शूरा आम्ही वंदिले : मरणाला नाही भ्याला कोंडाजी अमर जाहला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 07:30 AM2018-08-14T07:30:00+5:302018-08-14T07:30:00+5:30

‘१९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात पंजाब लगतच्या सरहद्दीवर झालेल्या घनघोर संघर्षात शहीद सैनिक कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर यांना २ आॅक्टोबर १९६५ ला वीरगती प्राप्त झाली.’

Shoora we Vandelay: Kondaji Amar Jahla not to die | शूरा आम्ही वंदिले : मरणाला नाही भ्याला कोंडाजी अमर जाहला

शूरा आम्ही वंदिले : मरणाला नाही भ्याला कोंडाजी अमर जाहला

googlenewsNext

‘ मै भारत सरकार और अपनी और से आप के दु:ख में यह संदेश भेज रहा हूँ। भारत की जनता का हृदय भी आप के साथ है। हम सबकी प्रार्थना है कि इस महान शोक में भी आप को धैर्य और शांती प्रदान हो।’ दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे हे पत्र येण्यापूर्वी ७ आॅक्टोबर १९६५ ला रुंभोडीत ‘४७’ शब्दांची तार आली. त्यात संदेश होता.. ‘१९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात पंजाब लगतच्या सरहद्दीवर झालेल्या घनघोर संघर्षात शहीद सैनिक कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर यांना २ आॅक्टोबर १९६५ ला वीरगती प्राप्त झाली.’ गावातील अवघ्या २७ वर्षांचा जवान शहीद झाला.. रुंभोडीकरांचं काळीज दुभंगून टाकणारी ही तार.. रुंभोडी-इंदोरीकरांसह मालुंजकर कुटुंबाला दु:खद असली तरी देशासाठी त्यांचे बलिदान कामी आले.
अकोले तालुक्यातील मालुंजे गावचे वीरपुत्र शहीद कोंडाजी मालुंजकर यांचा जन्म २० नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. वडील लक्ष्मण व आई सरुबाई यांचे ते एकुलते एक पुत्र. देऊबाई या त्यांच्या बहीण. देऊबाई नऊ वर्षांच्या व ते सात वर्षांचे असताना त्यांचे मातृपितृ छत्र हरपले. पुढे चुलत्यांनी आणि नंतर देऊबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांची बहीण देऊबाई यांचे पुंजाजी नवले यांच्याशी झाले. १९५६च्या दरम्यान देऊबाई यांनी इंदोरी गावातीलच लोहटे कुटुंबातील लहानबाई यांच्याशी कोंडाजी यांचे लग्न लावून दिले. लग्नासाठी कोंडाजी यांनी रोजगारासाठी एकट्याने गाव सोडलं. मुंबापुरी गाठली. मुंबईत पितळी भांड्यांना ‘कलही’ लावण्याचं हंगामी काम ते करत. उंची साडेसहा फूट, रुबाबदार शरीरयष्टी यामुळे ते पोलिसात भरती झाले. पण ही बाब त्यांच्या घरातील लोकांना आवडली नाही. त्यांना तत्काळ नोकरी सोडावी लागली. त्यांनी पुन्हा मुंबई गाठली. पण त्या कामात त्यांचे मन रमेना आणि लग्न झाल्यानंतर चार-पाच वर्षांनी वयाच्या २३ व्या वर्षी २० नोव्हेंबर १९६१ ला ते भारतीय सैन्यदलात भरती झाले.
भरती झाल्यानंतर तीन-चार महिने ते घरीच आले नाहीत. घरातील विरोध झुगारून त्यांनी सैन्यदलात दाखल होणं त्यांचे चुलते, काकू यांना आवडलं नाही. त्यामुळे बायकोसह त्यांनी सासूरवाडी गाठली आणि सासूरवाडीचे आधार बनले. सैन्यदलात ते मराठा बटालियन बेळगावमध्ये शिपाई म्हणून सेवा बजावू लागले. १९६५ च्या युद्धात पंजाबच्या सीमावर्ती भागात शत्रूशी लढताना रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास शत्रूची गोळी लागून २ आॅक्टोबर १९६५ रोजी ते शहीद झाले. रुंभोडीतील मेजर दौलत दिनकर देशमुख त्यावेळी सैन्यदलात प्रमुख पदावर होते. त्यांनी ओळख पटल्यानंतर सरकारच्या मदतीने रुंभोडीला तारेने संदेश पाठवला. ही तार पाच दिवसांनी रुंभोडीत दाखल झाली. तो दिवस होता शुक्रवार. त्या वर्षीच्या दसऱ्यानंतरचा दुसरा दिवस. रुंभोडी-इंदोरी दोन्ही जुळी गावं दु:ख सागरात बुडाली. शहीद कोंडाजींवर मृत्यूनंतरचे सर्व सोपस्कार सरकारने पूर्ण केले. मालुंजकर कुटुंबाजवळ केवळ एक तारेचा कागद हीच शेवटची आठवण उरली. ‘१९६५ ला रंगपंचमीचा सण झाल्यानंतर ते सीमेवर गेले़ परत आलेच नाहीत. नवरात्री उत्सवात त्यांना वीरगती प्राप्त झाल्याची बातमी हाती आली. त्यांना वीरगती मिळाली, तेव्हा मुलगा दीपक अवघा दीड वर्षाचा होता, असे लहानबाई सांगत होत्या. त्यावेळी त्यांना आपले अश्रू लपवता आले नाही. लहानबार्इंनी माहेरी राहून एकुलता एक मुलगा दीपक बरोबर आई-वडिलांचाही सांभाळ केला. त्यांना त्यावेळी २७ रुपये पेन्शन मिळत असे. ‘चाकर असावं, पण बेकार नसावं’ हे पतीचं वाक्य लहानबार्इंच्या स्मरणात होतं. पती निधनानंतर पाच वर्षांनी त्यांनी विडी तयार करण्याची कला शेजारी असलेल्या महिलांकडून अवगत करून घेतली आणि विडी कामगार म्हणून काम करीत मुलाला मोठं केलं. शहीद कोंडाजी यांचा मुलगा दीपक यांना दोन मुलं. त्यांचीही लग्न झाली आहेत. दीपक आजोबा आणि वीरपत्नी लहानबाई पणजी झाल्या आहेत.


शिपाई कोंडाजी मालुंजकर
जन्मतारीख २० नोव्हेंब १९३८
सैन्यभरती २० नोव्हेंबर १९६१
वीरगती २ आॅक्टोबर १९६५ (भारत -पाक युद्ध)
सैन्यसेवा ३ वर्षे १० महिने १२ दिवस
वीरपत्नी लहानबाई कोंडाजी मालुंजकर.

शब्दांकन : हेमंत आवारी

Web Title: Shoora we Vandelay: Kondaji Amar Jahla not to die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.