साहेब... रुग्ण मरत आहेत, काहीतरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:19 AM2021-04-14T04:19:45+5:302021-04-14T04:19:45+5:30

अहमदनगर : साहेब... जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. ऑक्सिजनअभावी रुग्ण मरत आहेत. आता तुम्हीच काही तरी ...

Sir ... patients are dying, do something | साहेब... रुग्ण मरत आहेत, काहीतरी करा

साहेब... रुग्ण मरत आहेत, काहीतरी करा

Next

अहमदनगर : साहेब... जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. ऑक्सिजनअभावी रुग्ण मरत आहेत. आता तुम्हीच काही तरी करा, अशी आर्त हाक कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली.

ऑक्सिजनचा पुरवठा करणारा टँकर मंगळवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचा आदेश दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा उपस्थित होते. जिल्हाधिकारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात येताच त्यांना रुग्णांच्या नातेवाइकांनी गराडा घातला आणि समस्यांचा पाढाच वाचला. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रुग्ण मरत आहेत. त्यांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नाही. नव्या रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत. व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. रेमडेसिविर इंजेक्शन नाहीत. मृत्यू पावणारे सर्वाधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयातील आहेत. त्यांच्याकडे वेळेवर लक्ष न दिल्याने त्यांना आपला प्राण गमवावा लागला आहेत. डॉक्टर रुग्णांकडे अजिबात लक्ष देत नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्या.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना दिलासा दिला. रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाइकांना परवानगी नाही. त्यामुळे आतमध्ये सेवा व्यवस्थित आहे की नाही, हे नातेवाइकांना कळत नाही. मात्र, रुग्णालयात सर्व सेवा चांगल्या पद्धतीने दिल्या जात आहेत. त्यामुळे नातेवाइकांनी काळजी करू नये. रुग्णांना बरे करणे हेच यंत्रणेचे ध्येय आहे. त्यासाठी प्रशासनाला साथ द्या.

-------

आता पोलीस बंदोबस्त

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रुग्णांच्या नातेवाइकांचीच मोठी गर्दी आहे, तसेच नातेवाईक व रुग्णालय कर्मचारी यांच्यातील वाद नित्याचे आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आता २४ तास पोलीस बंदोबस्त लावण्याचा आदेश जिल्हाधिकारी भोसले यांनी दिला आहे. याबाबत आदेश काढण्याच्या सूचना त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना दिल्या.

-------

फोटो-

जिल्हा रुग्णालयात टँकरद्वारे ऑक्सिजनपुरवठा करण्यात आला. त्याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री केली. यावेळी रुग्णांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा रुग्णालयातील असुविधांबाबत तक्रारी केल्या. (छायाचित्र : साजीद शेख)

Web Title: Sir ... patients are dying, do something

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.