गड्यांनो, आपला गावच बरा, कसली झंझटच नाय! गावागावात गप्पांचे फड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 06:17 AM2020-03-17T06:17:55+5:302020-03-17T06:18:11+5:30

कोरोनाने जगाची झोप उडाली. शहरामधील ‘हवा टाईट’ झाली. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह बंद झाले आहेत.

Our village is Good,No Fear of Corona! A chat in the village | गड्यांनो, आपला गावच बरा, कसली झंझटच नाय! गावागावात गप्पांचे फड

गड्यांनो, आपला गावच बरा, कसली झंझटच नाय! गावागावात गप्पांचे फड

Next

- बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : मुंबई-पुण्यासारख्या शहरात कसला तरी कोरोना आजार आलाय म्हणत्यात. माणूस वाचत नाही, म्हणतात गड्यांनो. आपण लहानाचे मोठे झालो. ना कोरोना, ना स्वाईन फ्लू. त्यामुळे आपलं गावच बरं बुव्वा! कसली झंझटच नाय! ज्येष्ठ नागरिकांमध्ये अशा गप्पांचे फड गावागावातील पार आणि मारुती, गणपतीच्या मंदिरात रंगू लागले आहेत.

कोरोनाने जगाची झोप उडाली. शहरामधील ‘हवा टाईट’ झाली. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह बंद झाले आहेत. टीव्ही आणि सोशल मीडिया केवळ कोरोनाचीच कॅसेट वाजवत आहे, असे ग्रामस्थ एकमेकांना सांगत आहेत. सोमवारी कोरोनामुळे श्रीगोंद्याचा आठवडे बाजार बंद होता. त्यामुळे गजबजलेले शहर मात्र ओसाड पडल्यासारखे चित्र होते. बाजारतळावर जनावरही पाहावयास मिळाले नाही. श्रीगोंदा शहरापासून दहा किमी अंतरावरील आढळगावचा दुपारी फेरफटका मारल्यावर सगळीकडे शांतता होती. गणपती-मारुतीच्या मंदिरात सोपाना गव्हाणे, शंकर शिंदे, तात्या वडवकर, भाऊ डोके, शिवदास उबाळे, देवीदास गव्हाणे, के. डी. औटी ही ज्येष्ठ मंडळी गप्पा मारत होती. त्यांच्या चेहऱ्यावर कोरोनाचे कोणतेही टेन्शन दिसले नाही.

शहरात रुग्ण आढळत आहेत. आपल्या गावात मात्र शुद्ध हवा, पाणी आणि भाजीपाला, फळे आहेत. चुलीवरची भाकरी, भाजी. सारं आबादीआबाद आहे. कधीमधी दुखायला लागलं, तर पन्नास रुपयात इंजेक्शन आणि शंभर रुपयांच्या गोळ्या घेतल्या की माणूस ठणठणीत होतो. खोकला आला तर सरकारी दवाखान्यातील पातळ लाल औषध मिळते, असे ग्रामस्थांनी सांगितले.

के. डी. औटी म्हणाले, मोबाइल केला तर कोरोना आलाय. हात धुवायची कॅसेट लागते. टीव्हीवर तीच गत. त्यामुळे मी तर मोबाइल ठेवून दिला. टीव्हीही पाहत नाही. गावातील पोरं नोकरीधंद्याच्या निमित्ताने शहरात गेली आहेत. त्यांनीही माघारी यावे. शेतीत काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. येथे परप्रांतीय पोट भरतात आणि आपली पोरं शहरात पोटं भरत्यात. ते गावात आले, तर शेती तरी चांगली होईल, अशी भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.

गावाकडची माणसं बिनधास्त..
कोरोनाचे काही रूग्ण शहरात आढळून आले आहेत. मात्र गावाकडे कोरोनाबाबत केवळ चर्चाच आहे. याबाबत गावाकडची माणसं बिनधास्त दिसतात. ग्रामीण भागात कोरोनाची लक्षणे असलेला एकही रूग्ण दिसत नाही.
- डॉ. कमुदिनी शिंदे,
आढळगाव, ता. श्रीगोंदा
 

Web Title: Our village is Good,No Fear of Corona! A chat in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.