राज्याच्या मंत्रिमंडळात कायमच नगर ‘पॉवरफुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 05:15 PM2020-01-06T17:15:29+5:302020-01-06T17:16:23+5:30

नगर जिल्ह्याला रामराव आदिक यांच्या रुपाने पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळाले. तेव्हापासून नगर जिल्ह्यातील नेत्यांनी आलटून- पालटून महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सक्षमपणे संभाळली. ही परंपरा जिल्ह्यातील नेत्यांनी टिकवून ठेवली.

'Powerful' in Cabinet of Ministers | राज्याच्या मंत्रिमंडळात कायमच नगर ‘पॉवरफुल’

राज्याच्या मंत्रिमंडळात कायमच नगर ‘पॉवरफुल’

googlenewsNext

अण्णा नवथर। 
अहमदनगर : नगर जिल्ह्याला रामराव आदिक यांच्या रुपाने पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळाले. तेव्हापासून नगर जिल्ह्यातील नेत्यांनी आलटून- पालटून महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सक्षमपणे संभाळली. ही परंपरा जिल्ह्यातील नेत्यांनी टिकवून ठेवली. ती आजतागायत कायम असून, महसूल, नगरविकास आणि जलसंधारण, या तिन्ही महत्वाच्या खात्यांवर आता नगर जिल्ह्याची छाप दिसणार आहे. तिन्ही खात्यांच्या मंत्र्यांकडून नगर जिल्ह्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.
नगर जिल्हा हा कुरघोडीच्या राजकारणासाठी ओळखला जात असला तरी राज्याच्या राजकारणात मात्र नगरी नेत्यांची नेहमीच छाप राहिली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील नेते रामराव आदिक यांच्या रुपाने सन १९८३ मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळाले. ते दोन वर्षे उपमुख्यमंत्री राहिले. महत्वाच्या खात्यांसह उपमुख्यमंत्री पदापर्यंत जिल्ह्यातील नेत्यांनी मजल मारली.
 शेवगाव येथील बाळासाहेब भारदे यांच्या रुपाने नगर जिल्ह्याने पहिल्यांदा मंत्रिमंडळात खाते उघडले. पहिल्या मंत्रिमंडळात सहकार खाते व विधानसभेचे अध्यक्षपद ही पदे भारदे यांनी भूषविली. त्याचबरोबर बी. जे. खताळ, बाबूराव भारस्कर, आबासाहेब निंबाळकर, गोविंदराव आदिक, शंकरराव काळे, बबनराव ढाकणे, अण्णासाहेब म्हस्के, एस.एम. आय. असीर, शंकरराव कोल्हे, मधुकरराव पिचड, अनिल राठोड, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपतुे, शिवाजी कर्डिले, राम शिंदे हा जिल्ह्यातील मंत्र्यांचा चढता आलेख निश्चित गौरवास्पद आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या नगर जिल्ह्याने काहीकाळ विरोधी भूमिकाही बजावली. 
पाथर्डीचे बबनराव ढाकणे यांच्या रुपाने पहिल्यांदा विरोधी पक्षनेते पद मिळाले. त्यानंतर ना.स. फरांदे, सूर्यभान वहाडणे, मधुकरराव पिचड आणि युतीच्या काळात राधाकृष्ण विखे या नेत्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. निवडणुकीपूर्वी विखे हे भाजपवासी झाले. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी त्यांचे पारंपरिक विरोधक बाळासाहेब थोरात यांनी भरून काढली.  महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेत नगर जिल्ह्याचे सुपुत्र बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली. थोरात यांच्या रुपाने नगर जिल्ह्याला दुस-यांदा महसूल खाते मिळाले. नगरविकास व ऊर्जा, उच्च तंत्र शिक्षणही महत्वाची खाती प्राजक्त तनपुरे यांच्याकडे आली आहेत.  जलसंधारण हे खाते मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे आहे. जलसंधारण हे खाते संभाळणारे  गडाख हे जिल्ह्यातील पहिले मंत्री आहेत.
महसूल खाते तिस-यांदा नगरकडे
तत्कालीनमंत्री बी. जे. खताळ यांनी महसूल खात्याचा कारभार पाहिला. त्यानंतर शंकरराव कोल्हे यांच्याकडे महसूल खाते होते. आघाडीच्या काळात तिस-यांदा बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने जिल्ह्याला महसूलमंत्रीपद मिळाले. या खात्याचा अनुभव असल्याने थोरात यांच्याकडे दुसºयांदा महसूल खाते देण्यात आले आहे.
कृषी व महसूल खात्यावर नगरचा वरचष्मा
कृषी व महसूल ही दोन महत्वाची खाती नेहमीच नगरच्या वाट्याला आली. पहिल्यांदा गोविंदराव आदिक यांच्या रुपाने नगर जिल्ह्याला कृषी मंत्री पद मिळाले. त्यानंतर अण्णासाहेब म्हस्के, शंकरराव कोल्हे, राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात यांच्याकडे कृषी खाते होते. तसेच महसूल खाते जिल्ह्यात पहिल्यांदा खताळ यांना मिळाले. त्यानंतर शंकरराव कोल्हे यांनी या खात्याचा कारभार पाहिला असून, थोरात यांच्याकडे दुसºयांदा महसूल खात्याची जबाबदारी आली आहे.
नगर जिल्ह्याने राज्याला दिले २० मंत्री
१)रामराव आदिक- उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री 
२)बाळासाहेब भारदे- सहकार, विधानसभा अध्यक्ष
३)बी.जे. खताळ- महसूल, सार्वजनिक बांधकाम, विधी न्याय
४)बाबूराव भारस्कर- समाजकल्याण
५)आबासाहेब निंबाळकर- पाटबंधारे, ग्रामविकास
६)गोविंदराव आदिक- परिवहन, विधी व न्याय, कृषी
७)शंकरराव काळे- शिक्षण, सहकार
८)बबनराव ढाकणे- सार्वजनिक बांधकाम, विरोधी पक्षनेते
९)अण्णासाहेब म्हस्के- पाटबंधारे, कृषी
१०)एस.एम.आय. असीर- ऊर्जा, वक्फ
११)शंकरराव कोल्हे- सहकार, महसूल, कृषी, परिवहन,राज्य उत्पादन,हंगामी सभापती, फळ उत्पादन, कमाल जमीन धारणा
१२)मधुकरराव पिचड- दुग्ध व पशुसंवर्धन, बंदरे, रोजगार हमी, आदिवासी, वन, विरोधीपक्षनेते, जिल्ह्याचे पालकमंत्री
१३)अनिल राठोड- अन्न,नागरी पुरवठा
१४)राधाकृष्ण विखे- कृषी, जलसंधारण, दुग्ध व पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, शालेय शिक्षण, विधी व न्याय, पालकमंत्री (औरंगाबाद), परिवहन,बंदरे,विधी व न्याय,कृषी व पणन, पालकमंत्री (अमरावती), विरोधीपक्ष नेते, गृहनिर्माणमंत्री
१५)बाळासाहेब थोरात- पाटबंधारे, कृषी, जलसंधारण, शालेय, शिक्षण, कृषी, रोजगार हमी,महसूल, खार जमीन, ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, अपारंपरिक ऊर्जा, दुग्ध व पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, सध्या महसूल खाते.
१६)बबनराव पाचपुते- गृह, वन, आदिवासी, पालकमंत्री
१७शिवाजीराव कर्डिले- मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
१८)राम शिंदे- गृह, पर्यटन, राजशिष्टाचार, आरोग्य, जलसंधारण, जिल्ह्याचे पालकमंत्री.
१९)शंकरराव गडाख- मृद व जलसंधारण
२०)प्राजक्त तनपुरे- नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्र शिक्षण
विखे- थोरात सर्वाधिक खात्यांचे मंत्री
आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांच्याकडे महत्वाची खाती होती. थोरात व विखे हे जिल्ह्यातील सर्वाधिक खात्यांचा कारभार पाहिलेले नेते आहेत.

Web Title: 'Powerful' in Cabinet of Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.