अध्यात्म/आपली आपण करा सोडवण अर्थात म्हातारपणाची आताच करा तजवीज/अशोकानंद महाराज कर्डिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 10:37 PM2020-09-13T22:37:59+5:302020-09-13T22:38:48+5:30

ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण झाला की मग गृहस्थ आश्रमात प्रवेश होतो. गृहस्थ आश्रमात सुद्धा संयमाने राहून प्रजासातत्य राखावे लागते आणि याच वेळी वानप्रस्थ आश्रमाची तयारी करावी लागते. पण माणसे येथेच निष्काळजीपणा करतात. भविष्याचा विचार व तजवीज केली तर म्हातारपण सुखाचे जावू शकते. अन्यथा दु:ख टळत नाही.  

Spirituality / Do your own thing | अध्यात्म/आपली आपण करा सोडवण अर्थात म्हातारपणाची आताच करा तजवीज/अशोकानंद महाराज कर्डिले

अध्यात्म/आपली आपण करा सोडवण अर्थात म्हातारपणाची आताच करा तजवीज/अशोकानंद महाराज कर्डिले

Next

भज गोविन्दम :१६ 
 अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशन विहीनं जातं तुण्डम।
 वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डम॥१६ ॥
---------------------------
भारतीय संस्कृतीमध्ये चार आश्रम सांगितले आहेत. खरे तर ते आयुष्याचे एक सुंदर नियोजन आहे. पण माणूस त्याप्रमाणे वागत नसतो आणि शेवटी दु:ख पदरात पडल्यावाचून राहत नाही. ब्रह्मचर्य, गृहस्थ,वानप्रस्थ आणि शेवटी संन्यास हे चार आश्रम म्हणजेच मानवी जीवनाचे सुंदर असे नियोजन आहे. जीवन जागण्याची ही एक सुंदर असी शैली आहे. म्हातारपण ही न टळणारी बाब आहे. त्याचे जर नियोजन तरुणपणात केले तर वृद्धापकाळ सुकर होतो अन्यथा भयानक असे दु:ख वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. ब्रह्मचर्य आश्रमात शिक्षण व करियर घडवणे हे महत्वाचे. जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगत सांगितले आहे,  ब्रम्हचारी धर्म घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्में ॥१॥वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥ध्रु.॥परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याती धर्म कुळ नाहीं ॥२॥बोले वर्म जो चाले याविरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥३॥ तुका म्हणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो सीण दु:ख पावे ॥४॥ 


ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण झाला की मग गृहस्थ आश्रमात प्रवेश होतो. गृहस्थ आश्रमात सुद्धा संयमाने राहून प्रजासातत्य राखावे लागते आणि याच वेळी वानप्रस्थ आश्रमाची तयारी करावी लागते. पण माणसे येथेच निष्काळजीपणा करतात. भविष्याचा विचार व तजवीज केली तर म्हातारपण सुखाचे जावू शकते. अन्यथा दु:ख टळत नाही.  


या चार आश्रमाच्या व्यतिरिक्त एक पाचवा आश्रम या कलियुगात निर्माण झाला आहे, तो म्हणजे ‘वृद्धाश्रम’. म्हातारपण आले की मग जे हाल सुरु होतात त्याचा विचार न केलेला बरा. मुले बरे बघत नाहीत किंबहुना ते उपेक्षा करतात. कधीकधी अपमानास्पद बोलतात. जर काही इस्टेट, पेन्शन असेल तर तेवढ्यापुरते गोड बोलतात. कधीकधी तर त्यांच्या विरोधात कोर्टात सुद्धा जातात. मुलांनी सर्व शेअर ताब्यात घेतले म्हणून रेमंड कंपनीच्या दाम्पत्यांना रो हाउसमध्ये राहावे लागले. प्रसिध्द नट बालगंधर्व हे म्हातारपणी पुण्यात फुटपातवर अर्धांगवायू झाल्यामुळे असहाय अवस्थेत पडलेले आढळले. म्हणून ‘आपली आपण करा सोडवण’ हे ज्ञानेश्वर महाराजांचे वचन सार्थ आहे. एक तर शरीर साथ देत नाही. नाना प्रकारचे रोग शरीरात आलेले असतात. चालिले सोबती । काय मानिली निश्चिंती । काय करीसी एकला । काळ सन्निध पातला ॥ काही सावध तो बरवा । करी आपुला काढावा ॥ चालिले अगळे । हळूच कान केश डोळे ॥ वोसरले दात । दाढा गडबडल्या आत ॥ एकली तळमळ । जिव्हा भलते ढायी लोळे ॥ तुका म्हणे यांनी  । तुझी मांडली घालणी ॥ 


केसांचा वाक, मानेला बाक, पाठीचा विळा, हाडांचा खिळा, म्हातारपण हे नको मजला, नाही सुख नुसत्याच कळा मिरजेतल्या अशोक माळींच्या कवितेतल्या या ओळी यथार्थ वर्णन करतात. म्हातारपणाची व्यवस्था अगोदर करणे खूप महत्वाचे आहे. श्री. तुकाराम महाराज म्हाताºया  माणसाची अवस्था काय असते ते सांगतात. म्हातारपणी थेटे पडसे खोकला । हात कपाळाला । लावुनि बसे ॥ खोबरियाची वाटी । जाले असे मुख । गळतसे नाक । श्लेष्मपुरी ॥ बोलो जाता शब्द । न येचि हा नीट । गडगडी कंठ । कफ भारी ॥ शेजारी म्हणती । मरेना का मेला । आणिला कांटाळा । येणे आम्हा ॥ तुका म्हणे आता । सांडूनि सर्व काम । स्मरा राम राम । क्षणा क्षणा ॥


 या सर्व गोष्टीचा विचार केला तर श्री शंकराचार्य स्वामी महाराज म्हातारपणाचे वर्णन करतात. वृद्धापकाळात इतके भयंकर हाल असतात तरीही त्या व्यक्तीची आशा सुटत नाही. काही तरी सतत खटपट करीत राहतो. वास्तविक पाहता आता खरा विश्रांतीचा काळ असतो. पण आयुष्यभर जे करीत आला त्याची सवय जात नाही. सारखे मुलांच्या संसारात लक्ष घालतो. त्यांना सल्ले देतो. वास्तविक ते अनुभवाचे बोल असतात आणि नेमके हेच त्या मुलांना आवडत नसते. चीड चीड सुरु होते. मुले मग आई वडिलांना वृद्धाश्रमात  जाण्याचा सल्ला देवू लागतात. सासू सुनेचे झगडे बंद होत नाहीत. नातवंडात जीव रमवावा असे वाटते. पण त्या मुलांचे विश्व वेगळे असते  आणि नटसम्राटचे जे झाले तेच होत असते.  याकरिता आशा या परम दुखं, नैराश्य परम सुखं हे भागवतातले वचन खरे आहे. अध्यात्माची गोडी असेल तर या प्रतिकुलतेचे काहीही वाटत नाही. कुठल्याही प्रकारची आशा आकांक्षा ठेवू नये व भगवंताच्या भजनात काळ कसा घालवता येईल ते पाहावे. म्हणजे म्हातारपणसुद्धा आनंदात जाईल व अनुभवाची शिदोरी कामाला येईल.  
-भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले 
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी(पाटील)ता. नगर 
मोब. ९४२२२२०६०३ 
 

Web Title: Spirituality / Do your own thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.