विचारांनी जुळल्या रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 04:42 PM2020-02-14T16:42:46+5:302020-02-14T16:43:28+5:30

जात-पंथ अन् थेट धर्माचा उंबरा ओलांडून दोघेही एकमेकांचे झाले़ जे म्हणत होते, यांचा संसार टिकणार नाही, त्यांच्याच नाकावर टिच्चून दोघांनीही यशस्वी संसार केला. नाव कमावले. निख्खळ प्रेमाचा एक अध्याय लिहिला.

Silk ties matched with thoughts | विचारांनी जुळल्या रेशीमगाठी

विचारांनी जुळल्या रेशीमगाठी

Next

व्हॅलेंटाईन-डे स्पेशल / साहेबराव नरसाळे 
ती खूप आवडायची. पण प्रपोज करण्याची त्याची डेअरिंग नव्हती. आपल्या जोडीदाराचे मन न कळेल ती प्रेयसी कसली? तिने ते हेरले अन् तिनेच प्रपोज केले. जात-पंथ अन् थेट धर्माचा उंबरा ओलांडून दोघेही एकमेकांचे झाले़ जे म्हणत होते, यांचा संसार टिकणार नाही, त्यांच्याच नाकावर टिच्चून दोघांनीही यशस्वी संसार केला. नाव कमावले. निख्खळ प्रेमाचा एक अध्याय लिहिला. ही लव्हस्टोरी आहे. नीलिमा आणि प्रियदर्शन बंडेलू यांची.
आजच्या नीलिमा बंडेलू या तेव्हाच्या नीलिमा भास्करराव जाधव. दीन-दलितांसाठी आयुष्य वेचणा-या कॉम्रेड भास्करराव जाधव यांच्या कन्या. लहान-पणापासून त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारांचे संस्कार झालेले. वाचनही प्रचंड. त्यांचे अख्खे कुटुंबच कॉम्रेड़ या कॉम्रेड मुलीने १९८४ साली प्रियदर्शन यांना प्रपोज केले. थेट लग्नाचीच मागणी घातली. त्यावेळचे हे मोठे धाडस. प्रियदर्शन आणि नीलिमा हे दोघेही एकमेकांचे लहानपणापासूनचे सोबती़ एकाच वर्गात शिकलेले़ पुढे पत्रकारितेसाठी नीलिमा पुण्याला गेल्या. लाल निशाण पक्षाच्या श्रमिक विचार दैनिकात त्यांनी उपसंपादक म्हणून कामही केले. परंतु त्यांना एमएसडब्ल्यूचे शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्या नगरला आल्या. प्रियदर्शन हे नीलिमा यांना एमएसडब्ल्यूचा प्रोजेक्ट करायला मदत करीत़ वरकरणी पाहता त्यांची लव्हस्टोरी साधी-सरळ वाटते. पण प्रियदर्शन हे धर्माने ख्रिश्चऩ दोघांचाही धर्म वेगळा़ आवडीनिवडी प्रचंड वेगळ्या. प्रियदर्शन यांचे कुटुंब एकदम धार्मिक़ रुढी, परंपरा पाळणारे़ दिवसातून तीन वेळा प्रार्थना करणारे. त्याउलट जाधव कुटुंब़ पूर्णपणे नास्तिक म्हणता येईल असे. नीलिमा यांच्यावरही तोच पगडा. पण प्रियदर्शन हे नीलिमा यांच्यासाठी जीव की प्राण. 
त्यांनी त्याच दिवशी वडिलांना गाठले़ प्रियदर्शन यांच्याशी विवाह करण्याचा घेतलेला निर्णय सांगितला. भास्करराव जाधव यांनी कागदावर दोन कॉलम पाडले. एका कॉलममध्ये सकारात्मक तर दुस-या कॉलममध्ये कराव्या लागणा-या तडजोडी लिहिल्या होत्या. या दोन्ही बाबींवर एकदा विचार कर आणि मग निर्णय घे, असा सल्ला दिला. पण नीलिमा यांचा निर्णय पक्का होता. त्याच दिवशी सायंकाळी प्रियदर्शन यांच्या आई विनता बंडेलू यांना भेटून नीलिमा यांनी लग्नाचा विषय काढला. त्या एकदम हबकल्या़ धर्म, रुढी, परंपरा असं सारं त्यांनी नीलिमा यांना सांगितलं. त्यावर नीलिमा यांनी आपल्या सासूबार्इंची समजूत काढली अन् अवघ्या चार तासात लग्नाचा मुहूर्त ठरला. 
१९८४ साली सौभाग्य सदन कार्यालयात आंतरधर्मीय नोंदणीपद्धतीने दोघांचाही विवाह झाला. नीलिमा आणि प्रियदर्शन हे दोघेही नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमात रमणारे होते. त्यामुळे दोघांचेही मित्र-मैत्रिणी एकच़ नीलिमा-प्रियदर्शन यांच्या रेशीमगाठी जुळल्यानंतर अनेकजण म्हणू लागले, यांचा विवाह टिकणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण नीलिमा-प्रियदर्शन यांनी सर्वांची भविष्यवाणी खोटी ठरवत, 
आपल्या लव्हस्टोरीला सक्सेस स्टोरी बनविले. 
लग्नानंतर कुटुंबाची वीण अधिक घट्ट व्हावी, म्हणून नीलिमा प्रार्थना करु लागल्या़ सासूबार्इंसोबत चर्चला जाऊ लागल्या. दरम्यान प्रियदर्शन हे नगर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. दोघेही विविध मुद्यांवर वैचारिक मत मांडीत. पण त्यांच्यात कधी वाद झाले नाहीत. दोघांचेही कविता संग्रह प्रकाशित झाले. नीलिमा यांच्या भावकविता तर प्रियदर्शन यांच्या सामाजिक, पददलितांचे जगणे मांडणा-या कविता होत्या. याविषयी बोलताना प्रियदर्शन बंडेलू सांगतात, नीलिमा यांच्यामुळेच माझ्यामध्ये सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या. त्या कवितेत उमटल्या. नीलिमा-प्रियदर्शन यांच्या संसारवेलीवर प्रिनित व निमिषा ही दोन पुष्पे उमलली. दोघेही उच्चशिक्षित आहेत. 
 

Web Title: Silk ties matched with thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.