अकोला: २७० शिकस्त इमारती ठरू शकतात धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 01:59 PM2020-01-03T13:59:33+5:302020-01-03T14:00:22+5:30

जीर्ण आणि शिकस्त झालेल्या या इमारतींची वर-वर डागडुजी केली जाते; मात्र स्ट्रक्चर आॅडिट करण्याची गरज कुणाला भासत नाही.

Akola 270 demolished buildings can be dangerous | अकोला: २७० शिकस्त इमारती ठरू शकतात धोकादायक

अकोला: २७० शिकस्त इमारती ठरू शकतात धोकादायक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जुन्या कापड बाजारातील तीन मजली इमारत बुधवारी कोसळल्याने पुन्हा एकदा अकोल्यातील शेकडो इमारती शिकस्त-जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आह. महापालिकेच्या चारही झोनमध्ये २७० इमारती शिकस्त असून, त्यांना महापालिका प्रशासनाने नाममात्र नोटीस बजावून ठेवली आहे. या शिकस्त इमारती अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. दरम्यान, निर्मल स्वीट मार्टची तीन मजली इमारत कोसळण्याप्रकरणी खोदकाम करणाऱ्या इमारतीच्या चारही भागीदारांना जबाबदार धरून मनपा नगररचना विभागाने नोटीस बजावली आहे. त्या नोटीसमध्ये ९२.४० चौरस मीटर खोदकाम अनधिकृत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अकोला महापालिका चार झोनमध्ये विभागली गेली असून, शहरातील बहुतांश ब्रिटिशकालीन इमारती आणि मुख्य बाजारपेठेचा भाग हा उत्तर झोनमध्ये येतो. शंभर दीडशे वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या जुन्या इमारतींमध्ये आजही अनेकजण राहतात. जीर्ण आणि शिकस्त झालेल्या या इमारतींची वर-वर डागडुजी केली जाते; मात्र स्ट्रक्चर आॅडिट करण्याची गरज कुणाला भासत नाही. त्यामुळे अकोल्यात सातत्याने इमारत कोसळण्याच्या घटना घडत असतात. बुधवारी रात्रीदेखील अशीच घटना घडली. १०.३० वाजताच्या दरम्यान जुन्या कापड बाजारातील निर्मल स्वीट मार्टची तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. निर्मल स्वीट मार्टलगत असलेल्या राधास्वामी हार्डवेअरची एका बाजूची भिंत कोसळली आहे. राधास्वामी हार्डवेअरमधील कोट्यवधींचे साहित्यदेखील काढणे अशक्य आहे. बुधवारी रात्री घडलेल्या या अपघातात सुदैवाने प्राणहानी टळली. कोसळलेल्या इमारतीच्या बाजूला शू-मॉलच्या मालकाने खोदकाम सुरू केले होते. अतिरिक्त खोदकाम झाल्याने बाजूच्या इमारतीचा पाया खचला आणि तीन मजली इमारत कोसळली. इमारत मालकाने बांधकाम-खोदकामाची परवानगी घेतली असली तरी त्यापेक्षा जास्त खोदकाम त्यांनी केले. मंजूर नकाशानुसार तळघराचे क्षेत्र ४७.२७ चौरस मीटर असले तरी प्रत्यक्ष खोदकाम १३९.६७ चौरस मीटर तळघराचे खोदकाम केलेले आहे. म्हणजेच ९२.४० चौरस मीटर खोदकाम अनधिकृत केले आहे. यामुळे विकास परवाना आदेशाची अवहेलना केली. याप्रकरणात भिकुलाल जमनलाल शर्मा, गजानन नारायण शर्मा, मनीष मांगिलाल शर्मा आणि शिवलाल किसनलाल भिंडा यांना महापालिका अधिनियमान्वये नोटीस बजाविण्यात आली आहे. तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसद्वारे उत्तर झोनच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. आता याप्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

१२९ शिकस्त इमारती उत्तर झोनमध्ये
अकोला महापालिका क्षेत्रातील सर्वात महागडे भूखंड आणि बाजारपेठ उत्तर झोनमध्ये आहे. याच भागात सर्वात जास्त म्हणजे १२९ शिकस्त इमारती आहेत. अकोला पूर्व झोनमध्ये ६३, अकोला दक्षिण झोनमध्ये ७, आणि अकोला पश्चिममध्ये ७१ शिकस्त इमारती आहेत.

शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या गांधी मार्गावरील तोष्णीवाल धर्मशाळेचा परिसर, डॉ. शुक्ल यांची जीर्ण इमारत, कोठडी बाजारातील जुन्या इमारती, खोलेश्वर, किराणा बाजार, जुना कापड बाजार, मानेक टॉकीजजवळील जुन्या इमारती जयहिंद चौकाच्या आजूबाजूचा परिसर जुन्या इमारतींनी व्यापला आहे. त्याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

शिकस्त इमारतींच्या भोवती भाडेकरूंचा वाद
४शहरातील बहुतांश जुन्या इमारतींमध्ये भाडेकरूंचा वाद आहे. जुन्या भाडेकरूंना बाहेर काढण्यासाठी घरमालक अनेकदा इमारत दूरूस्त न करता ती शिकस्त होण्याचीच परिस्थीती निर्माण करतात यामधून महागडी जागा ताब्यात घेतली जाते. असे प्रयोग अनेकांनी केले. त्यानंतर तो वाद वर्षोगणती न्यायालयात चालतो. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी शिकस्त इमारतींच्या तक्रारींकडे फारसे गांभीर्याने पाहत नाहीत.

Web Title: Akola 270 demolished buildings can be dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.