नगरच्या उपकेंद्राबाबत पुणे विद्यापीठ उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 03:25 PM2019-07-21T15:25:34+5:302019-07-21T15:26:04+5:30

तब्बल अकरा वर्षांपूर्वी अहमदनगरला पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर झाले. परंतु अद्याप त्याचा एका विद्यार्थ्यालाही लाभ झालेला नाही.

University of Pune sub-station | नगरच्या उपकेंद्राबाबत पुणे विद्यापीठ उदासीन

नगरच्या उपकेंद्राबाबत पुणे विद्यापीठ उदासीन

Next

अहमदनगर : तब्बल अकरा वर्षांपूर्वी अहमदनगरलापुणे विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर झाले. परंतु अद्याप त्याचा एका विद्यार्थ्यालाही लाभ झालेला नाही. केवळ विद्यापीठाची इच्छाशक्ती नसल्याने हे काम वर्षानुवर्षे रेंगाळले आहे. त्यामुळे अहमदनगर उपकेंद्र कृती समितीच पुढाकार घेऊन पुणे विद्यापीठाला ठोस कार्यक्रम देणार असून, त्याची अंमलबजावणी केल्यास उपकेंद्र कसे जोर धरते, हे पटवून देणार आहे. प्राथमिक स्तरावर दोन-तीन अभ्यासक्रम सुरू केले तरी उपकेंद्राचे कामकाज सुरू होईल, असा सूर तज्ज्ञांकडून व्यक्त झाला.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगरच्या विद्यापीठ उपकेंद्र प्रश्नाला वाचा फोडावी, या हेतूने ‘लोकमत’ने नगर जिल्ह्यातीत शिक्षण तज्ज्ञांना पाचारण करून चर्चासत्र घेतले. त्यात सर्वच तज्ज्ञांनी उपकेंद्र सुरू होण्याबाबत सकारात्मक पैलूंवर चर्चा केली. निवृत्त कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, नगर उपकेंद्राचे संचालक डॉ. एन. आर. सोमवंशी, न्यू आर्टस कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे, सीएसआरडीचे संचालक सुरेश पठारे, नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजकुमार देशपांडे, सिनेट सदस्य बाळासाहेब सागडे यांनी चर्चेत भाग घेतला. विद्यापीठ प्रशासनाकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने उपकेंद्राचे भिजत घोंगडे वर्षानुवर्षांपासून पडले आहे. लगेच कोट्यवधी रूपयांच्या भल्यामोठ्या इमारती उभारल्या तरच उपकेंद्र होईल, हा गैरसमज आहे. प्राथमिक स्तरावर दोन-तीन अभ्यासक्रम सुरू केले तरी उपकेंद्राचे कामकाज सुरू होईल. असा सूर या चर्चेतून निघाला. जिल्ह्यातील शिक्षण तज्ज्ञांची कृती समिती तयार करून पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेण्यात येईल व त्यांना कृती कार्यक्रम पटवून देण्याचा निर्णय या चर्चासत्रात झाला.

उपकेंद्र कार्यान्वित करण्यासाठी लगेचच मोठ्या रकमेची गरज नाही. सुरूवातीला विद्यापीठाने ५ कोटी रूपयांची तरतूद केली तरी प्रशासकीय इमारत होऊन कामकाज सुरू होऊ शकते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात मोठ्या महाविद्यालयांचे विद्यापीठांत रूपांतर होणार आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात जी लहान महाविद्यालये राहतील त्यांना दिशादर्शन करण्यासाठी नगरचे उपकेंद्र सक्षम होणे काळाची गरज आहे . यात जर विलंब झाला तर भविष्यात मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. - डॉ. सर्जेराव निमसे, शिक्षणतज्ज्ञ

२०१४ मध्ये आघाडी सरकार असताना नगरच्या उपकेंद्राला मान्यता मिळाली. परंतु पुढे विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने प्रशासकीय मान्यता रखडली. नंतर भाजप सरकारने उपकेंद्रांचे धोरण ठरविण्यासाठी एक समिती स्थापन केली. त्यानंतर सिनेट सदस्य, राजकीय व्यक्तींनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केलेला आहे. विद्यापीठाकडे निधी नसल्याने उपकेंद्राच्या कामांना मर्यादा येत आहेत. सध्या उपकेंद्रात काही अभ्यासक्रम सुरू आहेत. - डॉ. एन. आर. सोमवंशी, संचालक, विद्यापीठ उपकेंद्र

नगर जिल्ह्यातील विद्यार्थी, पालकांना प्रत्येक शैक्षणिक गोष्टीसाठी पुण्याला जावे लागते. यात वेळ व पैसा वाया जातो. नगरचे उपकेंद्र झाल्यास येथेच संशोधन किंवा विशेष अभ्यासक्रम सुरू करणे शक्य होईल. त्यामुळे आता सामाजिक रेटा लावल्याशिवाय ही यंत्रणा हलणार नाही. सर्व नगरकरांनी मनावर घेतले आणि रेटा लावला तर उपकेंद्र साकारेल. - सुरेश पठारे, संचालक, सीएसआरडी

तीन सिनेट बैठकीत नगरच्या उपकेंद्राचा मुद्दा मांडला, परंतु विद्यापीठ व्यवस्थापन कोणतीच ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. त्यांना उपकेंद्राचे गांभीर्य नसल्याचे यावरून दिसते. सामाजिक, राजकीय दबाव निर्माण केला तर हा प्रश्न सुटू शकतो. - बाळासाहेब सागडे, सिनेट सदस्य

पुणे विद्यापीठाकडे करोडो रूपयांचा निधी पडून आहे. मुळात तो खर्च करण्याची विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीची मानसिकता नाही. पुण्याला जाणे आता सोपे राहिलेले नाही. मोठ्या रहदारीमुळे पाच- पाच तास जाण्यासाठी लागतात. त्यामुळे नगरला उपकेंद्राची मोठी गरज आहे. सर्वच गोष्टी एकाच वेळी होणार नाहीत. टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम सुरू करून तसा स्टाफ मंजूर केला तरी उपकेंद्र गती घेईल. - एम.एम.तांबे, प्राचार्य, लॉ कॉलेज

राज्यातील इतर विद्यापीठांनी आपापली उपकेंद्रे सक्षम केली. उदा. नांदेड विद्यापीठाने लातूरचे उपकेंद्र सक्षम केले. परंतु एकमेव पुणे विद्यापीठ असे आहे जे आपले उपकेंद्र सक्षम करायला तयार नाही. विद्यापीठाची इच्छा असेल तर नगरमधील मोठी कॉलेजही पुढाकार घेऊन उपकेंद्राला मदत करतील. परंतु सुरूवात होणे गरजेचे आहे. - डॉ. भास्करराव झावरे, प्राचार्य, न्यू आर्टस कॉलेज

अभियांत्रिकीचे संलग्नीकरण नाशिक विभागीय कार्यालयाशी आहे. त्यामुळे परीक्षांपासून पेपर तपासणी किंवा इतर सर्वच कामासाठी नाशिकला जावे लागते. अभियांत्रिकीच्या प्रवेशावेळीचे कॅप येथेच सुरू केले तर सर्वांचीच सोय होईल. नगरचे उपकेंद्र होणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे. - डॉ. राजकुमार देशपांडे, प्राचार्य, छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी कॉलेज

Web Title: University of Pune sub-station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.