बोठेच्या अटकपूर्व जामिनासंदर्भात न्यायालयाने मागितले पोलिसांचे म्हणणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 02:41 PM2020-12-08T14:41:29+5:302020-12-08T15:14:09+5:30
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात शुक्रवारी (दि.११ डिसेंबर) जिल्हा न्यायालय सुनावणी होणार आहे.
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात शुक्रवारी (दि. ११ डिसेंबर) जिल्हा न्यायालय सुनावणी होणार आहे.
बोठे याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात सोमवारी ॲड. महेश नवले यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी न्यायालयात या अर्जावर प्राथमिक सुनावणी होऊन न्यायालयाने सरकारी वकील व पोलिसांचे म्हणणे मागितले आहे. आता सरकारी पक्षाचे म्हणणे आल्यानंतर यावर पुढील सुनावणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे.
जरे यांचे हत्याकांड झाल्यानंतर मुख्य सूत्रधार म्हणून बाळ बोठे याचे नाव पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर बोठे नगर शहरातून पसार झाला. पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत आहेत. तो मात्र अद्याप पर्यंत पोलिसांना सापडलेला नाही. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केलेले असून त्यातील दोघे न्यायालयीन कोठडी तर तिघे पोलीस कोठडीत आहेत.