अकोला: दोन महिन्यांपासून सिटी बस सेवा ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 04:51 PM2019-08-09T16:51:55+5:302019-08-09T16:52:00+5:30

उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून श्रीकृपा ट्रॅव्हल्सने शहर बस वाहतूक सेवा बंद केली आहे.

 Akola: City bus service jammed for two months | अकोला: दोन महिन्यांपासून सिटी बस सेवा ठप्प 

अकोला: दोन महिन्यांपासून सिटी बस सेवा ठप्प 

Next

अकोला: मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जानेवारी २०१७ मध्ये भारतीय जनता पार्टीने सिटी बस सेवेचा मोठा गाजावाजा केला. त्यावेळी शहरवासीयांच्या सेवेत ३५ बसचा ताफा दाखल होणार होता. ३५ बस तर सोडाच, उण्यापुऱ्या २० बसचा गाडा हाकताना अवघ्या वर्षभराच्या कालावधीत श्रीकृपा ट्रॅव्हल्सच्या नाकीनऊ आले आहेत. उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून श्रीकृपा ट्रॅव्हल्सने शहर बस वाहतूक सेवा बंद केली आहे. यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना मानसिक त्रास होत असताना मनपा प्रशासनाने साधलेली चुप्पी अनेकांना खटकत आहे.
मनपाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत २००१-०२ मध्ये अकोलेकरांनी भाजपा-शिवसेनेला कौल दिला होता. त्यावेळी मनपाच्या स्तरावर शहरात पहिल्यांदा शहर बस सेवा सुरू करण्यात आली होती. एका स्थानिक संस्थेने बस सेवेचा कंत्राट घेतला होता. सुरुवातीला सहा वर्षे ही सेवा अखंड सुरू होती. त्यानंतर मात्र संस्था अवसायनात निघाल्यामुळे बस सेवा कोलमडली. मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बस सेवा रुळावर आणण्याचे प्रयत्न केले. अखेर २०१३ पासून ही सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ३५ शहर बसचा करारनामा तयार करून निविदा प्रकाशित केली असता, ती श्रीकृपा ट्रॅव्हल्सने सादर केली. जानेवारी २०१७ मध्ये अवघ्या पाच बसच्या मदतीने ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी शहरात थातूरमातूर बस सेवा सुरू केली. त्यानंतर १५ बसचा ताफा आणण्यात आला. अवघ्या सव्वा वर्षाच्या कालावधीतच ट्रॅव्हल्सच्या संचालकाने बँकेचे कर्ज फेडल्या जात नसल्याची सबब पुढे करीत मनपासमोर गुडघे टेकले आणि ६ जून २०१९ रोजी बस सेवा बंद केली. दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही ट्रॅव्हल्सच्या संचालकांकडून कर्जाची परतफेड केली जात नसल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागत असला तरी सत्ताधारी भाजप व प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

सुरुवातीपासूनच रडगाणे!
मनपाने श्रीकृपा ट्रॅव्हल्सची निविदा मंजूर केल्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये ३५ बसचा ताफा शहरात दाखल होणार होता. पहिल्या टप्प्यात केवळ ५ बस आणण्यात आल्या. त्यासाठी १ जानेवारी २०१७ चा मुहूर्त उजाडला. उर्वरित ३० बस फेबु्रवारी महिन्यात दाखल होतील, असा दावा ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी केला होता. त्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनंतर १५ बस आणण्यात आल्या. उर्वरित १५ बस आजपर्यंतही शहरात दाखल झाल्याच नाहीत. तरीही संचालकांनी कर्जाची सबब पुढे करीत बस सेवा बंद केली, हे येथे उल्लेखनीय.

अकोलेकरांमध्ये रोष
शहर बस वाहतूक सेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांमध्ये सत्ताधारी भाजप तसेच मनपा प्रशासनाप्रती तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. दोन महिन्यांपासून बंद पडलेली बस सेवा सुरू करण्यासाठी सत्तापक्षासह प्रशासनाने श्रीकृपा ट्रॅव्हल्सला विचारणा व निर्देश देणे अपेक्षित होते. तसे होत नसल्यामुळे ही बस सेवा सुरू होणार की नाही, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title:  Akola: City bus service jammed for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.