अकोला: ‘व्हीएनआयटी’ने शहरातील सिमेंट रस्त्यांचे घेतले नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 10:46 AM2020-07-12T10:46:01+5:302020-07-12T10:46:15+5:30

वर्षभरानंतर ‘व्हीएनआयटी’च्या चमूने शनिवारी शहरातील सिमेंट रस्त्याचे नमुने घेण्याला प्रारंभ केला.

Akola: VNIT takes samples of cement roads in the Akola city | अकोला: ‘व्हीएनआयटी’ने शहरातील सिमेंट रस्त्यांचे घेतले नमुने

अकोला: ‘व्हीएनआयटी’ने शहरातील सिमेंट रस्त्यांचे घेतले नमुने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरात तयार करण्यात आलेले सिमेंट रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. याप्रकरणी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’ मार्फत रस्त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा मुद्दा मागे पडला होता; मात्र वर्षभरानंतर ‘व्हीएनआयटी’च्या चमूने शनिवारी शहरातील सिमेंट रस्त्याचे नमुने घेण्याला प्रारंभ केला.
राज्यात तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कालावधीत शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी सन २०१२-१३ मध्ये १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्राप्त निधीतून डांबरीकरणाचे १८ रस्ते प्रस्तावित केले होते. या रस्त्यांचे अठरा फूट रुंदीकरण करण्याचे निर्देश त्यांनी बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने निविदा प्रसिद्ध केली. या कालावधीत मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ‘वर्किंग एस्टीमेट’ मध्ये बदल करून अठरा फूट रुंदीचे रस्ते चाळीस फूट रुंद करण्याचा निर्णय घेतला, तसेच यापैकी प्रमुख सहा रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून घेण्यात आला.
स्थानिक ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शनला सिमेंट रस्त्यांची कामे देण्यात आली; परंतु ही कामे सुरू केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच सिमेंट रस्त्यांचे पितळ उघडे पडले. रस्ता तयार झाल्यानंतर लगेच ठिकठिकाणी भेगा पडून तडे गेले, तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे समोर आले होते.


तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सारला बाजूला
शहरातील निकृष्ट सहा सिमेंट रस्त्यांपैकी चार सिमेंट रस्ते मनपाच्यावतीने तयार करण्यात आले, तसेच उर्वरित दोन रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आले. या दोन्ही रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तत्कालिन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सिमेंट रस्त्यांची तपासणी करून चौकशी अहवाल मनपाकडे सादर केला होता. हा अहवाल बाजूला सारत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सिमेंट रस्त्याची ‘व्हीएनआयटी’मार्फत पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला, हे विशेष.

दोन सिमेंट रस्त्यांचे वीस नमुने जमा
 व्हीएनआयटी च्यावतीने प्रा.फैसल व त्यांच्यासोबतच्या चार कर्मचाºयांनी शनिवारी दुर्गा चौक ते अग्रसेन चौक तसेच टॉवर ते रतनलाल प्लॉट चौकपर्यंतच्या रस्त्याचे कोअर कटरच्या माध्यमातून प्रत्येकी दहा-दहा असे एकूण वीस नमुने घेतले.


कोट्यवधींचा खर्च पाण्यात
दुर्गा चौक अग्रसेन चौक- २ कोटी ४० लाख
टॉवर ते रतनलाल प्लॉट चौक-२ कोटी ४८ लाख
सिव्हिल लाइन ते मुख्य पोस्ट आॅफिस चौक-२ कोटी ९२ लाख ४८ हजार
माळीपुरा ते मोहता मिल- २ कोटी ४५ लाख ५९ हजार

 

Web Title: Akola: VNIT takes samples of cement roads in the Akola city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.