कामगार लढ्याचा वाटाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 02:09 PM2019-08-20T14:09:49+5:302019-08-20T14:09:56+5:30

रशियात जगातील पहिली कामगार क्रांती झाली. कामगारांनी राजसत्ता हातात घेण्याचा हा प्रयोग जगाच्या इतिहासात प्रथमच होत होता. या घटनेपासून आपल्या अहमदनगर जिल्ह्यातही अनेकांनी प्रेरणा घेतली व त्यांनी ब्रिटिशांना, तसेच सावकारशाही विरोधात लढा पुकारला. त्यात वयाच्या दहाव्या वर्षापासून कॉ. एकनाथराव भागवत सहभागी झाले होते. 

The share of labor struggles | कामगार लढ्याचा वाटाड्या

कामगार लढ्याचा वाटाड्या

Next

अहमदनगर : कॉ. एकनाथराव भागवतांचा जन्म ४ सप्टेंबर १९०८ रोजी देवास (मध्यप्रदेश) येथे झाला. त्यांचे वडील शेतकरी़ ते शेवगाव तालुक्यातील एरंडगावचे़ मात्र, त्यांचा जन्म आजोळी देवास येथे झाला़ ते अवघे दहा-अकरा वर्षाचे असतानाच रशियात जगातील पहिली कामगार क्रांती झाली. कामगारांनी राजसत्ता हातात घेण्याचा हा प्रयोग जगाच्या इतिहासात प्रथमच होत होता. या घटनेपासून आपल्या अहमदनगर जिल्ह्यातही अनेकांनी प्रेरणा घेतली. यामध्ये कॉ. चंद्रभान आठरे पाटील, कॉ. अप्पासाहेब शिंदे, कॉ. पी. बी. कडू पाटील, कॉ. विनायकराव ताकटे, कॉ. अचपलराव लांडे पाटील, कॉ. धर्मा भांगरे, कॉ. ठाकोरभाई आदी विविध जाती-जमातीतील तरुणांचा समावेश होता. त्यांनी ब्रिटिशांना, तसेच सावकारशाही विरोधात लढा पुकारला.
‘नया जमाना आयेगा, कमानेवाला खायेगा’ असा जयघोष करत कम्युनिस्टांनी सावकारशाहीविरोधात संघर्ष सुरू केला. सावकारांनी दडपशाहीने घशात घातलेल्या जमिनी शेतकºयांनी परत घेतल्या. हा सावकारशाहीविरोधी लढा चालू असतानाच देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण हैद्राबाद संस्थान मात्र निजामाच्याच ताब्यात होते. निजामाचे रझाकार हैद्राबाद संस्थानाबरोबरच आजूबाजूच्या प्रदेशातही त्रास देत. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी हैद्राबाद स्टेट काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाने अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर अनेक छावण्या उभ्या केल्या. या लढ्यात कॉ. एकनाथराव भागवत आणि त्यांचे सहकारी अग्रभागी होते.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले सर्व प्रश्न सुटतील असे अनेकांना वाटत होते. पण गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले. हे काळे इंग्रज पूर्वीसारखेच शेतकºयांकडून सक्तीने धान्याची लेव्ही वसूल करू लागले. या विरोधात कम्युनिस्टांनी संघर्ष उभारला. त्या संघर्षाचे एक केंद्र एरंडगाव होते. कारण एरंडगाव आणि आजूबाजूच्या परिसरातून जमा केलेले धान्य एरंडगावच्या सरकारी गोदामात ठेवण्यात आले होते. हे धान्य जबरदस्तीने हलविण्याचे सरकारने ठरविले. पण या गोदामाभोवती हजारो शेतकºयांनी कॉ. एकनाथराव भागवतांच्या नेतृत्वाखाली वेढा घातला होता. सरतेशेवटी सरकारने पोलिसांच्या मदतीने हा धान्यसाठा हलवायचा निर्णय घेतला. नि:शस्त्र जनता आणि सशस्त्र पोलीस यांच्यात घमासान युद्ध झाले. यामध्ये सात शेतकरी शहीद झाले. २४ मार्च १९४९ रोजी झालेला हा पोलीस गोळीबार स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिला पोलीस गोळीबार होता. जनतेतून निवडून आलेले सरकार जनतेवर गोळीबार करू शकते, त्यांचा जीव घेऊ शकते, हे भयंकर होते. यामुळे सगळीकडे सरकारची बेअब्रू झाली. या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली. परिणामी सक्तीची लेव्ही वसुली बंद झाली. या लढ्यात कॉ. एकनाथरावांसोबत त्यांच्या जीवनसाथी कॉ. वत्सलाताई देखील होत्या. तात्पर्य कॉ. एकनाथरावांनी कम्युनिस्ट विचार आपल्या घरापर्यंत नेला होता. तसेच नि:शस्त्र असलेली जनता सर्वशक्तिमान सरकारला वाकवू शकते, हे या घटनेने सिद्ध केले.
महाराष्टÑाबद्दल आकस असलेल्या केंद्र सरकारने गुजराती भांडवलदारांच्या दबावाखाली मुंबईसह संयुक्त महाराष्टÑाला विरोध केला. ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची ’ असे म्हणत सामान्य मराठी माणसाची टर उडवली. या विरोधात संयुक्त महाराष्टÑ समितीच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्टांनी रान उठवले. अहमदनगर जिल्ह्यात या लढ्याच्या नेतृत्वस्थानी कॉ. एकनाथराव भागवत आणि त्यांचा कम्युनिस्ट पक्ष होता. या पार्श्वभूमीवर १९५७ च्या निवडणुका झाल्या आणि याच अहमदनगर जिल्ह्याने सर्वसाधारण जागेवर अ‍ॅड. बी. सी. कांबळे या दलित उमेदवाराला निवडून दिले. 
या निवडणुकीत शेवगाव मतदारसंघातून कॉ. एकनाथराव भागवतही आमदार म्हणून निवडून आले. ते आमदार असूनही साध्या एसटी बसने प्रवास करीत. एकदा करंजी येथे एसटी बस थांबली असता ते भेळ खाण्यासाठी उतरले. त्यांनी भेळ घेतली आणि खाण्यास सुरुवात करणार तोच कंडक्टरने डबल बेल दिली. दुकानदार व इतरांनी त्यांना निवांतपणे भेळ खा असे सांगितले. पण त्यांनी नकार दिला आणि भेळेचा पुडा हातात घेऊन ते एसटीत येऊन बसले. माझ्यामुळे लोकांची गैरसोय होता कामा नये. ही त्यांची भूमिका होती. 
कॉ. एकनाथराव भागवत महाराष्टÑाच्या कम्युनिस्ट पक्षाचे तेरा वर्ष सेक्रेटरी होते. शेती आणि शिक्षण हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय. त्यांनी जसे शेतकºयांचे लढे लढवले तसे विद्यार्थी आंदोलनालाही पाठबळ दिले. १९७२-७३ च्या दुष्काळात मॅट्रीकचे विद्यार्थी परीक्षा फी भरू शकणार नाही, हे लक्षात आल्यानंतर कॉ. भागवतांनी शेख शमा हाजी कादर, मारूती डमाळ, अरुण लांडे आदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून फी माफीसाठी विद्यार्थ्यांना पहिला मोर्चा काढायला लावला. 
सोलापूर येथील डॉ. वैशंपायन मेडिकल कॉलेज हे भरमसाठ कॅपिटेशन फी घेऊन चालविले जात होते. या विरोधात १९७२ च्या जून महिन्यात विद्यार्थ्यांना दिशा दिली. कम्युनिस्ट पक्षातर्फे सोलापूर शहर बंदची हाक देण्यात आली. सोलापूर बाहेरील आणि वैद्यकीय क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हे आंदोलन करण्यात आले. सरतेशेवटी सरकारला मेडिकल कॉलेज ताब्यात घ्यावे लागले. त्यामुळेच सर्वसामान्य गरिबांची मुले डॉक्टर बनू शकली. हे केवळ त्यांच्यामुळेच शक्य होऊ शकले. 

१९६५ ते १९७६ या कालावधीत महाराष्टÑ शासनाने गोदावरी नदीवर आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण पैठणजवळ (जायकवाडी प्रकल्प) बांधण्याचे ठरवले. त्याकाळी अत्यंत कमीत कमी मोबदल्यात सरकार शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेत असे. या विरोधात कॉ. एकनाथराव भागवत यांनी लढा दिला. त्यांचा धरणाला विरोध नव्हता तर धरणाचा फायदा लाभक्षेत्राबरोबरच बुडीत क्षेत्रालाही मिळाला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी शेतकरी संघटित केले. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांचे मोर्चे काढले. धरणग्रस्तांना लाभक्षेत्रात जमिनी मिळाल्या पाहिजे. धरण योजनेबरोबर पुनर्वसनाची योजना तयार केली पाहिजे. तसेच पुनर्वसनाबाबत कायदा झाला पाहिजे, अशा मूलगामी स्वरुपाच्या मागण्या त्यांनी केल्या. केवळ जायकवाडी प्रकल्पाबाबतच नव्हे तर एकूणच मोठ्या धरणांबाबत सरकारचे धोरण काय असावे, या संदर्भात त्यांनी मूलभूत विचार केला होता.

लेखक -  डॉ. महेबूब सय्यद (इतिहास अभ्यासक)

Web Title: The share of labor struggles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.