निवडणुकीत साखर कारखानदारांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 01:55 PM2019-10-11T13:55:04+5:302019-10-11T13:55:48+5:30

भाजपने जिल्ह्यात पाच मतदारसंघात साखर सम्राटांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. राष्ट्रवादीनेही त्यांच्याविरोधात चार मतदारसंघात साखर कारखानदारांना उमेदवारी दिली असून, काँग्रेस आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी एक, असे अकरा उमेदवार विधानसभेत नशीब आजमावित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात डझनभर साखर सम्राटांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Sugar makers' reputation | निवडणुकीत साखर कारखानदारांची प्रतिष्ठा पणाला

निवडणुकीत साखर कारखानदारांची प्रतिष्ठा पणाला

Next

अण्णा नवथर ।  
अहमदनगर : भाजपने जिल्ह्यात पाच मतदारसंघात साखर सम्राटांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. राष्ट्रवादीनेही त्यांच्याविरोधात चार मतदारसंघात साखर कारखानदारांना उमेदवारी दिली असून, काँग्रेस आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी एक, असे अकरा उमेदवार विधानसभेत नशीब आजमावित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात डझनभर साखर सम्राटांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 
साखर कारखानदारी हे जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू आहे़  गतवेळी राज्यात सत्तांतर झाले. त्याचा फटका नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारीलाही बसला. राज्यातील अनेक साखर कारखानदार भाजपवासी झाले़ नगर जिल्हाही त्याला अपवाद नाही. काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजपावासी झाले. राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हेदेखील भाजपमध्ये दाखल झाले. त्यांचा अकोल्यात अगस्ती सहकारी साखर कारखाना आहे. संगमनेरमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे साखर कारखानदार आहेत. सेनेने त्यांच्याविरोधात साहेबराव नवले यांच्या रुपाने उद्योजक उमेदवार दिला. शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचेही साखर कारखाने आहेत. कोपरगावमध्ये तर दोन साखर कारखानदारांमध्येच लढत आहे. भाजपाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे व राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे दोघेही साखर कारखानदार आहेत. राहुरीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा प्रसाद शुगर कारखाना आहे. त्यांच्याविरोधातील भाजपाचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले हे बिगर कारखानदार आहेत. नेवाशात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार माजी आमदार शंकरराव गडाख हे मुळा सहकारी साखर कारखान्याशी संबंधित आहेत. शेवगावमध्ये दोन साखर कारखानदारांमध्ये सामना रंगला आहे. भाजपाच्या उमेदवार मोनिका राजळे यांचा वृध्देश्वर, तर राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांचा केदारेश्वर साखर कारखाना आहे. श्रीगोंद्यात भाजपाचे उमेदवार बबनराव पाचपुते यांचे हिरडगाव आणि देवदैठण, असे दोन साखर कारखाने आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा साखर कारखाना नसला तरी ते उद्योजक आहेत. तसेच पवार हे साखर कारखानदारीशी संबंधित आहेत. पारनेरचे दोन्ही उमेदवार बिगर कारखानदार आहेत.  नगर शहरातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप व सेनेचे उमेदवार अनिल राठोड हे बिगर कारखानदार आहेत. श्रीरामपूरमध्येही बिगर कारखानदारांमध्ये लढत आहेत. पण, विखे व थोरात हे कारखानदार तेथील उमेदवारांच्या पाठीशी आहेत. 
घुले व जगताप यांची प्रतिष्ठा पणाला
राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा नेवाशात ज्ञानेश्वर सहकारी कारखाना आहे़ त्यांनी यंदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांचा कुकडी सहकारी साखर कारखाना असून त्यांनीही विधानसभा निवडणुकीतून माघार घेत राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांच्या मागे ताकद उभी केली आहे. घुले यांनी नेवाशाचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार माजी आमदार शंकरराव गडाख व शेवगाव- पाथर्डीचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांना ताकद दिली आहे. त्यामुळे या दोन्ही साखर कारखानदारांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. 

Web Title: Sugar makers' reputation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.