Sweden's Maratha Advisor - Nila Vikhe | स्वीडनची मराठमोळी सल्लागार
स्वीडनची मराठमोळी सल्लागार

ठळक मुद्देस्वीडनच्या पंतप्रधान पदावर पुन्हा सोशल डेमोक्रॅट पक्षाचे नेते स्टीफन लोफव्हन यांची निवड झाली. लोफव्हन यांच्यासोबत सलग दुसऱ्यांदा नीला पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. सध्या तिच्याकडे अर्थ, करप्रणाली, बजेट, गृह आदी विभागांचे कामकाज आहे. पंतप्रधानांच्या विश्वासू अशी त्यांची ओळख आहे.वयाच्या १६ व्या वर्षी नीला यांनी स्वीडनमधील ग्रीन पार्टीमध्ये प्रवेश केला. तसेच स्टॉकहोम महानगरपालिकेची सदस्य म्हणून ती काम पाहत आहे.

- साहेबराव नरसाळे

अहमदनगर : स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात गेल्या तीन वर्षांपासून एक मराठमोळी तरुणी सल्लागारपदाची जबाबदारी सांभाळतेय. नीला विखे पाटील असे तिचे नाव. दिवंगत खासदार, माजी मंत्री बाळासाहेब विखे यांची नात व राज्यभरात १०२ शिक्षण संस्थांचे जाळं उभं केलेल्या अशोक विखे पाटील यांची ती कन्या. नीला हिने अवघ्या सोळाव्या वर्षी राजकारणात प्रवेश केला अन् वयाच्या ३० वर्षी पंतप्रधानांच्या सल्लागारपदापर्यंत धडक मारली.
अशोक विखे हे स्टॉकहोमला (स्वीडन) गेलेले असताना ईवा लील यांची भेट झाली. स्वीडनमध्येच त्यांनी लग्न केले. या लग्नासाठी बाळासाहेब विखे पाटील उपस्थित होते. रिसेप्शन भारतात झाले. मराठमोळ्या पद्धतीने सत्यनारायणाची पूजा झाली. त्यानंतर ते पुन्हा स्वीडनला परत गेले. त्याचवेळी अशोक व ईवा यांच्या संसारवेलीवर नीलाच्या रुपाने गोड पुष्प उमलले. साधारणपणे एक वर्षाची असताना अशोक विखे यांच्यासोबत नीला अहमदनगरमध्ये आली. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत ती नगरमध्येच होती. नंतर ईवा स्वीडनला परत गेल्या. तेव्हा नीलासुद्धा आईबरोबर स्वीडनला गेली.
लहानपणापासून अत्यंत हुशार असलेल्या नीलाचे इंग्रजी भाषेसह स्वीडिश आणि स्पॅनिश भाषेवर प्रभुत्त्व आहे़ तिला थोडीथोडी मराठीही बोलता येते. नीला हिने गुटेनबर्ग वाणिज्य विद्यापीठातून वाणिज्य आणि कायदा विषयात पदवी मिळविली असून, एमबीएदेखील केले आहे. तसेच माद्रिद येथील डी कॉम्प्युटेंस विद्यापीठातूनही एमबीए केले आहे. अशोक विखे-पाटील सांगतात, ‘नीला खूपच जिद्दी आहे. तिला थोडे मराठीही बोलता येते. शिक्षणानंतर तिने पुण्यात एक वर्ष कामही केले आहे. तिला आजोबा (बाळासाहेब विखे) यांच्याविषयी खूप जिव्हाळा होता. आजोबांशी ती नेहमी फोनवरुन बोलत असे. आजीशी भेटायला ती सहा महिन्यांपूर्वी आली होती.’
२०१५ मध्ये प्रथमच पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून निवड झाल्यानंतर नीला या लोणी (ता. राहाता) येथे आजी-आजोबांना भेटायला आल्या होत्या. गावात त्यांचे जंगी स्वागत झाले होते. त्यावेळी त्यांनी आपले आजोबा बाळासाहेब विखे-पाटील आणि भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आदर्श असल्याचे सांगत लोणीकरांची मने जिंकली होती. तेथील विद्यार्थिनींशी संवाद साधला होता.
२०१५ मध्ये पहिल्यांदा नीला स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून रुजू झाल्या, त्यावेळी काँगे्रस नेते माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांना मोठा आनंद झाला होता. आपली नात कुटुंबाचा वारसा पुढे नेत आहे, अशा शब्दात बाळासाहेब विखे यांनी अभिमान व्यक्त केला होता.

नीलाचे राजकारण आणि पंतप्रधानांच्या विश्वासू

वयाच्या १६ व्या वर्षी नीला यांनी स्वीडनमधील ग्रीन पार्टीमध्ये प्रवेश केला. ग्रीन पार्टीमध्ये विविध पदांवर नीला हिने यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. वयाच्या अवघ्या ३० वर्षी स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नीला हिने पाऊल ठेवले. तेव्हापासून आजपर्यंत ती या पदावर काम करीत आहे. तसेच स्टॉकहोम महानगरपालिकेची सदस्य म्हणून ती काम पाहत आहे. नुकतीच स्वीडनच्या पंतप्रधान पदावर पुन्हा सोशल डेमोक्रॅट पक्षाचे नेते स्टीफन लोफव्हन यांची निवड झाली. सोशल डेमोक्रॅट पक्ष व ग्रीन पार्टी यांची आघाडी आहे. त्यामुळे लोफव्हन यांच्यासोबत सलग दुसऱ्यांदा नीला पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. सध्या तिच्याकडे अर्थ, करप्रणाली, बजेट, गृह आदी विभागांचे कामकाज आहे़ पंतप्रधानांच्या विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. ग्रीन पार्टीमध्ये नीला फर्स्ट रिझर्व्ह आहे. म्हणजे स्वीडनच्या संसदेत ग्रीन पार्टीचे जे खासदार आहेत, त्यांच्यापैकी कोणी राजीनामा दिला किंवा काही कारणास्तव पद रिक्त झाले तर त्या जागेवर आपोआप नीला यांची वर्णी लागणार आहे.

मराठमोळा स्वयंपाक आवडतो

दरवर्षी न चुकता नीला आजीला, मावशीला भेटायला येते. शिवाय मराठमोळा स्वयंपाकही तिला आवडतो. ती अनेक मराठमोळी पदार्थ बनवते, असे अशोक विखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Sweden's Maratha Advisor - Nila Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.