्था असली, तरी त्याचा उपयोग होताना दिसून येत नाही.


६० खाटा व्हेंटिलेटरसाठी राखीव
कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयातील व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात आली आहे.
आगामी काळात वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता, सर्वोपचार रुग्णालयात ६० खाटा व्हेंटिलेटरसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे.


सर्वोपचार रुग्णालयावर रुग्णांचा ताण वाढला आहे. त्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे; मात्र रुग्णांसाठी आवश्यक सर्वच व्यवस्था केली जात आहे. रुग्णसंख्येचा वाढता ताण पाहता वाढीव खाटा किंवा पर्यायी व्यवस्थेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली आहे. यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल.
- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी,अकोला.

Web Title: Beware, Corona will grow even more; Discover an alternative system from GMC!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.