Opponents only mislead the masses- | विरोधक केवळ जनतेची दिशाभूल करतात- मधुकरराव पिचड
विरोधक केवळ जनतेची दिशाभूल करतात- मधुकरराव पिचड

राजूर : आपणही तालुक्यात विविध विकासकामे केली. अजूनही छोटे मोठे बंधारे बांधणे बाकी आहे. युवकांच्या हाताला काम द्यायचे आहे. विकास कामांतून तालुका बांधणीचे काम आपण करत आहोत. मात्र विरोधक केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केला.
अकोले मतदार संघातील वारंघुशी येथे मंगळवारी सायंकाळी महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांच्या प्रचारसभेत माजीमंत्री पिचड बोलत होते. आरपीआयचे भाई पवार अध्यक्षतेखाली सभा झाली. पिचड म्हणाले, सत्तेच्या विरोधात असताना आमदार वैभवने तालुक्याचा विकास प्रश्नावर आंदोलने केली. आपण विकासाच्या बाजूने म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केला.  आपण आमदार झालो. त्यावेळी अकोल्यापर्यंत डांबरी रस्ता होता व वीजही तेथपर्यंतच होती. आपल्या कार्यकाळात वाडी वस्त्यांपर्यंत रस्ते,वीज पोहोचली. मुलांच्या शिक्षणासाठी शाळा, आश्रमशाळा, इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळा सुरू केल्या. आदिवासी समाजासाठी स्वतंत्र बजेट तयार केले. तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून पर्यटन विकास राबविला. याच पर्यटन विकासाला चालना मिळाल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आदिवासी आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचा शब्द घेतला.  दोन वर्षांत सर्व रस्ते, घरकुले कामे पूर्ण करणार. पिंपरकणे येथील उड्डाणपुलाचे काम एक वर्षात पूर्ण करून पर्यटनाला चालना देण्यासाठी निधीची तरतूद करणार आहे. सदाशिव घाणे, पंचायत समिती सदस्य उर्मिला राऊत, उपसरपंच अनिता कडाळी, राजू मधे, मान्हेरेचे सरपंच हरिभाऊ गभाले, सुरेश भांगरे,  माधव गभाले, विजय भांगरे, डॉ. विजय पोपरे, भरत घोरपडे, ज्ञानेश्वर झडे, काशिनाथ भडांगे, भास्कर एलमामे, भोरू खाडे, गणपत देशमुख, मुरलीधर भांगरे उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश पवार यांनी केले. आभार भरत घाणे यांनी मानले.


Web Title: Opponents only mislead the masses-
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.