एक गाव दोन यात्रा !

By सुधीर लंके | Published: August 28, 2019 05:02 PM2019-08-28T17:02:54+5:302019-08-28T17:04:50+5:30

मुख्यमंत्र्यांनी सोमवारी नगरला येऊन विधानसभेचा बिगूल वाजविला. भाजपची उमेदवारांची यादी अद्याप जाहीर नाही

Two trips to a village! | एक गाव दोन यात्रा !

एक गाव दोन यात्रा !

Next

अहमदनगर : मुख्यमंत्र्यांनी सोमवारी नगरला येऊन विधानसभेचा बिगूल वाजविला. भाजपची उमेदवारांची यादी अद्याप जाहीर नाही. पण, मी राम शिंदे यांना पुन्हा मंत्री करणार, अशी घोषणा करत त्यांनी उमेदवारांची पहिली यादी जामखेडमध्ये फोडली. मुख्यमंत्र्यांनी भाजपची उमेदवारी जाहीर केल्याने राष्टÑवादी का माघार घेणार? राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल कोल्हे यांनीही कर्जत-जामखेडचे पुढील आमदार रोहित पवार असे सांगत त्यांची उमेदवारी जाहीर करुन टाकली. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी इच्छुकांचा पत्ता या सभांतून आपसूक कापला.
सोमवारी जामखेडमध्ये प्रवेश केला तेव्हाच प्रचार फलकांवर या संघर्षाची झलक दिसली होती. एकाच खांबावर भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांचेही झेंडे लागले होते. ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ असा संदेश लिहिलेले भाजपच्या महाजनादेश यात्रेचे फलक जागोजागी दिसत होते. त्यावर डाव्या बाजूला मुख्यमंत्र्यांची छबी. उजव्या बाजूला मंत्री राम शिंदे. शिंदे यांच्या वरती आवर्जून पंकजा मुंडे यांचे छायाचित्र. त्याच्या वरती भाजप, संघाची जुनी मंडळी व उजव्या बाजूला मोदींसह विद्यमान नेते दिसत होते. मध्यभागी शिवाजी महाराज. २०१४ च्या निवडणुकीत ‘छत्रपतींचा आशीर्वाद घेऊ, मोदीजींना साथ देऊ’ असे घोषवाक्य होते. आता या बॅनरवर मोदींची जागा देवेंद्र यांनी घेतली होती. भाजपच्या या फलकाशेजारीच राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेचे फलक. त्यावरही मध्यभागी शिवाजी महाराज. डावीकडे शरद पवार आणि खाली उजव्या कोपऱ्यात रोहित पवार यांची छबी. ‘नव्या स्वराज्याचा नवा लढा’ असे घोषवाक्य वरती ठळकपणे लिहिले होते.
अनेक ठिकाणी ‘कमळ’ आणि ‘घड्याळ’ हे दोन्ही चिन्ह असलेले झेंडे एकाच खांबावर त्रिकोणी पद्धतीने बांधलेले. कम्युनिस्टांच्या विळा कणसाचे चिन्ह असते तसे. एकमेकाला क्रॉस झालेले. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत हे दोन्ही झेंडे त्यांच्या स्वागताला होते. जामखेडमध्ये एमआयडीसीची जी प्रस्तावित जागा आहे. त्या जागेशेजारील मैदानावरच मुख्यमंत्र्यांची सभा होती. त्यासाठी भव्य शामियाना उभारला होता. एकीकडे एमआयडीसीचा ओसाड भूखंड. या जागेची ओळख दाखविणारा फलक जमिनीवर कलंडलेला. पूर्ण गंजून त्यावरील अक्षरे नामशेष झालेला. मंत्री राम शिंदे यांनी भाषणात केलेली विकासकामे सांगितली. तसा मतदारसंघांच्या अडचणींचा पाढाही वाचला. मंत्री असून ते स्वत: अडचणी मांडत होते. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात जिल्ह्याला काय दिले ते सगळे आकडेच वाचून दाखविले. जामखेड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी ११७ कोटीच्या मंजुरीचे पत्र व्यासपीठावरच शिंदे यांच्या हातात दिले. ‘तुम्ही ठरवा. मीही ठरवितो. तुम्ही शिंदे यांना मताधिक्य द्या. जेवढे मताधिक्य. तेवढे मोठे खाते’, अशी आॅफरच त्यांनी दिली.
सभा संपवून मुख्यमंत्री मार्गस्थ झाले. थोड्याच वेळात भूमकडून राष्टÑवादीची यात्रा आली. सुरुवातीला तेलंगशी गावचे हलगी पथक. एका रथावर शिवाजी महाराज यांचा पुतळा. मागे एका वाहनात अमोल कोल्हे, रोहित पवार, जयंत पाटील उभे. ते लोकांना हात उंचावत होते. तरुणांची मोठी गर्दी. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत नेते बसवर उभे असल्याने लोक जवळ जाऊ शकत नव्हते. राष्टÑवादीच्या यात्रेत मात्र लोक थेट नेत्यांच्या वाहनांपर्यंत जाऊ शकत होते. त्यामुळे गर्दी उसळली होती. खासदार अमोल कोल्हे यांनी भाषणात याचा उल्लेख केला. ‘आमने-सामने भिडल्यानंतर खरी ताकद कळते. मुख्यमंत्री म्हणतात, राष्टÑवादीच्या यात्रेला गर्दी नाही. त्यांना म्हणावं, ‘उघडा डोळे बघा नीट’, असे सांगत त्यांनी आमचे शक्तिप्रदर्शन कसे जोरदार आहे हे कथन केले. एकाही पक्षाने उमेदवारांच्या याद्या अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. पण, कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे व रोहित पवार हा सामना होईल, हे दोन्ही यात्रांनी जाहीर केले. ‘लोक पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरीला जातात. आमचे दैवत ही जनता आहे. त्यामुळे जनतेच्या भेटीसाठी माझी ही यात्रा आहे’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले खरे. पण, त्यांची ही यात्रा मुंबईच्या दिशेनेही निघाली आहे. राम शिंदे आणि पंकजा मुंडे यांना घेऊन मी मुंबईला जाणार असे ते म्हणालेही. राष्टÑवादीलाही विकास हवा आहे. मात्र विकास केवळ ‘रोहित’ दादाच करु शकतात, ते इतरांचे काम नाही, असे त्यांच्याही विकासाचे सूत्र आहे. एका गावात दोन यात्रा आल्या. दोन्ही यात्रांचे फलक सोबत झळकत होते. त्यांचा सूत्रसंचालकही एकच होता. यात्रेत माणसे भरपूर. पण, चर्चा दोघांचीच. ‘राम शिंदे’-‘रोहित पवार’.

- सुधीर लंके

Web Title: Two trips to a village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.