Preaching is over; Meeting of Amit Shah, Sharad Pawar on Saturday | प्रचार शिगेला; अमित शहा, शरद पवार यांच्या शनिवारी सांगता सभा
प्रचार शिगेला; अमित शहा, शरद पवार यांच्या शनिवारी सांगता सभा

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी (दि़ १९) सायंकाळी ५ वाजता संपणार आहे़. प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत़. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत- जामखेड मतदारसंघातील प्रचाराचा समारोप केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने होणार आहे़. दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या या सांगता सभेकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे़. 
कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ केंद्रीयमंत्री अमित शहा यांची शनिवारी दुपारी कर्जत येथे सभा होत आहे़. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कर्जत येथे सकाळी सभा आहे़. अन्य मतदारसंघात प्रचाराने जोर धरला आहे़. प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे़. ज्या भागात आपण पोहोचू शकलो नाही, तिथे जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांचा भर आहे़. काहींनी शेवटच्या दिवशी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन केले आहे़. 
उमेदवारांकडून गावोगावी काढण्यात येणा-या प्रचार फे-यांनी वातावरण ढवळून निघाले आहे़.  सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेला प्रचाराचा दणदणाट रात्री दहापर्यंत कायम असतो़. सकाळच्या सत्रात पदयात्रा, दुपारी बैठका आणि सायंकाळी पुन्हा प्रचार फे-या, रात्री उशिरापर्यंत बैठका, अशी उमेदवारांची दिनचर्या आहे़. परंतु, प्रचाराला कमी वेळ राहिल्याने वेळेचा खुबीने वापर करीत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याची काळजी घेतली जात आहे़. 
बहुतांश मतदारसंघात युवा संवाद, महिला मेळावा, ज्येष्ठांच्या मेळाव्यांची मांंदियाळी आहे़. निवडणुकीतील बॅलेटपेपरवरील क्रमांक आणि चिन्ह हे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध समाजाच्या बैठका, कॉर्नर सभा, मतदारांच्या गाठीभेटींना प्राधान्य दिले जात आहे़. शेवटच्या टप्प्यात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू आहे़. उमेदवाराला स्वत: ला ते शक्य नसले, तरी कार्यकर्ते नातेवाईक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत़. एकगठ्ठा मते असलेल्या भागात पुन्हा पुन्हा जाऊन संपर्कात राहण्याचे प्रयत्न सुरू आहेत़. 
प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे़.  


Web Title: Preaching is over; Meeting of Amit Shah, Sharad Pawar on Saturday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.