Suicide of a minor girl after being harassed by her boyfriend, | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, पुणे येथील आरोपीला अटक

प्रियकराच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, पुणे येथील आरोपीला अटक

 

अहमदनगर : पुणे येथील प्रियकराच्या त्रासाला कंटाळून नगर शहरातील एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब समोर आली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे.

सोहेल शेख (रा. वारजे माळवाडी, पुणे पूर्ण नाव माहीत नाही), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख याच्या त्रासाला कंटाळून नगर शहरातील पंधरावर्षीय मुलीने २५ नोव्हेंबर रोजी दुपारी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. याबाबत मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सोहेल शेख याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व पोस्को कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर मयत मुलगी ही दीड वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये वारजे माळवाडी (पुणे) येथे नातेवाईकांकडे आली होती. या ठिकाणी तिची सोहेल शेख याच्यासोबत ओळख झाली. तेव्हापासून शेख व सदर मुलगी एकमेकांच्या संपर्कात होते. फेब्रुवारी व मार्च महिन्यात शेख याने सदर मुलीच्या वडिलांना फोन करून मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून द्या असे म्हणून दमबाजी केली होती. याबाबत मुलीच्या आईने चाईल्ड लाईन संस्थेकडे तक्रार केली होती, तसेच एका लग्नसमारंभादरम्यान सदर मुलीच्या एका नातेवाईकाने तिच्यासोबत काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यावरून सोहेल शेख याने फोटो पोस्ट करणाऱ्या तरुणाला इन्स्टाग्रामवरून चॅटिंग करून शिवीगाळ केली होती,  सदर मुलीसही वारंवार फोन करून त्रास दिला होता.

आरोपी शेख याने मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तिला वारंवार फोन करून तिच्याशी प्रेमसंबंध तयार केले, मुलीस टिकली व लिपस्टिक लावण्यास विरोध केला. लग्न करण्यासाठी व धर्मपरिवर्तन करण्यासाठी बळजबरी करून तिला त्रास दिला. याच त्रासाला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली, असे या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Suicide of a minor girl after being harassed by her boyfriend,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.